औरंगाबाद - दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकाला विरोध करून एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी वेगळ्या मुद्द्याला हात घातला. मुंडेंच्याच नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यापैकी कोणाचेच स्मारक उभारून पैशांची नासाडी नको, असे सांगतानाच त्यांनी मुस्लिमांना हज यात्रेसाठी दिली जाणारी सबसिडीही बंद करा, अशी मागणीही रेटली
आहे.
औरंगाबादेत मुंडे यांचे भव्य स्मारक उभारण्याचे राज्य सरकारने जाहीर केले आहे. जालना रस्त्यावरील शासकीय दूध डेअरीची तीन एकर जागा यासाठी देण्यात येणार आहे. तेथे मुंडेंचा पुतळा किंवा स्मारक उभारण्याऐवजी मुंडेंच्याच नावाने २०० खाटांचे रुग्णालय उभारावे अशी सूचना इम्तियाज यांनी केली. त्यावरून नव्या वादाला सुरुवात झाली असतानाच आज त्यांनी
फक्त मुंडेंच्याच स्मारकाला
आपला विरोध नाही तर छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. आंबेडकर व ठाकरे यांच्या स्मारकालाही विरोध असल्याचे स्पष्ट केले.
या स्मारकांसाठी एकूण १९०० कोटी रुपयांची उधळपट्टी होणार आहे. एवढ्या मोठ्या रकमेत गरिबांसाठी मोठी रुग्णालये उभारली जावू शकतात. मुलांच्या शिक्षणासाठी शाळा तसेच महाविद्यालयेही उभारता येतील. असे प्रकल्प राबवून त्यास या थोर नेत्यांची नावे देता येतील. केवळ स्मारके न करता लोकोपयोगी प्रकल्पांच्या माध्यमातून त्यांचे चिरंतन स्मारक असावे, असे जलील यांनी म्हटले आहे. शिवाजी महाराज, डॉ. आंबेडकर, स्व. ठाकरे, स्व. मुंडे या नेत्यांचे मोठेपण सर्व परिचित आहे, याबद्दल दुमत नाही, परंतु त्यांच्या स्मारकासाठी होणा-याखर्चातून लोकोपयोगी काम व्हावे एवढीच आपली मागणी असल्याचे ते म्हणाले.
... तर न्यायालयात जाऊ : सरकारने स्मारकांवरील खर्च थांबवला नाही तर आम्ही न्यायालयात जावू. शेवटी सरकारकडून खर्च होणारा पैसा जनतेचा आहे. आम्ही आता रितसर मागणी केली, तिचा विचार झाला नाही तर न्यायालयीन लढा देण्याचीही आमची तयारी आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
हज सबसिडीही बंद करा : केंद्र सरकारच्या वतीने दरवर्षी हज यात्रेला जाणा-यामुस्लिम बांधवांना सबसिडी दिली जाते. विमान भाड्याचा काही खर्च सरकार उचलते. हे अनुदान बंद करावे. धार्मिक कार्याला जाण्याची प्रत्येकाची इच्छा असते. धर्म कार्य ही प्रत्येकाची खासगी गोष्ट आहे. तेव्हा तो खर्च प्रत्येकाने आपल्या कुवतीनुसार करावा. त्यासाठी सरकारने आर्थिक मदत का करावी? असा सवाल करत हजचे अनुदान तातडीने बंद करण्याची मागणीही आमदार जलील यांनी केली.
वाद-प्रतिवाद
पैशांची नासाडी करून फक्त कोणत्याही नेत्यांंच्या स्मारकांच्या इमारती बांधण्यास अामचा विराेध अाहे, त्याचबराेबर हज यात्रेसाठी देण्यात येणारे अनुदान तत्काळ बंद करावे.
-इम्तियाज जलील, आमदार
त्या एमआयएमला शिवाजी महाराज, डॉ. आंबेडकर, ठाकरे, मुंडे हे कोण होते, हे माहीत आहे का? त्यामुळे अशा पक्षाच्या मागणीला किती किंमत द्यायची ते आम्ही ठरवू.
-विनोद तावडे, शिक्षणमंत्री.