आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एका दिवसाच्या उपशातून भागेल ३ दिवसांची तहान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पैठण - जायकवाडी धरणाचा पाणीसाठा झपाट्याने खालावत आहे. त्यामुळे आगामी काळात प्रशासनाला कसरत करावी लागणार आहे. धरण क्षेत्रातून ८ हजारांपेक्षा जास्त कृषिपंपांनी पाणी उपसा सुरू आहे. एका दिवसाला होणाऱ्या या उपशातून औरंगाबादसह जालन्याची ३ दिवस तहान भागवली जाऊ शकते. दरम्यान, टंचाईच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसांत कृषिपंप बंद करण्याचे आदेश धडकतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.
मराठवाड्यातील ३५० पेक्षा अधिक योजनांना धरणातूनच पाणीपुरवठा केला जातो. सध्या जायकवाडी धरणाचे पाणी मृत साठ्यावर आल्यात जमा आहे. या मृत साठ्यातून मराठवाड्याची तहान भागवण्याची कसरत प्रशासनाला करावी लागणार आहे. परिस्थिती अशीच राहिल्यास हा साठा वर्षभर पुरणार, असा दावा प्रशासन करत असले तरी त्यात किमान ३० टक्के कपात करावी लागेल, असा अंदाज जलतज्ज्ञ बांधत आहेत.

जायकवाडी धरणाच्या पाण्यात घट झाल्याने उद्योगांच्या पाण्यात दहा टक्के कपात करण्यात आली. आता धरणातील कृषी पंपांचा पाणीपुरवठा बंद करण्यात येणार आहे. धरणातील आठ हजार कृषी पंपांतून दररोज १ द. ल. घ. मी. पाणी उपसा होतो. हे पाणी बंद केले तर या मोटारीद्वारे होणाऱ्या एक दिवसाच्या पाणी उपशावर मराठवाड्याची तीन दिवस तहान सहज भागवली जाऊ शकते. आजघडीला औरंगाबादला पिण्यासाठी रोज १५० एम. एल. डी. लागते. ग्रामीणसाठी ५० व जालन्यास २२ एम. एल. डी. पाण्याची गरज असते. अशा स्थितीमध्ये जायकवाडीवर अवंलबून असलेल्या गावात सध्या पाणीटंचाईची समस्या भेडवण्याची शक्यता आहे.
धरणात गाळ
धरणाचा मृत साठा ७३८ द.ल.घ.मी. असून या पाण्यात अर्धा-अधिक गाळच असल्याचे जलतज्ज्ञ सांगतात. त्यामुळे या मृत साठ्यातील पाणी किती दिवस पुरेल, हे कोणीच छातीठोकपणे सांगत नाही. औरंगाबाद, जालना, अंबड व शेवगावसह ३५० योजनांना जायकवाडीचाच आधार आहे.
नियोजन कोलमडले
पाऊस वेळेवर होईल या आशेवर पाटबंधारे विभागाने नियोजन केले. मात्र, पावसाने दडी मारल्याने नियोजन पार कोलमडले आहे. धरणाने मृतसाठा गाठला आहे. त्यामुळे उद्योगांची पाणी कपात करण्याची वेळही आली.
पिण्यासाठी राखीव ठेवणे आवश्यक
पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर आहे. पाणी पिण्यासाठी राखीव ठेवणे आवश्यक आहेच, मात्र नियोजन योग्य न झाल्याने शेतकऱ्यांच्या मुळावरील धोरण सध्याचे दिसते. प्रदीप पुरंदरे, जलतज्ज्ञ
वर्षभर पाणी पुरेल
जायकवाडी मृत साठ्यावर आले असून आता धरणातील कृषिपंपांचा पाणीपुरवठा बंद करावा लागणार आहे. मात्र, मृत साठ्यातूनही औरंगाबाद व जालन्याला वर्षभर पाणी कपात करून पाणीपुरवठा होईल. अशोक चव्हाण, शाखा अभियंता