औरंगाबाद - जायकवाडीच्या प्रश्नावरून कितीही संघर्ष पेटला आणि रान उठवले तरी भरपावसाळ्यातही कालव्याच्या माध्यमातून नगरकडे पाणी वळवणे थांबलेले नाही. जायकवाडीत येणारे मराठवाड्याच्या हक्काचे पाणी नांदूर-मधमेश्वरच्या दोन्ही कालव्यांतून वळवले जात आहे. गेल्या सात दिवसांत शहराला तीन महिने पुरेल इतके पाणी (14 दलघमी) वळवण्यात आले आहे.
गेल्या आठ दिवसांपासून नाशिकमध्ये चांगला पाऊस झाल्यामुळे जायकवाडीत वरच्या धरणातून पाणी सोडले जात आहे. त्यामुळे धरणात 10 टक्क्यांपेक्षा आधिक पाणीसाठा झाला आहे. मात्र, त्याच वेळी वरच्या धरणांतून पाणी सोडले जात असताना कालव्याच्या माध्यमातून हे पाणी नगरकडे वळवले जात आहे.
पावसाळ्यात पाणी सोडण्यावरून वाद सुरू असताना तसेच न्यायालयातही खटला सुरू असताना पाणी कालव्याच्या माध्यमातून वळवले जात आहे.
14 दलघमी पाणी वळवले
31 जुलैपासून नांदूर-मधमेश्वरच्या दोन्ही कालव्यातून पाणी सोडण्यात येत आहे. हे पाणी कोपरगाव, राहाता, शिर्डी तालुक्यांंत वळवले जात आहे. कडातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत 31 तारखेला डाव्या कालव्यातून 300 क्युसेक तर उजव्यातून 500 क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे. गेले सात दिवस सातत्याने डाव्या कालव्यातून 300 क्युसेक आणि उजव्यातून 500 क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे. साधारण 14 दलघमी पाणी या कालव्याच्या माध्यमातून वळवण्यात आले आहे. पालखेडमधूनही सहा ऑगस्टपासून 500 क्युसेक पाणी वळवण्यास सुरुवात झाली आहे.
मराठवाड्याचे हक्काचे पाणी सोडण्याऐवजी ते वळवले जात आहे. यावर कोणीच बोलत नाही. सत्ताधारी चोर आणि विरोधक शांत असल्यामुळे असा प्रकार होत असल्याची टीका शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष कैलास तवार यांनी केली आहे. समांतर योजनेवर आमदार बोलतात. मात्र, मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्याबाबत कोणीच बोलत नाही. वेळ निघून गेल्यावर ओरडून उपयोग नाही. त्यामुळे शेतक-यांना वाली राहिला नाही, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.