आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सॉफ्टवेअरमध्ये अडकला जनगणनेचा अंतिम डाटा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - जिल्ह्यात तीन वर्षांपासून सामाजिक, आर्थिक, जातनिहाय जणगणनेची प्रक्रिया सुरू आहे. ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून सध्या ऑनलाइन डाटा अपलोड करण्याचे काम भेल कंपनीला दिले आहे. मात्र, ज्या सॉफ्टवेअरमध्ये माहिती अपलोड करत आहेत, त्यामध्ये अडचण येत आहे. त्यामुळे ऑनलाइन डाटा अपलोडचे काम सद्य:स्थितीत बंद आहे. यामुळे अंतिम याद्या होण्यास विलंब होत असल्याचे समोर आले आहे.
गेल्या वर्षात प्रसिद्ध होणाऱ्या सामाजिक, आर्थिक, जात सर्वेक्षणाच्या याद्या निवडणुका आणि सर्वेक्षणातील अडचणींमुळे अद्यापही प्रसिद्ध करण्यात आल्या नाहीत. दोन आठवड्यांपूर्वीच नोंदींमध्ये जातीच्या चुका झाल्यामुळे पुन्हा दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते. दुरुस्ती झाल्यानंतर नव्याने डाटा मुख्य सर्व्हरवर टाकण्याचे काम सुरू होते, परंतु ज्या सॉफ्टवेअरमध्ये सर्वेक्षण करण्यात आलेली माहिती सर्व्हरवर अपलोड करण्यात येत होती, तीच अपलोड होत नाही. त्यामुळे आतापर्यंत करण्यात आलेल्या कामाचा कोणताच फायदा होताना दिसून येत नाही.

जातनिहाय जनगणनेसह दारिद्र्यरेषेखालील यादीही याच सर्वेक्षणावर अवलंबून होती. मात्र, माहितीच टाकण्यात येत नसल्याने सर्व प्रक्रिया थांबली आहे. यासाठी आणखी किती दिवसांचा अवधी लागेल, हे केवळ तांत्रिक तज्ज्ञच सांगू शकणार असल्याचे समोर आले.
आठ दिवसांत काम पूर्ण होईल
सध्याशासनाकडून नवीन सॉफ्टवेअरची मागणी करण्यात आली आहे. एक- दोन दिवसांत शासनाकडून सॉफ्टवेअरची अडचण दूर करण्यात येणार आहे. त्यानंतर आठच दिवसांत हे सगळे काम पूर्ण होणार असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे.
पुढील आठवड्यात याद्यांचे काम पूर्ण
शासनाकडून सॉफ्टवेअरमधील अडचणी तत्काळ सोडवण्यात येणार आहेत. त्यामुळे पुढील आठवड्यात याद्यांचे काम पूर्ण होणार आहे. त्यानंतर लगेच याद्या उपलब्ध होतील. एस.बी. लांगोरे, प्रकल्पसंचालक