आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वन वे नावालाच, वाहतुकीचा बट्ट्याबोळ, नियम मोडण्यात दुचाकीस्वार, अॉटो आघाडीवर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून महानगरपालिका आणि वाहतूक पोलिसांनी शहरातील गजबजलेले पण अरुंद असलेले रस्ते वन वे म्हणून घोषित केलेले आहेत. मात्र, सध्या वन वे आणि नो एंट्रीच्या नियमांना वाहनधारक अजिबातच जुमानत नसल्याचे दिसत आहे. शहरातील कुठलेही वन वे हे वन वे राहिले नसून त्यावरून सर्रास दुहेरी वाहतूक होत आहे. गेली अनेक महिने हे नियम मोडले जात असल्याने पोलिसांनाही वन वेचा विसर पडल्याचे दिसते. त्यामुळे कारवाई होत नाही. परिणामी, बहुतांश वर्दळीच्या रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी ही नित्याचीच बाब झाली आहे.
हे आहेत वन वे
पैठणगेट ते गुलमंडी (टिळकपथ), गुलमंडी ते वाहतूक सहायक पोलिस आयुक्त कार्यालय (गोमटेश मार्केट), पैठणगेट ते तापडिया नाट्यमंदिर, सिटी चौक ते सुपारी हनुमान, बारुदगर नाला ते रंगार गल्ली- मछली खडक, तसेच यालाच समांतर येण्यासाठी दक्षिणेकडील रस्ता, चेलीपुऱ्याकडून संस्थान गणपतीकडे जाणारा रस्ता, बांबू मार्केटकडून गांधी पुतळ्याकडे येणारा रस्ता आदी सर्व मार्ग हे वन वे आहेत.
गुलमंडी, मछलीखडक, पानदरिबा आदी जुन्या भागातील गल्ल्या मुळातच अरुंद आहेत; तरीही या भागातून वाहतूक करणाऱ्या रिक्षा आणि दुचाकीस्वार बेधडक वन वेमध्ये प्रवेश करतात. यामुळे वाहतूक कोंडी तर होतेच शिवाय अनेकदा वाहनधारकांमध्ये वादही उद््भवतात. वर्दळीच्या अरुंद असलेल्या शहरातील जुन्या भागांतील नागरिकांना सतत वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो.

पोलिसांकडे नाही अद्ययावत यादी
सध्या शहरात असलेल्या वन वेंची यादी वाहतूक शाखेकडे नाही. ती मागितली असता मनपाकडून यादी मागवावी लागेल, आमच्याकडे ही यादी अद्ययावत नसल्याचे वाहतूक शाखेकडून सांगण्यात आले. पोलिस दलात नुकत्याच अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्याने त्यांना याबाबत पुरेशी माहिती नसल्याचे निदर्शनास आले.

चेलीपुऱ्यातील व्यापारी, दुकानदार रस्त्यांवरच त्यांची वाहने लावतात, रिक्षाचालकही पार्किंग करतात. त्यामुळे सकाळी अकरा ते रात्री वाजेपर्यंत येथे वाहतुकीची कोंडी होते. पोलिसांनी यावर उपाय काढावा आणि आमचा त्रास कमी करावा. - राजीव पोलसाने

गोमटेश मार्केटमध्ये रस्त्यावर आलेली पार्किंग
{वाहतुकीसाठी शहराचे बदलते स्वरूप आणि वाहनांची वाढती संख्या लक्षात घेता सुरळीत आणि सुरक्षित वाहतुकीसाठी सध्या अस्तित्वात असलेल्या वन वेंची फेररचना करून नवीन रस्त्यांचा यात समावेश केला जाऊ शकतो.

{जुन्या परिसरातील अगदीच अरुंद गल्ल्यांचा वन वेमध्ये समावेश आहे; पण याऐवजी अतिक्रमण हटवून रस्ता रुंदीकरण केलेल्या काही बऱ्यापैकी मोठ्या रस्त्यांनाही वन वे केले जाऊ शकते. परिणामी वाहतूक कोंडीच्या प्रश्नाबरोबरच अपघातही टाळले जाऊ शकतील आणि रस्त्यावरील पार्किंगचा प्रश्नही सोडवला जाऊ शकतो.

{वन वेच्या फेररचनेबाबत वाहतूक शाखेचे सहायक पोलिस आयुक्तही सकारात्मक असून आवश्यकता भासल्यास आयुक्तांसोबत चर्चा केली जाईल, असेही ते म्हणाले.

...तर आयुक्तांसोबत चर्चा करू
शहरातसध्याअसलेल्या वन वेंवर वाहतूक पोलिस तैनात आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांवर नियमितपणे कारवाईही सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून रस्त्यांवर अतिक्रमण करून बसणाऱ्यांचे अतिक्रमण हटवण्याचे काम वाहतूक पोलिसांच्या वतीने करण्यात आले. त्यातून बऱ्यापैकी वाहतूक कोंडी फुटण्यास मदत झाली. गेल्या सहा महिन्यांत तरी नवीन वन वे जाहीर करण्यात आलेले नाहीत, परंतु शहराच्या गरजेनुसार नवीन मार्गाचा नव्याने विचार करण्यास हरकत नाही. याबाबत आयुक्तांसोबत चर्चा केली जाईल. -सी. डी. शेवगण, सहायकपोलिस आयुक्त, वाहतूक शाखा

चेलीपुऱ्यात नेहमीच चक्का जाम
चेलीपुऱ्यातून शहागंजकडे जाणारा रस्ता वन वे करण्यात आलेला आहे; परंतु या रस्त्यावरून नेहमीच दुहेरी वाहतूक होते. जुनी मंडई असल्याने विविध किराणा दुकानांत आठवडी बाजार करण्यासाठी हर्सूल, सावंगी, नायगाव, जटवाडा आदी गावांतील नागरिक येथे कायम येतात. तर औरंगपुरा, मध्यवर्ती बसस्थानक, गुलमंडी आदी भागांत प्रवासी वाहतूक करणाऱ्या अॉटोरिक्षांचे प्रमाण जास्त आहे. या रिक्षा सर्रास वन वेच्या नियमाचे उल्लंघन करतात. विशेष म्हणजे येथे कधीच वाहतूक पोलिस नसतो. अनेकदा नागरिकच वाहतूक कोंडी फोडण्यासाठी रस्त्यावर उतरतात.

फलक गायब
वनवे आणि नो एंट्री असलेल्या रस्त्यावर तसे फलक हवेत. पण सध्या काही ठरावीक रस्ते वगळता बहुतांश रस्त्यांवर ते नाहीतच. ज्या मार्गांवर ते आहेत त्या ठिकाणी ते दिसणार नाहीत अशाच ठिकाणी लावले गेले आहेत. त्यामुळे वाहनधारकांना याची माहिती मिळत नाही आणि ते वन वे किंवा नो एंट्रीमध्ये प्रवेश करतात. नो एंट्री तसेच वन वेचे फलक लावण्याची जबाबदारी मनपाची असते.
बातम्या आणखी आहेत...