आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जायकवाडीत केवळ १.३८ टक्के जलसाठा, पाणीटंचाईचे सावट उभे राहण्याची शक्यता

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पैठण - जूनच्या पहिल्याच आठवड्यात झालेल्या दमदार पावसामुळे जायकवाडी धरणात दीड टक्का पाण्याची पातळी वाढली होती; परंतु पावसाने उघडीप दिल्याने वाढ झालेले १.६५ टक्के पाणी पंधरा दिवसांत संपले आहे. सध्या जायकवाडी धरणाचा साठा १.६० वर आला आहे. मागील वर्षी जूनमध्ये हा साठा ४.३८ टक्के एवढा होता. पंधरा दिवसांत पाऊस झाला नाही तर पातळी मृत साठ्यावर येण्याची दाट शक्यता विभागाकडून वर्तवली जात आहे.

जायकवाडी धरणाच्या पाण्यावर औरंगाबाद, जालन्यासह ४०० गावांना पिण्याचा पाणीपुरवठा होतो, तर परभणी, बीड, नगर जिल्ह्यातील शेती व परळी थर्मलला पाणीपुरवठा धरणातूनच होतो. गेल्या वर्षी ‘दिव्य मराठी’ने धरणाच्या पाण्याच्या नियोजनासंदर्भात वृत्तमालिका प्रकाशित केल्याने पाटबंधारे विभागाने वर्षभराच्या पाण्याचे योग्य नियोजन केले. त्यामुळे सिंचनासाठी दोन पाणी पाळ्या, परळी थर्मलला दोन वेळा पाणी दिले. शिवाय आपेगाव हिरडपुरी बंधाऱ्यात तीन वेळा पाणी दिले. मात्र, त्यानंतर पाण्याचे नियोजन राजकीय पुढाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे झाल्याने पावसाळ्यापूर्वीच धरणाचा पाणीसाठा एक टक्क्यावर आला होता. त्यात यंदा जून महिन्यातच दमदार पावसाने धरण क्षेत्रावर हजेरी लावल्याने धरणात दीड टक्का पाण्याची वाढ झाली होती. मात्र, जूनच्या दुसऱ्या आठवड्यात पावसाने ओढ दिल्याने व पाणी उपसा पुन्हा शेतीला व पिण्यास वाढल्याने आता जायकवाडीचा पाणी साठा १.६० वर आला आहे. पंधरा दिवसांत धरणक्षेत्र व वरील भागात पाऊस झाला नाही तर पातळी मृत साठ्यावर येण्याची शक्यता आहे.
दोन लाख क्षेत्र ओलिताखाली
औरंगाबाद, जालना, परभणी, नगर, बीड या जिल्ह्यांतील १,८३,३२२ हेक्टर क्षेत्र धरणाच्या पाण्याखाली येते.

जायकवाडीत १५ दिवस पुरेल एवढे पाणी
^पहिल्या दमदार पावसाने धरणाच्या पाणी साठ्यात वाढ झाली. मात्र, आता साठा दीड टक्का झाला असून हा साठा पंधरा दिवस पुरेल. त्यानंतर मृत पाणी साठ्यातून पाणी उपसा करावा लागण्याची शक्यता आहे.
अशोक चव्हाण, शाखा अभियंता, पाटबंधारे विभाग, जायकवाडी