आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक लाख कामगार ‘ईएसआयसी’पासून वंचित

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- शहरात दीड लाख कामगारांना ईएसआयसी योजनेचा लाभ मिळतो. मात्र, अजूनही शेंद्रा, पैठण आणि चितेगाव एमआयडीसीतील काही भागात ही योजना राबवली जात नाही. त्यामुळे एक लाख कामगार ईएसआयसी सुविधेपासून वंचित आहेत.

कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या स्वास्थ्यासाठी ईएसआयसी ही अत्यंत महत्त्वाची सुविधा आहे. या योजनेच्या माध्यमातून कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांवर अत्यल्प दरात उपचार केले जातात. मात्र, गेल्या काही वर्षांपासून ईएसआयसीबाबत सरकारची उदासीनता वाढत चालली आहे. कंत्राटी कामगारांसह शेंद्रा, पैठण एमआयडीसीत ही योजना लागू झालेली नाही.

कंत्राटी कामगार सुविधेपासून वंचित
कामगाराच्या वेतनातून सव्वा टक्के कपात ईएसआयसीसाठी केली जाते. यात पावणेपाच टक्के रक्कम व्यवस्थापन टाकते. मात्र, सध्या कंत्राटी कामगारांना या सुविधेचा लाभ मिळत नाही. असंघटित कामगारांना त्याचा सर्वाधिक फटका बसत आहे. त्यामुळे शहरातील अजूनही दीडलाख कामगार या सुविधेपासून वंचित आहेत. याबाबत मागील आठवड्यात सिटूचे राज्य उपाध्यक्ष उद्धव भवलकर यांनी आरोग्यमंत्र्यांची भेट घेऊन सरकारच्या उदासीनतेकडे लक्ष वेधले.

सरकारने लक्ष द्यावे
शेंद्रा एमआयडीसीत अद्याप ईएसआयसीची सुविधा सुरू झाली नाही, हे मोठे दुर्दैव आहे. केंद्र आणि राज्य सरकारने योजनाबाबतची परिणामकारता वाढवायला हवी. सरकारच्या उदासीनतेचा फटका या योजनेला बसत आहे. आता कारखानदार ईएसआयसी टाळत नाहीत. एखादा त्याला अपवाद असेल. कामगारांना ईएसआयसीचा लाभ देण्यासाठी सरकारने त्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
उल्हास गवळी, उद्योजक.

चार रुग्णालये हवीत
रुग्णालयात डॉक्टर नसणे नित्याचेच झाले आहे. डॉक्टरांचा अभाव, अपु-या सुविधेमुळे कामगारांना योग्य उपचार मिळत नाहीत, तर शेंद्रा एमआयडीसीसह असंघटित, कंत्राटी असे एक लाख कामगार अजूनही या सुविधेपासून वंचित आहेत. आणखी चार रुग्णालये व्हायला हवीत, अशी मागणी करण्यात आली आहे. पंढरपूरची इमारत केवळ उद्घाटनामुळेच पडून आहे. त्यामुळे कामगारांत असंतोष वाढत आहे.
कॉ. उद्धव भवलकर, राज्य उपाध्यक्ष, सिटू.

ईएसआयसी रुग्णालयाची दुरवस्था : शहरात शंभर खाटांचे एक ईएसआयसी रुग्णालय आणि चार डिस्पेन्सरी आहेत. मात्र, रुग्णालयात कोणत्याही सोयी उपलब्ध नाहीत. आयसीयू तसेच अनेक मशिन्स या रुग्णालयात नाहीत. स्टाफ मंजूर झालेला असताना भरती मात्र होत नाही. पंढरपूरमध्ये ईएसआयसीची तीन मजली इमारत बांधण्यात आली. मात्र, केवळ उद्घाटन होत नसल्यामुळे ती एक वर्षापेक्षा अधिक काळापासून तशीच पडून आहे.