आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी यंदापासून चार ऐवजी फक्त तीन राउंड; अशी असेल प्रक्रिया...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- २०१७-१८ पासून इंजिनिअरिंगच्या प्रवेश प्रक्रियेत चार राउंड ऐवजी तीनच राउंड घेतले जातील. शेवटचा काउन्सिलिंग राउंड कमी करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी इंजिनिअरिंगच्या कॅप फेऱ्यांमध्ये फ्रिज, स्लाइड आणि फ्लोट हे पर्याय उपलब्ध असतील, अशी माहिती तंत्रशिक्षण विभागातर्फे देण्यात आली. 

राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे इंजिनिअरिंगची प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येते. बारावीनंतर मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी जेईई आणि सीईटीच्या माध्यमातून इंजिनिअरिंगच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतात. आतापर्यंत इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रियेत चार राउंड घेतले जायचे. परंतु यंदापासून तीनच राउंड होतील, असे उच्च तंत्र शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. महेश शिवणकर म्हणाले. 

आधारकार्ड, बँक डिटेल्स तयार ठेवा
प्रवेश प्रक्रियेबरोबरच जे विद्यार्थी राजर्षी शाहू छत्रपती शिष्यवृत्ती योजना, डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह भत्ता योजना, अल्पसंख्याक शिष्यवृत्ती थेट लाभार्थी योजनेचे लाभार्थी असतील, त्यांना आधार कार्ड आणि बँक डिटेल्स सादर करणे आवश्यक राहणार आहे. विद्यार्थ्यांनी ते तयार ठेवावेत. कारण यंदापासून शिष्यवृत्ती शिक्षण संस्थांना दिली जाणार नाही तर ती थेट विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे, असेही तंत्रशिक्षण विभागाने म्हटले आहे. 

लाभासाठी उपस्थिती आणि चांगला परफॉर्मन्सही आवश्यक
शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी आधारकार्ड आणि बँक अकाउंट्स महत्त्वाचे आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांची वर्गातील उपस्थिती आणि परफॉर्मन्सदेखील पाहिला जाणार आहे. वर्गातील नियमित उपस्थिती आणि परफॉर्मन्स चांगला असेल तरच या शिष्यवृत्तीचा लाभ मिळेल. 

अशी असेल प्रक्रिया...
प्रथम फ्रिज: विद्यार्थ्याला प्रवेश मिळालेल्या महाविद्यालयातच प्रवेश घ्यायचा आहे. अधिक चांगल्या महाविद्यालयाची अपेक्षा नाही हा पर्याय निवडल्यानंतर पुढच्या फेऱ्यांमध्ये सहभागी होण्यासाठी तो पात्र राहणार नाही. 

द्वितीय स्लाइड : यामध्ये विद्यार्थ्याला प्रवेश मिळालेल्या महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा आहे. मात्र त्याच महाविद्यालयामध्ये इतर शाखा मिळण्यासाठी तो इच्छुक असू शकतो. हा पर्याय निवडणाऱ्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या आणि तिसऱ्या फेरीमध्ये सहभागी होता येईल. 

तृतीय फ्लोट : यात विद्यार्थ्याने मिळालेल्या महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा आहे. अधिक चांगले महाविद्यालय मिळाल्यास तेथेदेखील तो प्रवेश घेण्यास इच्छुक राहील. या विद्यार्थ्यांना दुसऱ्या तिसऱ्या राउंडमध्ये सहभागी होता येईल. 
 
पुढील स्लाइडवर वाचा,
 इंजिनिअरिंगला इंटर्नशिपची सक्ती;अभ्यासक्रम बदलणार...
बातम्या आणखी आहेत...