आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काल -हे निझामाच्या बापाचे सरकार : राऊत आज -देवेंद्र तर दूरदृष्टीचे मुख्यमंत्री : कदम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - खासदार संजय राऊत आणि पर्यावरणमंत्री रामदास कदम हे दोघेही शिवसेनेचे नेते. मात्र, या दोघांत दुमत आहे की दुफळी, असा प्रश्न गुरुवारी पडला. कारण औरंगाबादेतील एकाच व्यासपीठावर एकाच विषयावर दोघांनी दोन वेगवेगळी वक्तव्ये केली. शिवसेनेत एका नेत्याने घेतलेल्या भूमिकेवर अन्य नेते, पदाधिकारी कार्यकर्ते ठाम राहतात. परंतु राज्यातील सरकार नेमके कोणाचे हे ठरवण्यावरून चित्र बदललेले दिसले.
बुधवारी शिवसेनेच्या वर्धापन दिन सोहळ्यात सिडकोतील संत तुकोबाराय नाट्यगृहात बोलताना राऊत यांनी ‘भाजपचे सरकार हे निझामाच्या बापाचे सरकार आहे,’ असे वक्तव्य केले. यामुळे राज्यभर खळबळ उडाली. भाजपनेही तातडीने शिवसेनेचे वागणे औरंगजेबासारखे असल्याचा टोला लगावला. एकूणच या प्रकरणावरून युतीतील बेबनाव टोकाच्या पातळीवर जात असल्याची चर्चा सुरू झाली. गुरुवारी कदम औरंगाबादेत होते. ज्या ठिकाणी काल राऊतांनी राज्य सरकारवर टीका केली त्याच तुकोबाराय नाट्यगृहात कदमांच्या हस्ते शेतकऱ्यांना मोफत बियाणे वाटपाचा कार्यक्रम होता. त्यात ते राऊत यांच्या सुरात सूर मिसळून आणखी कठोर हल्ला चढवतील, असे म्हटले जात होते. मात्र, कदम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे तोंडभरून कौतुक केले. ते म्हणाले, ‘देवेंद्र दूरदृष्टीचे मुख्यमंत्री आहेत. त्यांच्यासारखा मुख्यमंत्री कोणी नाही. पूर्वीच्या मुख्यमंत्र्यांनी दूरदृष्टी दाखवली असती तर आज मराठवाड्यात दुष्काळ पडला नसता. मात्र, देवेंद्र यांनी दूरदृष्टी ठेवून जलयुक्त शिवार हाती घेतले. आता दोन वर्षे पाऊस झाला नाही तरी या भागात दुष्काळ जाणवणार नाही.’

एकाच पक्षाच्या दोन नेत्यांची एकाच विषयावर दोन वेगवेगळी म्हणजेच परस्पर विरोधी मते समोर आल्याने कार्यक्रम संपल्यावर पत्रकारांनी कदम यांना गराडा घातला. तेव्हा ते म्हणाले, की ‘राऊत असे का बोलले हे त्यांना विचारा. ते बहुतेक दिल्लीच्या सरकारविषयी बोलले असतील. मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांविषयी बोललो आहे. फडणवीस यांनी केलेली कामे चांगलीच आहेत. चांगल्याला चांगले म्हटलेच पाहिजे, हा माझा स्वभाव आहे. त्यामुळे मी फडणवीस यांना चांगले म्हणालो. जे आहे ते आहेच’. ‘याचा अर्थ दिल्लीतील सरकार निजामाच्या बापाचे राज्यातील सरकार चांगले’ असे तुम्हाला म्हणायचे आहे काय? या प्रश्नावर कदम यांनी पुन्हा दिल्लीच्या सरकारविषयी तुम्ही राऊत यांना विचारा, मी फक्त राज्यापुरताच. राऊत दिल्लीत असतात. मी महाराष्ट्रात. ते दिल्लीच्या सरकारवर बोलले मी राज्यातील सरकारवर. यापेक्षा जास्त मी बोलू शकत नाही.’ दोघांमध्ये मतभेद आहेत काय, समान दर्जाचे नेते असे कसे काय बोलू शकता, यावर कदम यांचे एकच म्हणणे होते, ‘माझे म्हणणे बरोबर आहे, राऊत तसे का बोलले ते त्यांनाच विचारा.’

खैरेंशी मधुर संबंध; कदमांचा पुन्हा दावा
खैरेंनी एक लाख शेतकऱ्यांना जेवू घातले, हे सांगताना कदम म्हणाले, खैरेंनी मुलीच्या लग्नात अनेकांना जेवू घातले होते म्हणून बातम्या छापून आल्या. पण खैरेंनी गरिबांच्या मुलींना आपल्या मुली समजून एक लाख लोकांना जेवू घातले. कदम बोलत असताना शिवसेना संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर गालात हसत होते. हा धागा पकडून कदम म्हणाले, ‘घोसाळकर गालातल्या गालात का हसताहेत हे मला कळाले. मी खैरेंविषयी चांगले बोलू शकतो, याचे त्यांना हसू आले असावे. कदमांच्या या टोल्यावर हशा पिकला. त्यावर त्यांनी पुन्हा मी चांगल्याला चांगले म्हणतो, खैरे चांगलेच आहेत आणि आमच्यात वाद वगैरे काहीही नाही, अशी पुस्तीही जोडली.

बातम्या आणखी आहेत...