आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेथे तो क्रिकेट खेळायचा तेथून 100 मीटर अंतरावरच अंगावर पडले झाड

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- रेल्वेस्टेशन परिसरातील बनेवाडी येथील नावाजलेला क्रिकेटपटू विनोद राधेश्याम करडीवाल (३०) याच्या अंगावर झाड पडून रविवारी मध्यरात्री त्याचा मृत्यू झाला. घरोघरी ओळख असलेल्या विनोदच्या निधनाची वार्ता कळताच गावावर शोककळा पसरली. सोमवारी एकाही घरात चूल पेटली नाही. ज्या मैदानावर तो क्रिकेट खेळायचा तेथून १०० मीटर अंतरावरच त्याच्या अंगावर झाड पडले. 

रविवारी रात्री साडेअकराच्या सुमारास विनोद दुचाकीने आरटीओ कार्यालयासमोरील मैदानातून बनेवाडीकडे जाणाऱ्या चिंचोळ्या मार्गातून जात होता. पावसाची संततधार सुरू होती. अयोध्यानगरी मैदानाजवळ असलेल्या स्मशानभूमीच्या पुढे गेल्यानंतर एक भले मोठे बाभळीचे झाड विनोदच्या अंगावर पडले. पावसामुळे झाड पडले म्हणून अनेक दुचाकीस्वारांनी गावाकडे जाण्यासाठी दुसऱ्या मार्गाचा वापर केला. रात्री एकच्या सुमारास एका वाहनधारकाला हेड लाइटच्या प्रकाशात पडलेल्या झाडाखाली दुचाकी दिसली. त्याने लगेच गावकऱ्यांना फोन केला. काही मिनिटांतच गावकरी घटनास्थळी धावत आले. वेदांतनगर पोलिसांना ही माहिती मिळताच हवालदार उत्तम जाधव आणि शिपाई योगेश सूर्यवंशी यांनी देखील घटनास्थळ गाठले. गावकऱ्यांच्या मदतीने दुचाकीवर पडलेले झाड बाजूला करून बेशुद्धावस्थेत असलेल्या विनोदला उपचारासाठी घाटीत दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. शवविच्छेदन विभागात गावातील सुमारे हजार लोक जमले होते. विनोदला एक सात वर्षांची मुलगी चार वर्षांचा मुलगा आहे. तो मोठ्या भावासह बनेवाडीत राहायचा. ज्या मैदानावर तो क्रिकेट खेळायचा तेथून १०० मीटर अंतरावरच त्याच्या अंगावर झाड पडले. त्याच्याच बाजूला असलेल्या स्मशानभूमीत त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. वेदांतनगर पोलिस ठाण्यात अपघाती मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. 

उत्तम क्रिकेटपटू
विनोदलाबनेवाडीतील प्रत्येक जण ओळखत होता. शहरातील एका गॅस एजन्सीमध्ये मार्केटिंग करताना त्याने अनेकांना स्वयंपाकाचा गॅस घेण्यासाठी मोठी मदत केली. उत्तम क्रिकेट खेळणारा विनोद हा फलंदाज होता. मित्र त्याला जॉँटी म्हणत. शहरात होणाऱ्या डीपीएल, एपीएल या क्रिकेट स्पर्धेत तो मंजित कॉटन टीमकडून खेळत असल्याचे त्याच्या मित्रांनी सांगितले. मुंबईत होणाऱ्या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेतसुद्धा त्याने सहभाग घेत उत्कृष्ट कामगिरी केली होती. रविवारी सुटी असल्यामुळे त्याने मित्रांसोबत मनसोक्त क्रिकेट खेळले. सहा फूट उंची असलेला विनोद मैदानात उतरला की, चौकार आणि षटकारांचा वर्षाव करत असल्याचे मित्रांनी सांगितले. 
बातम्या आणखी आहेत...