आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Exclusive: ‘व्हिजिट महाराष्ट्र’च्या फक्त घोषणाच; ना बजेट, ना योजना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- राज्यातील पर्यटनाला जगाच्या नकाशावर पोहोचण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २१ महिन्यांपूर्वी २०१७ हे ‘व्हिजिट महाराष्ट्र वर्ष’ म्हणून साजरे करण्याची घोषणा केली. मात्र, या घाेषणेनंतर याेजनेबाबत एक पानही हललेले नाही. अर्थसंकल्पातही खास निधीची तरतूद झाली नाही. मुख्यालयातून काहीच अादेश न अाल्यामुळे विभागीय कार्यालयातील अधिकारीही हतबल झाले. त्यातच  या मोहिमेची आखणी करणाऱ्या तीन अधिकाऱ्यांची बदली झाल्यामुळे याेजना बासनात गेल्यातच जमा अाहे.

अर्थसंकल्पीय चर्चेला उत्तर देताना २५ मार्च २०१५ राेजी मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत ‘व्हिजिट महाराष्ट्र’ची घाेषणा केली हाेती. त्यानंतर सहा महिन्यांनी महाराष्ट्र इंटरनॅशनल ट्रॅव्हल्स मार्टच्या उद्घाटन कार्यक्रमातही २८ सप्टेंबर राेजी याच घाेषणेची पुनरावृत्ती केली. मात्र एक वर्ष उलटले तरी याेजनेबाबत काहीच कार्यवाही झाली नाही. वर्षभरानंतर ४ जुलै २०१६ राेजी पर्यटन आणि सांस्कृतिक खात्याच्या तत्कालीन प्रधान सचिव वल्सा नायर सिंग यांनीही पर्यटनाची राजधानी असलेल्या औरंगाबादेत आयोजित पर्यटन परिषदेत ‘व्हिजिट महाराष्ट्रा’ची रूपरेषा मांडली. नाेव्हेंबर महिन्यात वेरूळ महाेत्सवाच्या उद‌्घाटनप्रसंगी मुख्यमंत्र्यांनी पुन्हा या याेजनेसाठी यंत्रणेला सज्ज राहण्याचे अादेश दिले.  २३ मार्च राेजी पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी बर्लिन येथील पर्यटनाच्या आयटीबी २०१७ प्रदर्शनातही व्हिजिट महाराष्ट्राची माहिती दिली. अशा एकापाठाेपाठ एक घाेषणांचा धडाका सुरू असताना प्रत्यक्षात ही याेजना कागदावरच राहिली.

याेजना अाखणाऱ्या प्रमुख अधिकाऱ्यांच्या बदल्या
मुख्यमंत्र्यांनी ‘व्हिजिट महाराष्ट्र’ची घोषणा केली त्यावेळी एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक पराग जैन नानुटिया हाेते. गेल्यावर्षी त्यांच्या जागी डॉ.गोविंदराज आले. नंतर २२ मार्च रोजी ते सिकॉमच्या एमडी पदावर बदलून गेले. त्यांच्या जागी विजय वाघमारे आले. वल्सा नायर सिंग यांच्याकडून या याेजनेबाबत खूप अपेक्षा हाेत्या. मात्र नंतर त्यांचीही बदली झाली. त्यांच्या जागी नितीन गद्रे आले आहेत. सतीश सोनी अधिकारी देखील नुकतेच बदलून गेले आहेत. ज्यांनी ही योजना आखली तेच अाता पर्यटन खात्यात नसल्याने ‘व्हिजिट महाराष्ट्र’चे भवितव्य अंधकारमय झाले आहे.   

आतापर्यंत काय झाले   
- राज्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल 
आणि एमटीडीसीचे शिष्टमंडळ जपानच्या वाकायामा प्रांतास भेट देऊन आले. मात्र, औरंगाबादेत वाकायामाचे कार्यालय असताना व्हिजिट महाराष्ट्राची सुरुवात परत वाकायामापासून करण्याच्या अावश्यकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होते.   
- मुंबईच्या पर्यटनासाठी ओला कॅबसोबत करार.   
- वेरूळ महोत्सव, मुंबई आणि औरंगाबादेत हेरिटेज वॉकचे आयोजन 

पैशामुळे अडले घाेडे   
या योजनेची नेमकी स्थिती जाणून घेण्यासाठी ‘दिव्य मराठी’ने वल्सा नायर सिंग आणि डीजीएम चंद्रशेखर जैस्वाल यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोघांनी प्रतिसाद दिलेला नाही. अन्य एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर बजेटअभावी योजना अडचणीत आल्याचे सांगितले.
 
वल्सा नायर यांनी औरंगाबादेतील पर्यटन परिषदेत केलेल्या घाेषणा 
- राज्यातील पर्यटनस्थळांची जगभरात जोरदार कॅम्पेन.
- ऑक्टोबर मध्ये भारतातील सार्क देशांची पहिली पर्यटन परिषद औरंगाबादेत.
- वेरूळ-अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सवाचे अायाेजन
- बीबी का मकबराची जगभरात प्रसिद्धी. 
- औरंगाबादला देशाची इव्हेंट राजधानी बनवणे.
- सर्व पर्यटन शहरांचे वर्षभराचे इव्हेंट कॅलेंडर तयार करणे. 
- औरंगाबादसाठी शहर दर्शन बस सुरू करणे.
- हिमरू, पैठणीच्या विक्रीसाठी खास रोड शोचे आयोजन. 

अात्ताशी कुठे सुरुवात, अजून खूप पल्ला गाठायचाय !
व्हिजिट महाराष्ट्र अभियानाला या वर्षीपासून सुरुवात झाली. हे अभियान फक्त २०१७ साठीच नाही तर पुढे अनंत काळापर्यंत चालणार आहे. त्यामुळे काहीच काम  झाले नाही असे म्हणणे चुकीचे आहे. राज्यात पर्यटन वाढावे म्हणून आम्ही खूप नव्या योजना आणत आहोत. यासाठी १४० कोटींचा निधी दिला आहे. जस्टिन बिबरच्या कार्यक्रमाच्या आयोजनातही एमटीडीसीचा सहभाग होता. औरंगाबादमध्ये पर्यटन वाढावे म्हणूनही आम्ही अनेक योजना हाती घेतल्या असून त्या टप्प्याटप्प्याने पूर्ण हाेतील. नाशिक शहरासाठी १२ काेटी तर जिल्ह्यासाठी १८ कोटी रुपये देणार अाहाेत. नाशिकमधील पर्यटन सुविधांच्या कामांना गती देऊ. पर्यटन विभागातील काही अधिकारी चुकीची माहिती देत असतील तर त्यांना नोकरीवरूनच काढावे लागेल.
- जयकुमार रावल, पर्यटन मंत्री, महाराष्ट्र राज्य.
बातम्या आणखी आहेत...