औरंगाबाद - प्रतीक्षा वाघ.. शिवाजीनगर, सिडको १२ व्या योजनेत राहणारी बुद्धिमान महत्त्वाकांक्षी मुलगी. शांत अन् सरळ स्वभाव. अभ्यासाव्यतिरिक्त बाहेरचे जग तिच्यासाठी तसे अनभिज्ञ.. घराबाहेरही फारशी दिसणारी. पण आज (गुरुवारी) अचानक तिने अंकुर बालक मंदिरामागील रेल्वे रुळांवर रेल्वेसमोर उडी टाकून आत्महत्या केली. या वार्तेने शिवाजीनगरातील बायाबापड्यांनी हातातील कामे टाकून तिच्या घराकडे धाव घेतली. सकाळी अकरापासून तिच्या घराच्या आजूबाजूला बायांचा घोळका दबक्या आवाजात याच घटनेची चर्चा करत होता. "असं कसं केलं पोरीनं!' अस म्हणत आप्तेष्ट अश्रूंना मोकळी वाट करून देत होते. मुलीने आत्महत्या केल्याची वार्ता सांगणारा पहिला फोन पोलिसांकडून तिचे वडील मोतीराम वाघ यांना आला. त्यांनी मित्र-नातेवाइकांसह घाटीत धाव घेतली. इकडे मुलीच्या आईला तिच्या आत्महत्येची खबरही नव्हती.
प्रतीक्षाला घरी सर्वजण 'राणी' या टोपणनावानेच बोलावत. गल्लीतही ती याच नावानेच परिचित. तिने बारावी विज्ञान शाखेत चांगली कामगिरी केली होती. एमएचटी-सीईटी उत्तीर्ण झाल्याने तिला अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयात प्रथम वर्षात प्रवेश मिळाला. आई -वडिलांचा आनंद गगनातही मावेनासा झाला होता. तिथे तिचा वसतिगृहात प्रवेशही झाला. प्रथम वर्ष पार पडले. सध्या सुट्यांत ती औरंगाबादला परतली हाेती. सुट्यांतही अभ्यास व्हावा म्हणून ती अभ्यासिकेत जात होती. मात्र, गुरुवारी नियतीने वेगळी खेळी केली. तिने स्वत:ला झोकून देत जीवनयात्रा संपवली. तीन मैत्रिणींनी मानसिक छळ केला, एवढेच त्यामागचे कारण. अभ्यासाच्या नोट्स चोरल्या, असा मैत्रिणींचा तिच्यावर आरोप. अभ्यास आणि परिश्रमाच्या बळावर यश मिळवणाऱ्या राणीच्या हा आरोप जिव्हारी लागला होता.
आईच्याकुशीत उलगडले दु:ख : बुधवारीरात्री आईच्या गळ्यात पडून तिने आपल्या मनाला होत असलेल्या वेदना उलगडल्या. आईने तिची समजूत काढत काहीतरी मार्ग निघेल, असा िवश्वासही दिला. नंतर राणीने त्या मैत्रिणीशी फोनवरून संवादही साधला. त्यावेळी दोघींत शाब्दिक संघर्षही उडाला असणार. त्यानंतर राणीने मैत्रिणीला माझ्या मृत्यूस तुम्ही जबाबदार असल्याचा मेसेजही पाठवला. तिने फोनमधून डिलिटही केला. मात्र नोट्स चोरीचा मैत्रिणींनी केलेला आरोप तिच्या अंत:करणाला सारखा बोचत होता. बहुदा संपूर्ण रात्र अस्वस्थ असावी. अशा नाजूक मनस्थितीत तिने आत्महत्येचा कठोर निर्णय घेतला असणार.
केवळ आकांत, आकांतच
राणीच्यामृत्यूमुळे आई-वडील वेडेपिसे झाले होते. एकच आकांत सुरू झाला. राणीचा मृतदेह आणि तिच्या आईवडिलांची अवस्था पाहून सर्वांच्या डोळ्यांतून अश्रूंचे ओघळ वाहत होते. तरुण कोवळ्या मुलीचा असा अंत व्हायला नको होता. आईवडिलांचा खूप मोठा आधार गेला, अशी हळहळ व्यक्त होत होती. राणीच्या मृत्यूच्या वार्तेने तर शिवाजीनगरवर मरणकळा पसरली होती.