आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

DvM SPL: औरंगाबाद जिल्ह्यात बँकांनी केले फक्त 21 टक्के कृषी कर्जवाटप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- शेतकऱ्यांचा कर्जमाफीचा घोळ, सतत बदलणारे नियम  यामुळे शेतकऱ्यांना कृषी कर्ज मिळणे अवघड झाले आहे.  १५ जुलैनंतरही मराठवाड्यात फक्त १५ टक्के  कृषी कर्जवाटप झाले आहे. औरंगाबाद जिल्ह्यात केवळ २१ टक्के कृषी कर्जवाटप झाले असून गेल्या वर्षी १५ जुलैपर्यंत ९३ टक्के शेतकऱ्यांना कर्ज मिळाले होते. आता खरीप हंगाम संपण्यापूर्वी कर्जमाफी  होण्याची शक्यता नसून यानंतरच नवीन कृषी कर्ज दिले जाईल, असे दिसते.  

पेरणीची वेळ आली तरी शेतकऱ्यांना खरिपाचे कर्ज वाटप संथ गतीने होत आहे.  लातूर विभागात ६३२२ कोटींचे उद्दिष्ट असताना २ लाख ३५ हजार १३७ शेतकऱ्यांना  ९९२ कोटींचे कर्जवाटप झाले.  औरंगाबाद जिल्ह्यात आतापर्यंत ७२ हजार ३७६  शेतकऱ्यांना २६२ कोटींचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. 

गेल्या वर्षी १५ जुलै रोजी जिल्ह्यात ६२६ कोटी (९३.२६ टक्के) रुपये कर्जवाटप झाले होते. यामध्ये गेल्या वर्षी जिल्हा बँकेने २७८ कोटी, व्यापारी बँकांनी २८४ आणि ग्रामीण बँकेने ६३ कोटींचे वाटप केले होते. यावर्षी जिल्हा मध्यवर्ती बँकेने १६७ कोटी (३७ टक्के)  व्यापारी बँकांनी  ७२ कोटी (११ टक्के) आणि ग्रामीण बँकेने २२ कोटींचे (२० टक्के) कर्जवाटप केले आहे.   

व्यापारी बँकांकडून केवळ १० टक्के कर्जवाटप
कर्जवाटपात व्यापारी बँका  पिछाडीवर आहेत.  औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली या चारही जिल्ह्यांत ३२०८ कोटींचे कर्जवाटपांचे उद्दिष्ट आहे. मात्र प्रत्यक्षात २२ हजार ८०० शेतकऱ्यांना  ३३० कोटींचे वाटप करण्यात आले आहे. हे प्रमाण केवळ १०.३० टक्के इतके आहे. गेल्या वर्षी १५ जुलैला १४९५ कोटींचे वाटप करण्यात आले होते. तर लातूर विभागात ४१६८ कोटींचे उद्दिष्ट असताना केवळ ३४ हजार १५५ शेतकऱ्यांना ३१७ कोटींचे वाटप करण्यात आले आहे. हे प्रमाण केवळ ७.६२ टक्के आहे. गेल्या वर्षी याच दिवशी  ११५० कोटींचे वाटप करण्यात आले होते.  

बँका व लोकप्रतिनिधी जबाबदार  
जिल्हा  बँकेकडे पैसे असतानाही त्यांनी शेतकऱ्यांना दहा हजारांचे वाटप केले नाही. एरवी संघर्ष यात्रा काढणारे नेतेही मौन बाळगून आहेत. बँकेवर फौजदारी गुन्हे दाखल व्हायला पाहिजेत. तसेच कलेक्टरही  जिल्हास्तरावर  आढावा घेत नसल्यामुळे शेतकऱ्यांना कर्ज मिळणे अवघड झाले आहे. जूनपूर्वीच कर्ज मिळाले तरच फायदा होतो.  
- किशोर तिवारी, अध्यक्ष वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशन  

खरिपापूर्वी कर्ज मिळणे अवघड  
कृषी कर्जवाटपाचे नियम सातत्याने बदलत आहेत. आर.बी.आयकडूनही अजून  याबाबत स्पष्टता आलेली नाही. त्यामुळे शेतकरीदेखील कर्जमाफी कधी होणार याची वाट पाहात आहे. अजून याद्याचेच काम सुरू आहे. त्यामुळे खरिपापूर्वी नव्याने शेतकऱ्याना कर्ज मिळण्याची शक्यता नाही.  
- देविदास तुळजापूरकर, सहसचिव एआयबीईए  

शेतकरी अडचणीत  
सरकारच्या अर्धवट निर्णयामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. बँकांना स्पष्ट आदेश नसल्यामुळे कोणतीही प्रक्रिया पूर्ण केली जात नाही.  कर्जमाफीची यादीही तयार नाही. ही स्थिती खरीप हंगाम संपेपर्यंत शेतकऱ्यांना कर्ज मिळणे अवघड आहे. त्यामुळे शेतकरी आणखी अडचणीत येणार आहेत.  
- गोविंद जोशी, नेते शेतकरी संघटना