आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opposition Leader Injured Aurangabad Corporation

औरगाबाद महाप‍ालिकेच्या सभेत विरोधी पक्ष नेत्याला राजदंडाने झाले जखमी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - औरंगाबाद महापालिकेत काहीही घडू शकते याचा प्रत्यय आज आला. जनतेसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या समांतर जलवाहिनी प्रकल्पाच्या भवितव्याविषयी चर्चा करण्यास महापौर कला ओझा यांनी बगल देताच संतापलेल्या विरोधकांनी राजदंड पळवला. या वेळी झालेल्या खेचाखेचीत राजदंडाचे टोक लागल्याने माजी विरोधी पक्षनेता प्रमोद राठोड यांचे डोके फुटले आणि मनपाच्या इतिहासात पहिल्यांदाच सभागृहात रक्त सांडले. सत्ताधार्‍यांचे गटनेते गिरजाराम हाळनोर यांनी केलेल्या हल्ल्यात राठोड जखमी झाल्याचा आरोप विरोधकांनी केला असला तरी सभेच्या कामकाजाची सीडी पाहिली असता त्यात तथ्य नसल्याचे दिसत होते, असे महापौरांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी समांतरचे कंत्राट रद्द करण्याची घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर या योजनेचे पुढे काय होणार, असा प्रश्न तमाम औरंगाबादकरांना पडला आहे. शुक्रवारी (12 एप्रिल) सभा सुरू होताच नगरसेवक काशिनाथ कोकाटे यांनी हा प्रश्न उपस्थित केला, पण हाळनोर यांनी आधी विषयपत्रिका, मग समांतर असा हट्ट धरला. त्यावर कोकाटे म्हणाले, पाण्यापेक्षा अन्य कोणताच प्रश्न ज्वलंत असू शकत नाही. राठोड यांनीही समांतरविषयी संपूर्ण खुलासा होणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. या विषयावर विधिमंडळात चर्चा होते, मग मनपा सभागृहात का चर्चा होऊ देत नाही? पुरस्कार स्वीकारण्यासाठी वॉशिंग्टनला जाणार का? असे खोचक सवाल त्यांनी महापौरांना केले.

घोषणा अन् धमकी..

महापौर समांतरविषयी चर्चा घडवून आणण्यास तयार नव्हत्या. त्यांनी विषयांचा पुकारा केला. त्यामुळे विरोधकांनी आरडाओरड सुरू केली. तेव्हा महापौरांनी ‘शांत बसा, अन्यथा सभा तहकूब करावी लागेल,’ अशी धमकी दिली. त्याला कोकाटेंनी तुमच्या अशा धमकीला घाबरत नसल्याचे प्रत्युत्तरही दिले. यानंतर राष्ट्रवादीचे गटनेते अफसर खानही समांतरवर चर्चेसाठी आग्रह धरू लागले. तरीही महापौरांनी विषयपत्रिकेवर चर्चा सुरू केली. त्यामुळे विरोधकांनी महापौरांच्या आसनासमोर जात ‘महापौर हाय हाय’च्या घोषणा सुरू केल्या. त्यांना रोखण्यासाठी हाळनोर, विकास जैन, राजू वैद्य, त्र्यंबक तुपेही पुढे सरसावले. मग मिलिंद दाभाडे, नासेर कुरैशी यांनी राजदंड पळवण्याचा प्रयत्न केला. तो परत मिळवण्यासाठी सुरक्षा रक्षक प्रयत्न करू लागले. त्याच झटापटीत राठोड यांच्या डाव्या डोळ्याच्या वरील बाजूला राजदंड लागला. जखमेतून रक्ताची धार वाहू लागली. ग्लानी येऊन ते खाली कोसळले. प्रकरण गंभीर वळणाकडे जात असल्याचे पाहून कोकाटे, अभिजित देशमुख, मीर हिदायत अली, ख्वाजा शरफोद्दीन यांनी हस्तक्षेप केला. त्यांनी राठोड यांना उचलून सभागृहाबाहेर नेले. आधी घाटी रुग्णालयात आणि नंतर माणिक हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्यांच्या डोक्याला तीन टाके पडले आहेत. त्यांच्या प्रकृतीला धोका नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

मनपाच्या इतिहासातील ही दुर्दैवी घटना असल्याचे उपमहापौर संजय जोशी म्हणाले. तर, या प्रकारातून काही जणांनी आपण किती चांगले प्रश्न विचारू शकतो, विरोधी पक्षनेत्याची भूमिका बजावू शकतो, हे दाखवण्याचा प्रयत्न केला, असे सभागृह नेता राजू वैद्य म्हणाले. त्यावर सत्ताधार्‍यांना समांतरच्या विषयावर चर्चा करायची नव्हती. कोणत्याही चर्चेविना विषय मंजूर केले. हे विषय रद्द करण्याची मागणी आयुक्तांकडे केली जाणार असल्याचे नगरसेवक काशिनाथ कोकाटे यांनी सांगितले.

दोषींवर गुन्हा दाखल करा
मी राठोड यांना मारले, असा आरोप होत असेल तर सीसीटीव्ही कॅमेर्‍यातील फुटेज तपासावे. त्यामधील वस्तुस्थिती पाहावी आणि दोषींवर गुन्हे दाखल करावे. गिरजाराम हाळनोर, गटनेता

विषय मंजूर, सभा बरखास्त
एकीकडे राठोड यांना सभागृहाबाहेर नेले जात असताना दुसरीकडे महापौरांनी विषयांचा पुकारा करून ते कोणत्याही चर्चेविना मंजूर करून टाकले. तातडीने सभा बरखास्तीचीही घोषणा केली.

प्रमोद राठोड यांचे डोके फुटल्यानंतर त्यांना ग्लानी आली. या वेळी मीर हिदायत अली आणि इतर सदस्यांनी त्यांना घाटीत नेले. छाया : अरुण तळेकर

आमदारांचे स्पष्टीकरण
किशनचंद तनवाणी, प्रदीप जैस्वाल, संजय शिरसाट सकाळी मनपा आयुक्तांना भेटले, गटनेत्याशी चर्चा केली. बारापुल्ला पुलाच्या कामाला गती द्यावी, अशी मागणी त्यांनी आयुक्तांकडे केली. मात्र, त्यांनी समांतरमध्ये शिवसेनेच्या एका आमदाराने कंत्राटदाराकडे पैशाची मागणी केली, असा आरोप खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला होता. त्यासंदर्भातही या आमदारांनी आयुक्तांकडे स्पष्टीकरण दिले, अशी माहिती सूत्रांनी दिली.