आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सावधान! आमिषापासून दूर राहा!!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘हॅलो, अभिनंदन! तुमच्या मोबाइल क्रमांकाला 10 लाख ब्रिटिश पौंडांची लॉटरी लागली आहे. तुम्ही तुमची संपूर्ण माहिती, बँक खाते क्रमांक इत्यादी एसएमएस करा आणि 23 हजार रुपये अमुक बँक खात्यावर तत्काळ भरा.’ असा एखादा फोन, मोबाइलवर एसएमएस किंवा ई-मेल येताच संबंधित व्यक्तीची लालसा जागृत होते आणि लालसेपोटी आपली संपूर्ण माहिती, बँक खाते आणि पासवर्डसह अन्य तपशील फसवणूक करणार्‍यास पाठवला जातो. नंतर पश्चात्ताप करूनही फायदा होत नाही.

फसवेगिरीचा दुसरा प्रकार म्हणजे वर्तमानपत्रांत छोट्या जाहिराती देऊन लोकांना आमिष दाखवणे. अशा जाहिरातींद्वारे स्वत:च्या मालकीच्या जागेवर नामांकित कंपनीचे टॉवर बसवा आणि लाखो रुपये कमवा, अशी लालूच दाखवली जाते. एका दिवसात 30 टक्के सबसिडीसह कर्ज देण्याबाबतही छोट्या जाहिराती प्रसिद्ध होत असतात. त्यातही लोक फसवणूक करणार्‍याच्या जाळ्यात अलगद अडकतात. सायबर सेल किंवा पोलिस यंत्रणा अशा प्रकरणांचा तपास करतात; परंतु ठोस पुरावे सापडत नसल्याने त्यांचाही नाइलाज होतो. त्यामुळे फसवणूक करणार्‍यांचे चांगलेच फावते. फसवणूक करणारे लोक भारतीय स्टेट बँकेत खाते उघडून ग्राहकाला त्यात पैसे भरण्यासाठी सांगतात. या बाबी नेहमीच्याच झाल्याने बँकांमधील कर्मचारीही त्या गांभीर्याने घेत नाहीत. त्यामुळे अशा प्रकारांना बळी न पडता पोलिसांशी संपर्क साधने हाच उपाय आहे.
केस 1
थेट दिल्लीतून केली फसवणूक
एक लाख ते सात लाखांपर्यंतचे मालमत्ता कर्ज फक्त एका दिवसात आणि तेही 30 टक्के सबसिडीसह मिळेल, अशी छोटी जाहिरात 23 मार्च 2012 रोजी एका वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाली होती. हडको एन-9 येथील रहिवासी शिवाजी तुपे यांनी ही जाहिरात वाचून त्यातील मोबाइल क्रमांकावर लगेच फोन केला. एका व्यक्तीने फोनवरून स्टेट बँकेतील 032126910249 या खात्यावर 28 हजार 500 रुपये भरा, असे तुपे यांना सांगितले. त्यानंतर तुपे यांनी 12 हजार 750, 5 हजार 250 आणि 10 हजार 500 अशा तीन टप्प्यांत हे पैसे वरील खात्यात जमा केले. कागदपत्रे त्यांनी ई-मेलद्वारे पाठवली. त्यानंतर त्या व्यक्तीने तब्बल तीन महिने झुलवत ठेवले. तुपे यांनी 15 मे 2012 रोजी फोन केला असता हा फोन स्विच ऑफ असल्याचे स्पष्ट झाले. नंतर तुपे यांनी स्टेट बँकेत चौकशी केली असता हे खाते दिल्ली येथील अरविंद कुमार यांच्या नावे असल्याचे कळाले. आपण फसवले गेलो असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर पश्चात्ताप करूनही काहीच फायदा झाला नाही.
केस 2
टॉवरच्या नावाखाली गंडवले
घरावर मोबाइल टॉवर बसवा आणि लाखो रुपये कमवा, अशी छोटी जाहिरात एका वर्तमानपत्रात प्रसिद्ध करण्यात आली. उच्च न्यायालयात सचिव असलेल्या मुकुंदवाडीतील रहिवासी अताउल्ला अब्दुल सत्तार पठाण यांनी संबंधित व्यक्तीशी संपर्क केला. घरावर टॉवर बसवण्यासाठी 90 हजार रुपये अँडव्हान्स आणि दरमहा 86 हजार रुपये कमावण्याचे आमिष र्शेया गुप्ता आणि शुभम मिर्शा अशी नावे सांगणार्‍या लोकांनी दाखवले. नोंदणी शुल्क म्हणून पठाण यांनी स्टेट बँकेच्या खात्यात 6 हजार 130 रुपये जमा केले. त्यानंतर पठाण यांनी वारंवार फोनवरून संपर्क केला; पण त्यांना कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. नंतर दोघा भामट्यांनी फोन बंद करून टाकला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पठाण यांनी पोलिसांत
तक्रार दाखल केली.
केस 3
फसवेगिरी असल्याचे आधीच समजल्याने वाचले
गजानन नगरातील रहिवासी कल्याण जगताप यांना 8447326691 या मोबाइलवरून सकाळीच फोन आला. ‘हॅलो, ईसपीएन-स्टार क्रिकेट मोबाइल अवॉर्ड, यूके येथून मी डिप्लोमॅट अँथनी मॅगनोली बोलतो. तुम्हाला 10 लाख ब्रिटिश पौंडांची लॉटरी लागली असून ही रक्कम तुम्हाला देण्यासाठी मी आजच भारतात आलो आहे.’ हे वाक्य ऐकल्यावर ही फसवेगिरी असल्याचे समजून जगताप यांनी फोन बंद केला. नंतर पुन्हा त्याच क्रमांकावरून फोन आला आणि जगताप यांनी तोसुद्धा कट केला. त्यानंतर, तुम्ही 23,700 रुपये 20120955669 या स्टेट बँकेतील खात्यावर जमा करा, असा एसएमएस सुबीर घोष यांच्या नावाने जगताप यांच्या मोबाइलवर पाठवला. त्यानंतर पुन्हा दिल्ली येथून सीमा सिन्हा असे नाव सांगणार्‍या या महिलेचा फोन आला. तिने जगताप यांना त्यांच्या बँक खात्याचे डिटेल्स पाठवण्यास सांगितले. जगताप यांना ही फसवेगिरी असल्याचे लक्षात आले होते. त्यामुळे त्यांनी कोणताच प्रतिसाद दिला नाही आणि नंतर फोन येणे बंद झाले. या केसमधील व्यक्ती जागरूक असल्याने आपली फसवणूक होऊ शकते हे तिच्या लक्षात आले. परिणामी कुठलीही फसवणूक होऊ शकली नाही.

आर्थिक गुन्हे शाखेशी संपर्क साधावा
फसवणूक करणारे लोक नवीन सिम कार्ड खरेदी करतात. मात्र, अँड्रेस प्रूफचे व्हेरिफिकेशन होईपर्यंत हे लोक या सिम कार्डाचा वापर करून लगेच ते फेकूनही देतात. त्यामुळे त्यांच्यापर्यंत पोहोचणे अवघड जाते. कारण त्यांचा पत्ता किंवा अन्य माहिती मिळत नाही. हे लोक दिल्लीवरून फोन करतात आणि त्यांचे एटीएम विथड्रॉल केरळ येथून होतात. म्हणजेच ते केरळातून पैसे काढून घेतात. तसेच विविध राष्ट्रीयीकृत बँकांमध्येही आमिषाला बळी पडू नये असे सूचना फलक लावण्यात येतात. तरीही या घटना घडतात. त्यामुळे सर्वसामान्य जनतेने जागरूक राहायला शिकले पाहिजे. वर्तमानपत्रांतील किंवा इतर जाहिरातींमधील भूलथापांवरही विश्वास ठेवून कदापि व्यवहार करू नयेत. कोणतीही शंका असल्यास 2344420 या हेल्पलाइनवर संपर्क साधावा.
अविनाश आघाव, पोलिस निरीक्षक, सायबर गुन्हे शाखा