आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वैजापूर तालुक्यातील रामनगरात भरली एक दिवसाची शाळा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिक्षणाचा हक्क कायदा लागू झाला. विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे म्हणून अतिरिक्त शिक्षकांना कायम केले गेले; पण प्रत्यक्ष मुले आणि पालकांना तळमळ असतानाही एकच दिवस शाळा भरली. मुले कमी म्हणून शाळा सुरू होत नव्हती. काही दिवसांनी मुले मिळाली. मग उद्घाटन ठेवून शाळा सुरू करण्याचा कार्यक्रम उरकला. त्यात शिक्षणाच्या हक्कावर जोरदार भाषणे ठोकली; पण प्रत्यक्षात या कायद्याची ऐशीतैशी करत एकच दिवस म्हणजे उद्घाटनापुरतीच शाळा भरवून ती बंद करण्यात आली. ही घटना आहे वैजापूर तालुक्यातील गोळेवाडी शिवारातील रामनगर गावची.

शिक्षणापासून कुठल्याही घटक वंचित राहू नये यासाठी राज्य शासनाने 2009 पासून आरटीई (शिक्षणाचा हक्क कायदा) लागू केला. घरोघर शिक्षण पोहोचावे म्हणून अनेक तरतुदी करण्यात आल्या; पण रामनगरमध्ये मात्र परिस्थिती नेमकी उलटी आहे.

काय आहे प्रकरण?
वैजापूर तालुक्यातील मौजे गोळेवाडी शिवारात असलेल्या या रामनगर गावात 2001 मध्ये वस्तीशाळा सुरू करण्यात आली. भव्य इमारतीसह सर्व सुविधा असलेली ही शाळा नियमित सुरू होती. अचानक मुलांची संख्या कमी असल्याने ती 2008 मध्ये बंद पडली. पुन्हा या वस्तीतील सुमारे 21 मुले शाळेत जाण्यासाठी तयार झाली. यासाठी शाळा पुन्हा सुरू करावी, अशी मागणी गावक-यांनी केली. सातत्याने होणा-या मागणीनंतर अखेर जिल्हा परिषदेने शाळा सुरू करण्याला मान्यता दिली. त्यानुसार 22 जुलै 2014 रोजी गटशिक्षणाधिका-यांसह लोकप्रतिनिधींनी शाळेचा उद्घाटन सोहळा आयोजित केला. त्या दिवशी शाळा भरवण्यात आली. थाटात झालेल्या उद्घाटन सोहळ्यात मान्यवरांनी शिक्षणाचे महत्त्व आणि शिक्षण हक्क कायद्यावर जोरदार भाषणे ठोकली; पण प्रत्यक्षात केवळ उद्घाटनपुरतीच ही शाळा भरली आणि दुस-याच दिवसापासून रामनगरच्या या 21 विद्यार्थ्यांना गोळेवाडीच्या प्राथमिक शाळेत जा, असे सांगत शाळेला कुलूप ठोकले गेले.

एकच शिक्षक, तोही गेला
एका दिवसासाठी सुरू झालेल्या शाळेला आबासाहेब मगर नावाचे शिक्षक देण्यात आले. मुलांना धडे देऊन त्यांची रवानगी गोळेवाडीच्या शाळेत करण्यात आली. एकच शिक्षक, पण त्यांनाही दुस-याच दिवशी दुसरीकडे पाठवण्यात आले.

चिखल, पाणी आणि पायपीट
रामनगर ते गोळेवाडी हे अतंर 5 किमीआहे. रामनगराला लागून असलेल्या 35 वस्त्यांच्या मुलांचाही यात समावेश आहे. गोळेवाडीला जाण्यासाठी असलेला रस्ता कच्च आहे. त्यात आता पावसाने तर तो पूर्ण खराब झाला आहे. या रस्त्यावरून सायकल वा अन्य वाहने सोडाच, साधे पायी चालणेही कठीण आहे. त्यात शाळेत जाणारी मुले लहान आहेत. रोजची पायपीट करणेही अशक्य आहे. परिणामी, इच्छा असूनही रामनगरातील मुले शिक्षणापासून वंचित राहत आहेत.

कायद्या धाब्यावर
केंद्र सरकारने सन 2002 मध्ये 6 ते 14 वयोगटातील सर्व बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण देणारा अधिनियम (राइट ऑफ चिल्ड्रन टू फ्री अँड कम्पलसरी एज्युकेशन 2009) संमत करून तो राजपत्रात प्रसिद्ध केला आहे. यामुळे समता, सामाजिक न्याय, लोकशाही आणि समाजामध्ये न्यायाची प्रस्थापना ही मूल्ये मुलांना प्राथमिक शिक्षणाच्या माध्यमातून साधली जाईल, अशी अपेक्षा करण्यात आली आहे; पण एवढ्या सगळ्या तरतुदी असूनही रामनगरात उलटेच घडत आहे.

अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्न निकाली
महाराष्ट्र ातील अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्न नुकत्याच झालेल्या अधिवेशनात शिक्षणमंत्र्यांनी निकाली काढला. विद्यार्थी शिक्षणापासून वचिंत राहू नये यासाठी हा निर्णय महत्त्वपूर्ण ठरला; पण त्याचाही या प्रकरणात फायदा झाला नाही. कारण या ठिकाणी विद्यार्थ्यांना तळमळ असूनही त्यांची ज्ञानलालसा पूर्ण करण्यात अपयश येत आहे.

थेट सवाल
रामनगर येथील शाळा बंद आहे का?
-हो, परंतु आम्ही शिक्षणाधिका-यांना प्रस्ताव पाठवला आहे. तो मंजूर होताच शाळा सुरू होईल.
शाळा एकच दिवस सुरू केली होती...
-हो, कारण नंतर आमच्यामागे समायोजनाचे काम लागले आहे. दिवसरात्र यातच अडकल्यामुळे प्रॉब्लेम झाला. प्रस्ताव मंजूर झाल्याबरोबर शाळा सुरू करण्यात येईल.

तर हरकत नाही
दहा मुलांपेक्षा कमी असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय पूर्वी घेण्यात आला होता, पण रामनगरच्या शाळेत विद्यार्थी संख्या वाढली असल्यास शाळा सुरू करण्यास हरकत नाही. तसे आदेश गटशिक्षणाधिका-यांना देण्यात येतील. ‘विद्यार्थी तेथे शाळा’ ही आमची योजनाच आहे. शिक्षणापासून कुणालाही वंचित ठेवले जाणार नाही.-एम. के. देशमुख, शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद
फोटो - उद्घाटनाच्या दिवशी शाळा भरली. विद्यार्थ्यांचे धडेही घेण्यात आले.