आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

खुलेआम दारूच्या मैफली, महिलांची कुचंबणा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र: शहरात देशी दारू, विविध वाइन शॉपसमोरील रस्ते आणि फुटपाथवर ऑम्लेटच्या गाड्या दारू अड्डे बनले आहेत.
शहरात देशी दारू, विविध वाइन शॉपसमोरील रस्ते आणि फुटपाथवर ऑम्लेटच्या गाड्या दारू अड्डे बनले आहेत. दारुड्यांच्या सोईसाठी या गाड्यांवर सगळी सोय केली जाते. त्यामुळे सायंकाळी ५ ते रात्री ११ वाजेपर्यंत रस्ता व फुटपाथवर तळीरामांची जत्रा भरते. त्यामुळे नागरिकांना विशेषत: महिला व मुलींना या भागातून जा-ये करणेही कठीण होते.

हे आहेत ठरलेले अड्डे
शरद टी पॉइंट ते पवननगर, के सेक्टर सर्व्हिस रस्ता, हर्सूल टी पॉइंट, आंबेडकरनगर, क्रॉम्प्टन ग्रीव्हज कंपनीसमोर, सिडको बसस्थानक कार्यालयीन इमारतीसमोरील ग्रीनबेल्ट, गारखेडा परिसरातील हनुमाननगर जलकुंभ परिसर, पुंडलिकनगर ते गजानन मंदिर रोड, शिवाजीनगर जलकुंभ, कोकणवाडी मनपा मुख्य अग्निशमन केंद्र ते रेल्वेस्टेशन रोड, उस्मानपुरा पीरबाजार रोड, सिंधी कॉलनी ते सेंट फ्रान्सिस स्कूल, जयभवानीनगर ते मुकुंदवाडी रेल्वेस्टेशन रोड, क्रांती चौक ते पैठण गेट मार्ग, औरंगपु-यातील शिशुविहार शाळेच्या भिंतीला खेटून असलेले फुटपाथ.

...म्हणूनच होते अवैध विक्री
सरकारची तिजोरी आणि स्वत:चा गल्ला असे नफा-तोट्याचे गणित जुळवण्यासाठी मद्य विक्रेते कायदा धाब्यावर बसवून नियमांना बगल देतात आणि वर दारू दुकान खाली खाण्याची दुकाने थाटतात. काही ठिकाणी ३० ते ४० फुटांवर पार्टिशन करून अशा हॉटेल्स टाकून पिणा-यांना बसण्याची व चकण्याची सोय करून विक्री वाढवण्याचा प्रयत्न करतात. देशी दारू विक्री करणा-यांनी तर दारू दुकानांसमोरच हातगाड्यांवर दारू विक्री केल्याचे "डीबी स्टार' तपासात उघड झाले. शिवाय ऑम्लेटसोबत व्हेज-नॉनव्हेजची चव वाढल्याने दुकानांसमोरच दारुडे पेंगताना दिसतात.

अटकाव करायचा कुणी?
राज्य उत्पादन शुल्क विभाग बेकायदेशीर दारू विक्री, वाहतूक आणि सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणा-यांना अटकाव करण्यासाठी मनुष्यबळ नसल्याचे कारण पुढे करतो. कायदा व सुव्यवस्थेचा मुद्दा पुढे करून पोलिसांकडे बोट दाखवले जाते, तर या विभागाने नको तिथे परवाना देऊन कायदा व शांततेचा भंग करून आमचा ताप वाढवल्याचे पोलिसांकडून सांगितले जाते. त्यामुळे मुख्य रस्ते, चौक, सार्वजनिक पटांगणे, उद्याने, सामाजिक सभागृह गल्लीबोळ्या, फुटपाथवर दारुड्यांनी कब्जा केलेला आहे. परिणामी, नको तिथे धिंगाणा घालणा-या दारुडयांना थांबवायचे कुणी? त्यांची झिंग उतरवायची कुणी? यासाठी ठोस पावले उचलली जात नाहीत.

मनुष्यबळाचा तुटवडा
संपूर्ण औरंगाबाद जिल्ह्यात बेकायदेशीर दारू वाहतूक, विक्री व मद्यप्राशन करणा-या लोकांवर कारवाई करण्यासाठी अ, ब, क आणि ड असे चार विभाग पाडण्यात आले आहेत. यात केवळ १२० कर्मचारी आहेत. प्रत्येक विभागासाठी १ निरीक्षक, २ उपनिरीक्षक, ३ कॉन्स्टेबल, १ जमादार, १ वाहनचालक, १ वाहन आहे.

जिल्ह्यात एक भरारी पथक
संपूर्ण जिल्ह्यासाठी एक भरारी पथक आहे. यात १ निरीक्षक, २ उपनिरीक्षक, ३ जवान, १ वाहनचालक आणि १ वाहन आहे. त्यातच आहे त्याच कर्मचा-यांवर रात्रीची गस्त, विशेष मोहीम, शासनाला जिल्हाभरातील वेळोवेळी अहवाल सादरीकरण, माहितीचा अधिकार, परवाने देणे, नुतनीकरण करणे, तपासणी करणे, मद्याचे नमुने तपासणे, तक्रारीचे निवारण करणे, अवैध मद्यावर आळा घालणे अशी अनेक कामे असल्याने मनुष्यबळ कमी पडत असल्याचे या विभागाचे म्हणणे आहे.
महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ कलम ६५, ड व ख नुसार हातगाड्यांवर मद्य विक्री करणे व पिणे गुन्हा आहे. यावर पोलिस कायदा व सुव्यवस्थेच्या नियमानुसार अटकाव आणू शकतात. आमच्याकडे मनुष्यबळ नाही, तरीही महिन्यातून आम्ही सात ते आठ वेळा मोहीम हाती घेतो.
-शिवाजी वानखेडे, उपनिरीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभाग

तुम्ही सांगितलेल्या प्रत्येक रस्ता, फुटपाथवर आम्ही आजपासून सलग आठ दिवस कडक मोहीम राबवू. यासाठी आमचे गुन्हे शाखेचे आणि संबंधित त्या त्या पोलिस ठाण्याचे पथक तयार करू. अत्यंत शिताफीने ही कारवाई यशस्वी करणार आहोत.
-बाबाराव मुसळे, सहायक पोलिस आयुक्त, गुन्हे शाखा
काय म्हणतात महिला?
जयभवानीनगर चौक ते हनुमाननगरमार्गे पुंडलिकनगर रोड या मुख्य रस्त्यावर दारुडे पेंगत असतात. त्यामुळे या रस्त्यावर दारुड्यांचा खूप त्रास होतो.
-संध्या जाधव, जयभवानीनगर, सदस्य महिला सुरक्षा समिती
मुकुंदवाडीतील इंदिरा गांधी मार्केटमध्ये गाड्यांवर उघडपणे विक्री केली जाते. यामुळे लहान शालेय व महाविद्यालयीन मुलांना व्यसन जडत आहे.
दुर्गा भाटी, मुकुंदवाडी, सदस्य, महिला सुरक्षा समिती.
सिडको एन-३ कडून गणेशनगर मार्गावर अवैध दारू अड्ड्यामुळे संध्याकाळी महिला व मुलींना बाहेर पडणे मुश्कील होते.
मीना थोरवे, गणेशनगर
सायंकाळी पाच वाजेनंतर घर गाठण्यासाठी आम्हाला अक्षरश: गल्लीबोळातील रस्ता शोधावा लागतो.मुळात महिला या घाबरट असतात, त्यामुळे त्यांची तर खूपच कुचंबणा होते.
सुकन्या भोसले, विश्रांतीनगर