आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठवाड्यात 5% पाणीसाठा, जुलैच्या शेवटी पाणी संकट अधिक गंभीर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- जुलैच्या शेवटच्या आठवड्यात मराठवाड्यातले पाणी संकट अधिक गंभीर झाले आहे. मराठवाड्यातल्या सर्व ८४२ प्रकल्पांत केवळ ५ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. जिवंत पाणीसाठा पंधरा दिवस पुरेल इतकाच आहे. त्यामुळे आगामी काळात पाऊस न झाल्यास औरंगाबादप्रमाणे नांदेडलाही पाण्याची कपात करावी लागणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त उमाकांत दांगट यांनी ‘दिव्य मराठी’ला दिली.

जुलै महिना संपला तरी मराठवाड्यातल्या कोणत्याही प्रकल्पाच्या पाणीसाठ्यात वाढ झालेली नाही. जायकवाडी धरणात जिवंत पाणीसाठा संपून दहा दिवस झाले आहेत. मात्र, तरीही जायकवाडीत पाण्याच्या साठ्यात वाढ होण्याऐवजी घट होताना पाहायला मिळत आहे.

५ मोठे प्रकल्प पडले कोरडे
मराठवाड्यातल्या ११ मोठ्या प्रकल्पांपैकी ५ प्रकल्पांतला उपयुक्त पाणीसाठा संपलेला आहे. जायकवाडी, माजलगाव, मांजरा, निम्न तेरणा, सिना कोळेगाव या पाच प्रकल्पांत शून्य टक्के पाणीसाठा होता. गेल्या वर्षी या वेळेस जायकवाडीत ३९ दलघमी उपयुक्त पाणीसाठा (०२ टक्के) होता. सध्या मराठवाड्यात निम्न दुधना प्रकल्पात सर्वाधिक ६४ दलघमी (२६ टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे, तर ऊर्ध्व पैनगंगा १७ टक्के, विष्णुपुरी १५ टक्के, मानार ४, येलदरी १, सिद्धेश्वर २ टक्के पाणीसाठा आहे. येलदरी धरणात गेल्या वर्षी याच वेळेस ३९ टक्के पाणीसाठा होता.

दहा दिवसांत जायकवाडीतील पंधरा दलघमी पाणी कमी : १६ जुलैपासून जायकवाडीत मृत साठा सुरू झाला होता. सध्या जायकवाडीत ७२४ दलघमी पाणी असून गेल्या दहा दिवसांत पंधरा दलघमी पाणी कमी झाले आहे. जायकवाडीत मृतसाठ्यातून पाणी उपसा सुरू झाल्याने उद्योग तसेच मनपालादेखील दहा टक्के पाणी कपात करण्यात आलेली आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातले ७ प्रकल्प कोरडे : औरंगाबाद जिल्ह्यात १६ मध्यम प्रकल्प आहेत. त्यापैकी ७ मध्यम प्रकल्प कोरडे पडले आहेत. १६ प्रकल्पांची क्षमता २०५ दलघमी असताना २३ दलघमी (११ टक्के) इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. यामध्ये लाहुकी, गिरजा, वाकोद, अंबाडी, टेंभापुरी, कोल्ही, नारंगी हे प्रकल्प कोरडे पडले आहेत, तर सुखनामध्ये ४ टक्के, खेळणा १०, अजिंठा अंधारी १२, शिवना टाकळी, १० आणि बोरदहेगावमध्ये २५ टक्के पाणीसाठा आहे. औरंगाबाद जिल्ह्यातल्या ९० लघु प्रकल्पांत १८४ दलघमी क्षमता असताना १८ दलघमी (१० टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.)

‘पाणीप्रश्न सोडवू’
जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून येत्या पाच वर्षात मराठवाडा, विदर्भाची पाण्याची समस्या पूर्णपणे सोडवू, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

पंधरा दिवस पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक
मराठवाड्यात यावर्षी पाण्याची स्थिती गंभीर आहे. ५ टक्केच पाणीसाठा राहिल्यामुळे जिवंत पाणीसाठा पंधरा दिवस पुरेल अशी स्थिती आहे. हवामान खात्याने आगामी आठवडाभरात मराठवाड्यात चांगला पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तवल्यामुळे आशा वाटते. अन्यथा सर्वच प्रकल्पांतून मृत साठ्यातून पाणी उपसा करावा लागेल.
डॉ. उमाकांत दांगट, विभागीय आयुक्त
प्रकल्पाचे नाव- संख्या - टक्केवारी
मोठे प्रकल्प - ११ - ०५
मध्यम प्रकल्प- ७५ - ०९
लघु प्रकल्प - ७२८- ०५
गोदावरी नदीवरील बंधारे - ११ ०६
मांजरा नदीवरील बंधारे - १७ - ००
एकूण प्रकल्प - ८४२ - ०५