आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोदाकाठच्या दीड हजार गावांना धोका, उत्तराखंडच्या प्रलयानंतर धडा घेण्याची वेळ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पैठण - उत्तराखंडातील महाभयंकर जलप्रलयामुळे सबंध देश हादरून गेलेला असतानाच गोदापात्रातील उत्खननाचा विषयही आता ऐरणीवर आला आहे. पैठण ते नांदेडपर्यंतच्या गोदापात्राची रुंदी वाढली असून यामुळे दीड हजार गावांना धोका संभवू शकतो. पात्रातील अवैध उत्खननास वेळीच पायबंद घातला नाही तर पूरस्थिती निर्माण होऊन दीड हजार गावे गोदेच्या कवेत सामावू शकतात, अशी भीती पर्यावरणतज्ज्ञ व्यक्त करत आहेत. विशेष म्हणजे आतापर्यंत पाच वेळा महापुराचा सामनाही पैठण शहरासह गोदाकाठच्या गावांनी केला आहे.


गोदावरीच्या पात्रातून नाशिक ते नांदेडदरम्यान रोज हजारो ब्रास वाळू, मुरूम व मातीचे उत्खनन केले जाते. यामुळे नदीपात्रात ठिकठिकाणी मोठे खड्डे आढळून येतात. याशिवाय नदीकाठच्या मातीची चोरीही बिनदिक्कत सुरू आहे. यामुळे गोदेच्या पात्राची रुंदी वाढली असून काही प्रमाणात दिशाही बदलली आहे. वाहत येणा-या दगडगोट्यांमुळे पाण्याचा वेग अधिकच वाढतो.


आतापर्यंतच्या 18 पुरांत मोठी जीवित हानी झाली नसली तरी भविष्यातील धोका मात्र कायम टांगता आहे. विशेष म्हणजे 35 वर्षांमध्ये शासनाने गोदावरी पात्राच्या परिसरात कुठल्याच प्रकारची वृक्षलागवड केली नाही. या झाडांमुळे पुराचे पाणी अडवले जाऊन त्याचा वेग कमी होऊ शकतो. मात्र, शासनाने वृक्षलागवड गांभीर्याने घेतलेली नाही.
दोन वर्षांच्या दुष्काळामुळे जायकवाडी धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली नसल्याने गोदापात्रात पाणी सोडण्याची वेळ आली नाही. यंदा जर वरील भागांत जोरदार पाऊस कोसळला, धरण तुडुंब भरले तर पाणी सोडण्याची वेळ येऊ शकते.


प्रशासनाचे प्रयत्न
अवैध वाळू उपशावर प्रशासनाची करडी नजर असते. प्रसंगी त्यांच्यावर कारवाईही करण्यात येते. यापुढेही उत्खनन थांबवण्यासाठीचे प्रयत्न करण्यात येतील, असे तहसीलदार राजीव शिंदे म्हणाले.


1980 मध्ये गोदापात्राची खोली 70 मीटर होती.
2013 मध्ये 85 मीटरपेक्षाही जास्त खाली गेली आहे.


क्षमताही नाही
पैठणपासून ते नांदेडपर्यंत अकरा बंधारे आहेत. महापूर आल्यास त्याला रोखण्याची क्षमताही या बंधा-यांत नाही. यापूर्वीच्या 2006 व 2008 महापुरावरून त्याचा प्रत्यय आला.


पर्यावरण अहवालाकडे दुर्लक्ष
पर्यावरण विभागाने तहसीलला पाच वर्षांपूर्वीच एका अहवालाद्वारे उत्खनन थांबवण्याचा इशारा दिला होता. मात्र, 5 वर्षांमध्ये गोदावरी पात्रातील उत्खनन दहा पटींनी वाढले.


रोज 70,000 ब्रास वाळूचा उपसा
नाशिक ते नांदेडदरम्यान रोज किमान 10 हजार ट्रक वाळूचा उपसा होतो. एका ट्रकमध्ये किमान 5 ते 7 ब्रास वाळू असते. 50 ते 70 हजार ब्रास वाळू उपशाची नोंद शासनदरबारी आहे. असे असले तरी अनधिकृतपणे वाळूचा उपसा यापेक्षा कितीतरी जास्त आहे. मुरूम व मातीचाही रोज 1 हजार ब्रासपेक्षा जास्त उपसा होतो. यामुळे गोदेच्या पात्राची रुंदी वाढत आहे.


एक नजर जायकवाडीवर
पैठण येथील जायकवाडी धरण महाराष्‍ट्रातील सर्वात जास्त लांबीचे आहे.
याचे पाणलोट क्षेत्र : 21750 चौ. कि.मी
जलसाठा
2909 द.ल.घ.मी
उपयुक्त पाणीसाठा : 2171
मृत पाणीसाठा : 738
जलशयाने व्यापलेले क्षेत्र : 35000 हेक्टर
जलोत्सारण मार्गाची लांबी : 418 मीटर
पुराचा विसर्ग : 18150 क्युसेक्स
दरवाजांची (गेट) संख्या : 27
प्रकल्पबाधितांची संख्या: 76280
विस्थापित गावे : 118


18 वेळा पूर
2006 मध्ये एका दिवसात 85 ते 255 मि.मी. पाऊस नाशिकच्या पश्चिम घाटात झाला होता. त्यामुळे जायकवाडीतून गोदावरीत 2 लाख 50 हजार क्युसेक्स पाणी सोडले होते. या महापुरात संपूर्ण पैठण शहर बुडाले होते, तर चारशे गावांना फटका बसला होता. दुसरा तथा आतापर्यंतचा सर्वात मोठा महापूर सन 2006 मध्ये आला होता. पहिला पूर सन 1990 मध्ये आला होता. याशिवाय 1998, 1999, 2000, 2005, 2007, 2008 मध्येही गोदाकाठच्या गावांना फटका बसला.


काय म्हणतात तज्ज्ञ
...तर प्रवाह दिशाहीन
वाळू ही नदीची जीवनरेखा आहे. वाळू नसेल तर नदीच्या प्रवाहाला दिशा राहणार नाही. आजकाल चुकीच्या पद्धतीने होणा-या बेसुमार वाळू उपशामुळे महापूर तसेच जीवित व वित्तहानीला एक प्रकारे निमंत्रण मिळत आहे. पर्यावरणहितैषी विषय सरकारच्या अजेंड्यावर नाही. सृष्टिविनाशाला कारण ठरू पाहणा-या वाळू उपशावर, तुम्ही-आम्ही आवाज उठवणे ही काळाची गरज आहे.
राजेंद्रसिंह राणा, मॅगसेसे पुरस्कार विजेते तथा आंतरराष्ट्रीय नदी अभ्यासक, राजस्थान


किनारपट्टीचे भूस्खलन
वाळू हा नदीचे अस्तित्व टिकवून ठेवणारा कणा आहे. तिचा प्रमाणाबाहेर उपसा झाला तर नदीकिना-याचा भाग कमजोर होऊन किनारपट्टीचे भूस्खलन होते. महापुरात हे किनारे एका प्रवाहात नाहीसे होतात. उत्तराखंडमधील महाप्रलयाचे वाळू उपसाही एक कारण आहे. वाळूवर मासे, कासव आदी जैवविविधता अवलंबून आहे. तिच्यावरही विपरीत परिणाम होतो. गोदापात्रातील वाळू उपशामुळे भविष्यात या प्रदेशालाही मोठा धोका होऊ शकतो.
सुमेरा अब्दुल अली, आंतरराष्‍ट्रीय पर्यावरणवादी, सचिव, बीएनएचएस, मुंबई


शासनाने भान ठेवावे
पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी वृक्षलागवडीशिवाय उत्खनन प्रामुख्याने थांबवणे आवश्यक आहे. उत्तराखंडसारखी परिस्थिती आपल्याकडेदेखील उद्भवू शकते याचे भान प्रशासनाने ठेवले पाहिजे.
विजय दिवाण, पर्यावरणतज्ज्ञ