आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हॉस्पिटलचे दरवाजे बनवण्याची थाप मारून दहा हजारांचा गंडा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - कमल नयन बजाज हॉस्पिटलचे दरवाजे बनवायचे आहेत, असे सांगून एका भामट्याने व्यापाऱ्याला दहा हजार रुपयांचा गंडा घातल्याची घटना २२ एप्रिल रोजी घडली. या प्रकरणी सतीश गोपीनवार यांनी सातारा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
गोपीनवार यांचे बीड बायपास रोडवर श्री स्वामी समर्थ ट्रेडर्स या नावाने फायबर दरवाजे विकण्याचे दुकान आहे. २२ एप्रिल रोजी भामटा त्यांच्या दुकानावर आला. मला एकबोटे डॉक्टरांनी पाठवले असून, हॉस्पिटलमध्ये २२ दरवाजे बनवायचे आहेत, असे सांगितले. हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर त्यांनी काही दरवाजाचे माप घेतले. त्यानंतर डॉक्टरांच्या दालनात जाऊन माझी सर्वांशी ओळख असल्याचे भासवले. बाहेर आल्यानंतर साहेबांनी २२ दरवाजे बनवण्याचे सांगितले असून कोटेशनची मागणी केली. त्यानुसार गोपीनवार यांनी ९० हजारांचे कोटेशन दिले. कामाचे पैसे तत्काळ मिळतील, पण साहेबांकडे एक लाखाचे बंडल आहे. ते त्यांना तोडायचे नाही तुम्ही दहा हजार रुपये द्या अशी मागणी केली. त्यांनी दुकानावरून दहा हजार रुपये आणून भामट्याला दिले. तेव्हा मी साहेबांना हे दहा हजार देतो आणि एक लाखाचे बंडल घेऊन येतो, असे सांगून तो भामटा पसार झाला. काही वेळाने गोपीनवार यांना शंका आली. त्यांनी सर्व दालनात जाऊन चौकशी केली. मात्र आपण त्याला ओळखत नसल्याचे डॉक्टर कर्मचाऱ्यांनी सांगितले. फसवले गेल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. हा सर्व प्रकार हॉस्पिटलच्या सीसीटीव्हीत कैद झाला असून पोलिसांनी ते फुटेज ताब्यात घेतले आहे. सातारा पोलिस ठाण्यातील हवालदार चव्हाण तक्रार अर्जाची चौकशी करीत आहेत.

आमचा संबंध नाही
हॉस्पिटलमध्ये घडलेल्या या घटनेची माहिती प्रशासनाला आहे. त्यांची नोंद करण्यात आली आहे. मात्र या दोन्ही व्यक्तींशी प्रशासनाचा काहीही संबंध नाही. - डॉ. व्यंकटेश होळसांबरे, सीईओ,बजाज हॉस्पिटल