आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अायुक्त बकोरियांच्या ‘परती’साठी फील्डिंग!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शहरातील खड्ड्यांच्या ज्वलंत विषयावर विशेष सर्वसाधारण सभा सुरू असताना नगरसेवकाच्या ‘गेंड्याच्या कातडीचे’ या एका वाक्यावरून सभात्याग करणारे महापालिका आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांना शासनाकडे परत पाठवण्यासाठी फील्डिंग लावली जात आहे. त्यासाठी सोमवारी मनपातील गटनेत्यांची संयुक्त बैठक होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
मंगळवारी पार पडलेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना ‘गेंड्याच्या कातडीचे’ असा शब्दप्रयोग केला होता. त्यामुळे अपमानित झाल्याच्या भावनेतून आयुक्त बकोरिया त्यांच्या पाठोपाठ सर्व अधिकाऱ्यांनी तत्काळ सभागृह सोडले होते.
आयुक्तांमुळे विकासकामात खोडा निर्माण होत असल्याचा आरोप करून नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी त्यांच्याविरुद्ध संताप व्यक्त केला होता. त्यामुळेच सध्या मनपा आयुक्त हटावची मोहीम हाती घेतली आहे. आयुक्तांना अधिकारी गेंड्याच्या कातडीचे म्हटले तर एवढा राग आला, मग आम्हा नगरसेवकांना वॉर्डात विकासकामे होत नसल्याने नागरिकांच्या रोज शिव्या ऐकाव्या लागत आहेत त्याचे काय, असा प्रश्न सभेत उपस्थित करत नगरसेवकांनी आयुक्तांना शासनाकडे परत पाठवण्याचा ठराव घेण्यात यावा, अशी मागणी केली होती. मात्र, ही विशेष सभा असल्याने यावर पडदा पडला. आता येणाऱ्या सर्वसाधारण सभेत या मागणीचा प्रस्ताव येण्याची शक्यता आहे.

एमआयएमसह संघटनाही सरसावल्या
आयुक्त बकोरिया यांना शासन सेवेत परत पाठवण्यासाठी शिवसेना, भाजप, एमआयएम या प्रमुख पक्षांसह अन्य छोट्या-मोठ्या संघटनांचेही प्रयत्न सुरू आहेत. बकोरिया विकासकामांना बगल देत असल्याचा आरोप त्यांच्यावर केला जात आहे. सध्या पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांमध्ये सुरू असलेल्या वादात विकासकामे रखडली आहेत. त्यामुळे बकोरिया यांना परत पाठवण्यासाठी मनपा वर्तुळात जोरदार हालचाली सुरू आहेत. सोमवारच्या गटनेत्यांच्या बैठकीत बकोरिया हटाव मोहिमेवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली.

पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार रणनीती
सत्ताधारी शिवसेनेच्या दोन पदाधिकाऱ्यांनी घडल्या प्रकाराची पालकमंत्री रामदास कदम यांना माहिती देण्यासाठी थेट कोकण गाठले होते. दुसरीकडे भाजपचा एक पदाधिकारी प्रदेशाध्य रावसाहेब दानवे यांना भेटण्यासाठी जालन्याला गेला होता. दोन्ही पक्षांचे पदाधिकारी परत आले असून पक्षश्रेष्ठींकडून मिळालेल्या आदेशानुसार रणनीती आखणार आहेत.
बातम्या आणखी आहेत...