आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शनिवारी शहरात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे येत्या शनिवारी शहरात येत असून लोकसभा निवडणुकीच्या चाचपणी आणि पदाधिकार्‍यांना कामाला लावण्यासाठी ते दिवसभर बैठका घेणार आहेत.

लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या असून आता शिवसेनेने हालचाली सुरू केल्या आहेत. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात शिवसेनेत सध्या अस्वस्थतेचे वातावरण आहे. खासदार चंद्रकांत खैरे यांच्याबाबत पक्षात नाराजी असल्याने उद्धव ठाकरे यांच्या आगामी दौर्‍यात त्यावर काही चर्चा होते का याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. ठाकरे यांचा शनिवारचा दौरा पक्षाची यंत्रणा कामाला लावण्यासाठी असला, तरी त्यातून ते पक्षात खैरे यांच्याबाबतचा कानोसाही घेण्याची शक्यता आहे. बहुधा त्यासाठीच शनिवारी वेगवेगळ्या बैठका होणार आहेत. शिवसेनेचे शहरातील पदाधिकारी, नगरसेवक, जिल्हा परिषदेचे सदस्य, जिल्ह्यातील पदाधिकारी यांच्यासोबत विंडसर कॅसल हॉटेलमध्ये ठाकरे स्वतंत्र बैठका घेणार आहेत. शिवसेनेकडे औरंगाबादची लोकसभेची जागा 15 वर्षांपासून आहे. येणारी निवडणूक शिवसेनेसाठी महत्त्वाची असून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर होणारी ही पहिलीच निवडणूक असल्याने औरंगाबाद मतदारसंघावर उद्धव ठाकरे यांनी विशेष लक्ष दिले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार खासदार चंद्रकांत खैरे यांच्याबाबतची नाराजी त्यांच्या कानावर गेली असल्याने शनिवारच्या बैठकीत त्यावरून काही चर्चा होते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.