आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Operation Health : Cancer Patients Priyanka Girhe Not Getting Proper Treatment

पंचनामा आरोग्याचा : कॅन्सरग्रस्त प्रियंका गिर्‍हेचा उपचारांसाठी टाहो

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - प्रियंका दिलीप गिर्‍हे.. गाडेगाव (ता. पैठण, जि. औरंगाबाद) येथील अवघ्या 11 वर्षांच्या आणि सहावीत शिकणार्‍या चुणचुणीत मुलीला सहा महिन्यांपूर्वी रक्ताचा कर्करोग असल्याचे स्पष्ट झाले. पिता हंगामी कामगार व घरात विपन्नावस्था. तरीही एमजीएममध्ये उपचार सुरू केले. पण महागडे उपचार करणे अशक्य झाल्याने 28 फेब्रुवारीला घाटीत दाखल केले. आतापर्यंत औषधी व तपासण्यांवर लाख रुपये खर्च झाले. अजूनही महागड्या तपासण्या संपेनात; पण आता ते पित्याला शक्यच नसल्याने उपचार थांबल्यासारखे आहेत. दुर्दैव म्हणजे प्रशासकीय किंवा खासगी मदत करण्यासाठी कुणीच पुढे येईना! अशी अनेक उदाहरणे घाटीत हमखास दिसतात; पण फार कमी जणांना मदत मिळते.

गेल्या 15 दिवसांपासून प्रियंकाचे पिता दिलीप गिर्‍हे यांना ‘इम्युनो हिस्टोकेमेस्ट्री’ ही तपासणी बाहेरून करण्यास सांगितले जात आहे. ही तपासणी घाटीमध्ये होत नसल्याचे त्यांना डॉ. बी. के. शेवाळकर यांच्यासह इतर डॉक्टरांनी सांगितले. या तपासणीसाठी ‘मोक्षदा डायग्नोस्टिक सेंटर’ने त्यांना आधी नऊ आणि नंतर सात हजारांचा खर्च येईल, असे सांगितले.

सद्य:स्थितीत पित्याची सगळीच आर्थिक शक्ती संपली असून यापुढे कुठलेही उपचार करण्याची त्यांची ऐपत नाही. त्यामुळे जिथे-तिथे ते मदत मागत फिरत आहेत. दिलीप गिर्‍हे यांनी सांगितल्यानुसार, वैद्यकीय अधीक्षक डॉ. पी. एल. गट्टाणी यांच्याकडेही हा प्रश्न मांडला. मात्र, ही तपासणी इथे होत नाही, बाहेरूनच करावी लागेल, असे गिर्‍हे यांना सांगण्यात आले.

उपचारांसाठी चार महिन्यांपासून कामावर नसल्याने होते तेही उत्पन्न थांबले आहे. मुलीच्या आजाराचा धसका घेऊन आता वृद्ध वडीलही आजारी पडले आहेत. वडिलांकडे बघायचे की मुलीकडे, असा प्रश्न आहे. घाटीत का तपासण्या होत नाहीत, आमच्यासारख्या गोरगरिबांनी महागड्या तपासण्या कशा करायच्या, असा प्रश्नही त्यांनी दै. ‘दिव्य मराठी’च्या प्रतिनिधीपुढे उपस्थित केला.


‘जीवनदायी’तून मिळेना जीवन
जटवाडा येथील अबू रिहान हा सात वर्षांचा मुलगाही रक्ताच्या कर्करोगाने पछाडला असून 2 मार्चपासून घाटीमध्ये दाखल आहे. त्याला जीवनदायी योजना लागू होते; पण त्याला या योजनेअंतर्गत कुठलेच लाभ मिळाले नाहीत. बाहेरून औषधी व तपासण्यांचा खर्च 60 हजारांपर्यंत आला. अबू रिहान याचे पिता शेख अनिस शेख हनीफ यांची आर्थिक स्थिती नाजूक असून ते 200 रुपये रोजाने काम करतात. साडेदहा हजारांचे एक, अशी चार इंजेक्शन्सही त्यांना बाहेरूनच विकत घ्यावी लागल्याचे त्यांनी दै. ‘दिव्य मराठी’ला सांगितले.


काय करते रुग्ण सहायता केंद्र?
ज्या रुग्णांना बाहेरून महागडी औषधी आणण्यास सांगितली जाते; पण ते कुटुंबीयांना शक्य होत नाही, अशा रुग्णांना मदत मिळवून देण्याचे काम रुग्ण सहायता केंद्रातून होणे अपेक्षित आहे. मात्र, प्रियंका व अबू रिहान या बाल कर्करुग्णांना ही मदत मिळाली नसल्याचे ढळढळीत सत्य आहे. विशेष म्हणजे गिºहे हे वैद्यकीय अधीक्षक गट्टाणींना भेटले होते; पण त्यांनी त्यादृष्टीने काहीच केले नाही, हेही स्पष्ट झाले. यासंदर्भात गट्टाणी म्हणाले, ज्या तपासण्या इथे होत नाहीत त्या बाहेरून सांगितल्या जातात. वैद्यकीय मदतीविषयी ते काही ठोस सांगू शकले नाहीत.