आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • One Tale Of Wrestling Men; Body Strong But No Finacial Support

एक गोष्‍ट कुस्‍तीवाल्यांची; बलदंड शरीर, पण आर्थिक बळ नाही

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - शड्डू ठोकत समोर तिसगावचा मल्ल उभा असलेला दिसला की भल्याभल्यांची गाळण उडत असे. आजही या मल्लांची आठवण झाली की जिल्हाभरातील लोकांच्या बाहूंमध्ये स्फुरण चढते, परंतु शरीर बलदंड असले तरी आर्थिक बळ नसल्याने हे कुस्तीपटू हलाखीचे जीवन जगत आहेत. ही परिस्थिती वेळीच लक्षात आल्याने उपमहाराष्ट्र केसरी विजेते ठरलेल्या तिसगावातील मिठ्ठू पहिलवान तरैयावाले यांनी मातीचा आखाडा सोडला आणि ते राजकारणाच्या आखाड्यात उतरले. सध्या ते तिसगावचे सरपंच म्हणून कार्यरत आहेत. दुसरे अ‍ॅड. सेवकचंद बाखरिया यांनी कुस्तीची परंपरा कायम ठेवत उपमहाराष्‍ट्र केसरी पुरस्कार मिळवला, पण भविष्याची चिंता असल्याने त्यांनी कुस्तीचे डावपेच सोडून वकिली सुरू केली. तिसरे तिसगावचे परबत कासुरे यांची तब्येत प्रचंड खालावली आहे, पण इलाजासाठी त्यांच्याकडे पैसे नाहीत, तर तब्बल दोन दशके कुस्तीत नाव कमावलेल्या अजीज कादर पटेल आज साठीत मोलमजुरी करत, तर कधी अन्य कामे करत हाल सहन करत आहेत. शहरातील कुस्ती व कुस्तीपटूंची स्थिती दर्शवणारी ही चार प्रातिनिधिक उदाहरणे...


22 वर्षे कुस्तीत घातली; मिळाले मात्र काहीच नाही
नायगाव येथील अजीज कादर पटेल पहिलवान नावाच्या कुस्तीपटूने आपल्या आयुष्याची 22 वर्षे कुस्तीत घातली. मेहनत करून राज्यातील अनेक स्पर्धांमध्ये औरंगाबाद जिल्ह्याचे नाव झळकवले. एवढेच नव्हे, तर अनेक शिष्य घडवले, पण आज वयाच्या साठीत त्यांना हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत.

सुरुवातीला शासनाने 100 रुपये मानधन दिले आणि थोड्याच दिवसांत ते बंदही केले. आजघडीला अजीज पहिलवान आपल्या एक एकर कोरडवाहू शेतीत काम करून कसाबसा उदरनिर्वाह करीत आहेत. मागील वर्षी पाऊस न पडल्याने उपासमारीची वेळ आली होती, परंतु मोलमजुरी करून कसेबसे दिवस काढले. शासनाकडून आम्हाला मानधन नको, फक्त एखादी चपराशाची नोकरी दिली तरी उरलेसुरले दिवस काढता येतील, अशी अपेक्षा अजीज पहिलवान यांनी व्यक्त केली आहे.


एकाच वेळी 20 पहिलवान झाले पोलिस
पोलिसांत जर निर्व्यसनी, बलवान आणि निरोगी लोक असतील तर त्याचा फायदा होतो, असा विचार करून तत्कालीन पोलिस अधीक्षक राममूर्ती यांनी एकाच वेळी तिसगावातील 20 पहिलवान मुलांना पोलिसांत नोकरी देऊ केली होती. या गावातील प्रत्येक पहिलवानाला आपण पोलिसांत घेऊ, असे ते म्हणत. पण अलीकडे या गावातील कुणीही पोलिसात दिसत नाही. कित्येक वर्षांपासून एकही पहिलवान पोलिसांत भरती झाला नसल्याचेही गावकर्‍यांनी सांगितले.


शस्त्रक्रियेसाठी पैसे नाहीत
परबत गोवर्धन कासुरे यांचा जन्म 1954 मध्ये तिसगाव येथे झाला. त्यांनी अक्षरश: सायकल प्रवास करून कुस्तीचे धडे गिरवले. राज्य आणि राष्‍ट्रीय स्पर्धांमध्ये डाव मारून त्यांनी आपला दबदबा निर्माण केला. अखिल भारतीय आंतरविद्यापीठाचे प्रतिनिधित्व करत 3 वर्षे सुवर्णपदक व एक वर्ष कांस्यपदक असे घवघवीत यश त्यांनी मिळवलेले आहे. तसेच जागतिक स्तरावरील कुस्ती स्पर्धेसाठी सतत चार वर्षे कोचिंग कॅम्पसाठी प्रतिनिधित्व केले. 10 वर्षे औरंगाबाद जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत 6 सुवर्ण व एका कांस्यपदकाची कमाई केली. या कुस्तीपटूचा महाराष्‍ट्र शासनाने 1992 मध्ये शिवछत्रपती पुरस्कार देऊन सन्मान केला. पहिलवान ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उपकुलसचिव पदापर्यंत पोहोचलेले कासुरे सध्या मात्र हृदयविकाराने त्रस्त आहेत. त्यांना तीन वेळा हृदयविकाराचा झटका येऊन गेला. एकदा शस्त्रक्रियाही झाली. आता पुन्हा बायपास सर्जरी करण्याच्या सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. यासाठी 5 लाखांपर्यंत खर्च होणार आहे. आहे ती कमाई अगोदरच्या आजारात संपली, आता हा पैसा कसा उभा करायचा या विवंचनेत ते आहेत.


कुस्तीतून राजकीय आखाड्यात
उपमहाराष्ट्र केसरी विजेते असलेल्या तिसगावातील मिठ्ठू पहिलवान तरैयावाले यांनीही जिल्ह्याचे नाव उभ्या महाराष्ट्रात गाजवले; पण जोपर्यंत पहिलवान आखाड्यात कुस्ती खेळतो तोपर्यंत त्याला मान-सन्मान आणि थोडाफार पैसाही मिळतो. एकदा उतार वय सुरू झाले की मग मात्र त्याचे हाल होतात. ही गोष्ट ओळखून तरैयावाले यांनी वेळीच कुस्तीचा मातीचा आखाडा सोडला आणि राजकारणाचा आखाडा पकडला. त्यात ते यशस्वीही झाले. सध्या ते तिसगावचे सरपंच म्हणून काम पाहत आहेत.


आखाडा, तोपर्यंत वैभव
तरुण वय असेपर्यंत काही वाटत नाही, पण एकदा उतार वय सुरू झाले की आटोपला खेळ. मग आम्हाला ना सरपंच विचारतो ना शासन. हे जेव्हा लक्षात आले तेव्हा आम्ही राजकारणाच्या आखाड्यात उतरलो आहोत.
मिठ्ठू पहेलवान तरैयावाले, सरपंच तथा उपमहाराष्‍ट्र केसरी विजेते


वैभवाचे चीज झाले नाही
निझामकाळापासून औरंगाबादच नव्हे, तर अख्ख्या महाराष्‍ट्रात कुस्तीचे वैभव वाढवणारी उस्ताद लालचंद यांची व्यायामशाळा. या शाळेने किसनराव वानखेडे यांच्यासारखे अनेक मल्ल घडवले. लालचंद यांची परंपरा कायम ठेवत त्यांचा मुलगा बाबुलाल लालचंद उस्ताद यांनी मानाच्या समजल्या जाणा-या महाराष्‍ट्र कुस्तिगीर परिषदेचे दुसरे अध्यक्षपद 1982 मध्ये भूषविले. मामासाहेब मोहळ हे कुस्तिगीर परिषदेचे संस्थापक अध्यक्ष होते. यानंतर या पदाचा मान बाबुलाल यांनाच मिळाला. सध्या अध्यक्ष आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व केंद्रीय मंत्री शरद पवार. उस्ताद यांच्या तिस-या पिढीत अ‍ॅड. सेवकचंद बाखरिया यांनी कुस्तीची परंपरा कायम ठेवत दोन वेळा महाराष्‍ट्र केसरी स्पर्धेत स्थान मिळवत उपमहाराष्‍ट्र केसरी पुरस्कार मिळवला. महाराष्‍ट्र केसरी असलेले गुलाब बर्डे यांना आसमान दाखवणारे अ‍ॅड. सेवकचंद यांनी आता मात्र कुस्तीला रामराम ठोकला आहे. भविष्यात कुस्ती खेळून उदरनिर्वाह होणार नाही हे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी न्यायालयाच्या कायदेशीर आखाड्यात उडी घेण्याचा निर्णय घेतला. एक मोठी परंपरा लाभलेला कुस्तीपटू शासनाच्या उदासीन धोरणामुळे कुस्ती क्षेत्रातून बाहेर पडला हे दुर्दैवच म्हणावे लागेल. परंतु त्यांनी आजही आपली व्यायामशाळा तरुणांसाठी उघडीच ठेवली आहे. काही पहिलवान त्यांच्या लालचंद उस्ताद तालीम शाळेत कसरत करतात, पण त्यांना उज्ज्वल भविष्याची खात्री कशी द्यावी, हा त्यांच्यापुढे प्रश्न आहे.


...पडत्या काळात हाल
कुस्तीच्या माध्यमातून औरंगाबाद आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला पहिले सुवर्णपदक आणि पहिला छत्रपती पुरस्कार मिळवून दिला. शासनाने तेव्हा कौतुक केले. आता मात्र माझ्या पडत्या काळात मला कुणीही साथ देत नाही.
परबत कासुरे, माजी उपकुलसचिव


परंपरा जपली, पण...
आजोबांच्या मेहनतीची चीज झाले नाही.
आम्हाला कुस्तीची परंपरागत देण आहे. आजोबा आणि वडिलांचे योगदान आमच्यासाठी एक शिदोरी आहे; परंतु शासनाच्या उदासीन धोरणामुळे या शिदोरीचा आम्हाला काहीच फायदा झाला नाही. आज आम्ही दु:खी मनाने कुस्तीपासून दूर झालो आहोत.
मोहिंदर बाखरिया, लालचंद उस्ताद तालीम प्रमुख


अधिवेशनात प्रश्न उपस्थित करणार
संघटनेचा कार्याध्यक्ष म्हणून आम्ही प्रत्येक वर्षी विविध कार्यक्रमादरम्यान कुस्तीचे आखाडे भरवून त्यांना रोख बक्षीस देतो. जिल्ह्यातील प्रत्येक आखाड्यातील जिल्हा व राज्यस्तरीय मल्लांना पाच हजार रुपये मानधन दिले पाहिजे. खेळाडूंचा हा विषय आपण येत्या अधिवेशनात मांडणार आहोत.
आमदार प्रदिप जैस्वाल, कार्याध्यक्ष,राष्‍ट्रीय तालिम संघ


पाठपुरावा सुरू
शासनातर्फे मिळणारी मदत तुटपुंजी आहे. त्यामध्ये आणखी वाढ करणे गरजेचे आहे. मातीवरील कुस्ती आता मॅटवर आल्याने जिल्ह्यातील प्रत्येक आखाड्यात मॅट पोहोचणे गरजेचे आहे. त्यासाठी शासनाकडे आम्ही पाठपुरावा करत आहे.
विलास कोचुरे, आंतरराष्‍ट्रीय प्रशिक्षक


देशी खेळ हद्दपार होतील
शासनाचेच आपल्या देशी खेळाकडे लक्ष नाही. युवकांनाही ग्लॅमर असलेले खेळ हवेत. शासनाने क्रीडा धोरणामध्ये देशी खेळांना अधिक चालना द्यायला हवी. त्यांना मदत व सुविधा उपलब्ध केल्या पाहिजेत. तरच हे खेळ टिकून राहील.
डॉ. दत्ताभाऊ पाथ्रीकर, कार्याध्यक्ष, जिल्हा ग्रामीण राष्‍ट्रीय तालीम संघ


लोकसहभागाची गरज
शासन कुस्तीला इतर खेळांप्रमाणे आवश्यक ती मदत करत नाही. आम्ही खेळाडूंच्या मदतीसाठी मान्यवरांच्या मदतीने खेळाडूंना मदत करण्याचा प्रयत्न करतो. त्यासाठी लोकसहभाग महत्त्वाचा आहे, तरच कुस्ती टिकेल.
प्रा. नारायण शिरसाठ,
सचिव, जिल्हा ग्रामीण राष्‍ट्रीय तालीम संघ