आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेगाने केला हेल्मेटधारी दुचाकीस्वाराचा घात, पत्नी गंभीर जखमी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाळूज - भरधाव दुचाकी घसरून पतीचा जागीच अंत झाला, तर पत्नी गंभीर जखमी झाली. हा अपघात औरंगाबाद -नगर महामार्गावरील गोलवाडी फाट्यावर शनिवारी दुपारी १२.१५ च्या सुमारास झाला. राजकुमार रावळे, पंढरपूर असे मृत दुचाकीस्वाराचे नाव असून त्यांची पत्नी रेखा यांच्यावर घाटीत उपचार सुरू असल्याची माहिती छावणी पोलिस ठाण्याच्या सूत्रांनी दिली. राजकुमार रावळे यांनी हेल्मेट घातले होते, मात्र दुचाकीचा वेग अधिक असल्यामुळे त्यांच्या मेंदूला मार लागून ते ठार झाले, अशी चर्चा घटनास्थळी होती.
पोलिस जमादार व्ही.के.नागरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, औरंगाबाद शहरातून राजकुमार आणि त्यांची पत्नी पंढरपूरकडे दुचाकीने निघाले होते. मात्र राजकुमार दुचाकीचे स्टँड वर करण्यास विसरले. गोलवाडी फाट्यालगत दुचाकी एका बाजूला वळवताच स्टँड खालीच असल्याने त्यांची दुचाकी उसळून घसरली. दुचाकीसह दोघे दूरपर्यंत फरपटत गेले. त्यात राजकुमार यांच्या मेंदूला जबर मार लागला. त्यांच्या नाकातोंडातून रक्तप्रवाह सुरू होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर पत्नी गंभीर जखमी झाली. पोलिसांच्या मदतीने त्यांना तत्काळ घाटी रुग्णालयात हलवण्यात आले. हेल्मेट होते, मात्र वेगमर्यादा पाळली नाही : राजकुमारयांनी हेल्मेट घातले होते. मात्र दुचाकी घसरल्यानंतर ते डोक्यावर पडून दुचाकीसह दूरपर्यंत घसरत गेल्याने त्यांच्या मेंदूला गंभीर इजा झाली. हेल्मेटमुळे वरून मार लागलेला दिसत नव्हता. मात्र अपघातानंतर मेंदूला मोठा धक्का बसल्याने त्यांच्या नाक आणि तोंडातून रक्तप्रवाह सुरू झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांनी दुचाकीच्या वेगावर मर्यादा ठेवली असती तर नक्कीच जीव वाचला असता, अशी चर्चा प्रत्यक्षदर्शींत सुरू होती. या प्रकरणी छावणी पोलिसांत घटनेची नोंद करण्यात आली आहे.