आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादेतील तेरा ठाण्यांवर आता पोलिस आयुक्तांची नजर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- अनेक वेळा पोलिस नागरिकांची मदत करत नाहीत, अशी ओरड होते. हीच बाब लक्षात घेऊन पोलिस आयुक्त संजयकुमार यांनी आयुक्तालय हद्दीतील सर्व ठाण्यांत सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. केबिनमध्ये बसूनच आता आयुक्त 13 ठाण्यांतील कारभारावर लक्ष ठेवतील.

नागरिकांच्या तक्रारी नोंदवण्यासाठी उशीर केला जातो किंवा कधी कधी तक्रारी नोंदवल्याही जात नसल्याचा अनेकांचा अनुभव आहे. यासाठी पोलिस महासंचालक संजीव दयाळ यांनी प्रत्येक पोलिस ठाण्यात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची सूचना राज्यातील पोलिस आयुक्तांना केली होती. त्यानुसार वर्षभरात शहरातील 13 पोलिस ठाण्यांत सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. सर्वप्रथम ठाणे अंमलदारासह एक अधिकारी आणि एक शिपाई यांनी तक्रारदाराची तक्रार नोंदवून घ्यावी. तक्रारदाराला जास्त वेळ ठाण्यात बसू दिले जाऊ नये, अशा सूचना केल्या होत्या. त्याचप्रमाणे पोलिस ठाण्यातील कारभारावर दोन्ही परिमंडळातील पोलिस उपायुक्त लक्ष ठेवून होते. मात्र, आता खुद्द पोलिस आयुक्तच पोलिस निरीक्षकांसह ठाण्यातील कारभारावर लक्ष ठेवणार आहेत. ही यंत्रणा कार्यान्वित होऊन तीन दिवसांचा कालावधी लोटला आहे.

प्रत्येक पोलिस ठाण्यात चार ते पाच कॅमेरे
प्रत्येक पोलिस ठाण्यात चार ते पाच कॅमेरे बसवण्यात आले आहेत. ठाणे अंमलदार, निरीक्षकांची केबिन, मुद्देमाल खोली आणि पोलिस ठाण्याबाहेरील आवार अशा ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. पोलिस ठाण्यातील कारभारावर नजर ठेवण्यासाठी आयुक्तालयात स्वतंत्र कक्ष तयार करण्यात येत असून 24 तास नजर ठेवली जाणार आहे.