आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साडेेसात टीएमसीच पाणी पोहोचणार!, पाणीचोरी रोखण्याचे मोठे आव्हान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पैठण - नाशिक आणि नगर जिल्ह्यांतील धरणांतून जायकवाडी धरणात सुटणाऱ्या १२.८४ टीएमसीपैकी ७.५ टीएमसीच पाणी जायकवाडीत पोहोचणार असल्याचे पाटबंधारे विभागातील सूत्रांनी सांगितले. पिण्यासाठी तिसऱ्यांदा पाणी सोडण्याची परिस्थिती ओढवली आहे. असे असले तरी नाशिक आणि नगर जिल्ह्यांतील धरणांतून येणारे हे पाणी उन्हाळ्यापर्यंतही पुरणार नसून गोदापात्रातून येणाऱ्या पाण्याची चोरी रोखण्याचे मोठे आव्हान पाटबंधारे विभागासमोर आहे. पाऊण टीएमसी पाणीचोरी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

जायकवाडी धरणावर मराठवाड्याची तहान भागली जाते. मागील तीन वर्षे धरण मृत साठ्यात गेले. जायकवाडीच्या वरील भागातील मुळा, भंडारदरा, दारणा धरणातून पाणी सोडण्यात आले होते. आताही जायकवाडीत पिण्यासाठी १२.८४ टीएमसी पाणी सोडले जात आहे. यासाठी जायकवाडी पाटबंधारे विभागाने विशेष पथक केले आहे. या पथकाला प्रचंड विरोध होणार अाहे. संभाव्य पाणीचोरी लक्षात घेता गोदाकाठच्या कृषिपंपांची वीज बंद केली जाणार, हे ठरलेलेच आहे. त्यावर शेतकऱ्यांनीही नामी शक्कल लढवून डिझेल इंजिनच्या साहाय्याने पाणीचोरीचे नियोजन केले आहे. १२.८४ टीएमसी पाण्यापैकी पाऊण टीएमसी पाण्याची चोरी या माध्यमातून होऊ शकते.
नाशिक, नगर जिल्ह्यांमधून पाणी सोडल्याचा इतिहास
१९ आॅक्टोबर २०१२
ला भंडारदरा धरणातून २.५ टीएमसी पाणी सोडण्यात आले. त्यापैकी दीड टीएमसी पाणी जायकवाडीत आले.
२०१३ मध्ये
भंडारदरा, मुळा, दारणातून १०.५३ टीएमसी पाणी सोडले. प्रत्यक्षात ६.५२ टीएमसीच पाणी जायकवाडीत पोहोचले होते. नंतर डिसेंबर महिन्यात मुळातून ७.८९ टीएमसी पाणी जायकवाडीसाठी सोडले. मात्र, ३.५० टीएमसीच पोहोचले.
आता
१२.८४ टीएमसीपैकी ७.५० टीएमसीच पोहोचेल, असा अंदाज पाटबंधारे विभागाने व्यक्त केला आहे.
सध्या साडेचार टक्के पाणीसाठा
जायकवाडीत सध्या साडेचार टक्के साठा असून येणाऱ्या पाण्यामुळे हा साठा १२ टक्क्यांवर पोहोचू शकतो. जायकवाडीचा साठा कमी असल्याने पाणी फक्त पिण्यासाठीच राखीव आहे.
सहा पथकांची राहणार प्रक्रियेवर करडी नजर
पाण्याची चोरी आणि परिस्थितीवर देखरेख ठेवण्यासाठी सहा पथकांची नियुक्ती केली आहे. पथक प्रमुख जायकवाडी कार्यकारी अभियंता संजय भर्गोदेव असून त्याच्या अंतर्गत सर्व पथके काम पाहतील. मुळा धरणावर उपविभागीय अभियंता पी. आर. मुळे, निळवंडेवर एम. के. जाधव, मधमेश्वरवर एस. एस. भावठाणकर, जायकवाडीवर अशोक चव्हाण, औरंगाबाद कंट्रोल रुमवर यू. एस. कुलकर्णी, ओझर बंधाऱ्यावर पी. आर. बनसोड.

धार्मिकतेबरोबरच पाणी प्रश्नावरही खैरेंनी आक्रमक व्हायला हवे होते
आपले खासदार चंद्रकांत खैरे धार्मिक मुद्द्यावर तहसीलदाराला शिवीगाळ करतात. पाणी प्रश्नावर ते आक्रमक होत नाहीत. हे मराठवाड्याचे दुर्दैव असून आशा नेत्यामुळेच आपल्याला हक्काचे पाणी मिळत नाही.
संतोष गोबरे, शेतकरी, पैठण

दहा दिवस सुरू राहणार आवक !
१२.८४ टीएमसी पाणी जायकवाडीत वेगवेगळ्या मार्गांनी येणार आहे. या पाण्याची आवक किमान दहा दिवस सुरू राहील. मुळा ते जायकवाडीचे अंतर १०१ किमी, भंडारदराचे २०९ किमी, दारणा १०० किमी आहे. यादरम्यान २० हजारांहून अधिक वीज पंपाने पाणी उपसा होण्याची शक्यता आहे. वीजपुरवठा बंद केला तरी डिझेल इंजिनच्या साहाय्याने हा पाणी उपसा केला जाऊ शकतो ही बाब पाटबंधारे विभागाने मान्य केली आहे.

दोन दिवसांनी जायकवाडीत पाणी धडकणार
जायकवाडी पाटबंधारे विभागाचे पथक नियोजन करीत आहे. यासाठी सहा पथके नियुक्त केली अाहेत. सर्व परिस्थितीवर पथके लक्ष ठेवतील. सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यात येणार आहे. दोन दिवसांनी जायकवाडीत पाणी येण्याची शक्यता आहे.
अशोक चव्हाण, शाखा अभियंता

नाशिक, नगरची भूमिका चुकीची
वरच्या धरणातून जायकवाडीसाठी येणारे पाणी हे मराठवाड्याच्या हक्काचे आहे. यापुढेही हक्काचे पाणी मिळण्यासाठी मी वेळप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच राज्यपालांची भेट घेऊन व्यथा मांडेन. मराठवाड्यातील पाण्याबाबत आपण नेहमी आग्रही असणार आहोत. नगर, नाशिक येथील सर्वपक्षीय राजकीय पुढाऱ्यांनी जायकवाडीला पाणी न देण्याची भूमिका अत्यंत चुकीची आहे.
चंद्रकांत खैरे, खासदार
बातम्या आणखी आहेत...