आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कांदा मिळू शकतो सव्वाआठ रुपयांनी स्वस्त

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - सर्वसामान्य ग्राहक एक किलो कांदा खरेदीसाठी 25 रुपये खर्च करतो. त्यातले तब्बल साडेआठ रुपये व्यापारी निव्वळ नफा म्हणून काढून घेतात, तर 7 रुपये अनुषंगिक खर्चात जातात. कांदा उत्पादन करणार्‍या शेतकर्‍याला साडेनऊ रुपये मिळतात. त्यातून 6 रुपये उत्पादनाचा खर्च जातो, असे ‘दिव्य मराठी’ने केलेल्या पाहणीत आढळून आले आहे. शेतकर्‍यांनी थेट ग्राहकापर्यंत कांदा पोहोचवला तर कांद्याची किंमत तब्बल 8 रुपयांनी म्हणजे 33 टक्क्यांनी कमी होते. महागाई अर्थात जीवनावश्यक वस्तूंची किंमतवाढ कशी होते, याचा आढावा घेण्याचा प्रयत्न करताना ही वस्तुस्थिती समोर आली. सर्वसामान्यांच्या जेवणातला घटक असलेल्या कांद्याची भाववाढ कोणत्या टप्प्यांवर होते हे शोधताना प्रत्येक टप्यावर संबंधितांशी चर्चा केली आणि हिशेब विचारला. त्यांनी दिलेल्या हिशेबानुसार विपणनाच्या साखळीतल्या दोन कड्या कमी केल्या तरी किमान 20 टक्क्यांनी कांद्याची किंमत कमी होऊ शकते, हे स्पष्ट झाले.

अशी वाढत जाते कांद्याची किंमत
एक किलो कांद्यासाठी साधारण अडीच रुपये खर्च करीत (वाहतूक, हमाली, अडत इत्यादी) शेतकरी कांदा बाजार समितीत आणतो. त्याला घाऊक व्यापारी एका किलोसाठी 12 रुपये देतो. तिथेच घाऊक व्यापारी तो कांदा 14 रुपये दराने दलालाला आणि दलाल 17 रुपये दराने किरकोळ व्पापार्‍याला विकतो.या दोघांनाही इतर काहीही खर्च करावा लागत नाही. किरकोळ व्यापारी किलोमागे साडेचार रुपये अनुशंगिक खर्च करतो आणि 25 रुपये दराने उपभोक्तयाला विकतो. म्हणजे शेतकरी आणि उपभोक्ता यांच्यातील तीन मध्यस्थ किलोमागे 8 रुपये (बाजार मूल्याच्या 33 टक्के) कमावतात. ते टप्पे टाळले तरी शेतकरी 17 रुपये दराने कांदा विकतात. त्यांचा नफाही 5 रुपयांनी वाढू शकतो.