आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opposition Leader Jahangir Khan Will Be Take Municipal Officers Meeting

समांतरच्या प्रमुखाला विरोधी पक्ष नेत्याने शब्दश: उभे केले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- समांतरबाबत बचावात्मक राहणाऱ्या शिवसेनेला एकटे पाडत आता भाजप एमआयएम या योजनेवर तुटून पडले. आज विरोधी पक्षनेते जहांगीर खान यांनी समांतरचे प्रमुख अर्णव घोष यांना आपल्या दालनात बोलावून नगरसेवकांसमोर शब्दश: उभे केले. दोन तास समांतरच्या कारभाराचे वाभाडे काढत एमआयएमने कंपनीला ‘तुम्ही लोक खूप हैदोस घालत आहात. तुम्ही शहरात दुष्काळ आणला. आता पुरे झाले. पाण्याच्या समस्या तातडीने सोडवा.
महिनोन् महिने नळाला येणारे दूषित पाणी बंद नाही केले तर तुम्हाला पाजीन,’ असा सज्जड इशाराच दिला. दुसरीकडे स्थायी समिती सभापतींनी जाहीर केल्याप्रमाणे समांतरचा बँड वाजवणे सुरू केले आहे. आज कामाच्या पहिल्याच दिवशी त्यांनी समांतरचा करार रद्द करा त्यांना १५ कोटी रुपये देऊ नका, अशी मागणी करणाऱ्या पत्रावर आधी सही करीत ते आयुक्तांना दिले.
तीन दिवसांपूर्वी एमआयएमच्या नगरसेवकांनी औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीच्या मुख्यालयाला टाळे ठोकले होते. मुस्लिम वसाहतींत मुद्दाम पाणी दिले जात नाही. रमजानच्या काळात असा प्रकार सहन करणार नाही, असा इशारा दिल्यानंतर आज विरोधी पक्षनेते जहांगीर खान यांनी आपल्या पक्षाच्या नगरसेवकांसोबत समांतर मनपा अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. समांतरचे प्रमुख अर्णव घोष, प्रलय मुजुमदार, सोनल खुराणा, शहर अभियंता सखाराम पानझडे, कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे अफसर सिद्दिकी यांची उपस्थिती होती. पण या बैठकीत घोषच निशाण्यावर राहिले. जहांगीर खान यांनी प्रत्येक नगरसेवकाला उभे करीत त्यांच्या वॉर्डांतील तक्रारी मांडायला लावल्या. त्यावर उत्तर देण्यासाठी घोष उभे राहिले, त्यांच्या खुलाशावर प्रत्येक ठिकाणी नगरसेवक जहांगीर खान त्यांना भंडावून सोडत होते. मध्येच घोष यांनी बसण्याचा प्रयत्न केला असता खान यांनी त्यांना उभे राहून बोला, असे सुनावले. आठवडा आठवडा पाणी येणे, पाणी आले तर अपुरे येणे, दूषित पाण्याच्या तक्रारी महिनोंमहिने दूर करणे, तक्रारींची दखल घेणे असे अनेक मुद्दे नगरसेवकांनी मांडले.
जहांगीर खान म्हणाले की, रमजानच्या महिन्यात पाण्याचा प्रश्न सहन केला जाणार नाही. पाण्याची समस्या तुमच्यामुळे निर्माण झाली असून फक्त मुस्लिमच नाही तर शिवसेना भाजपच्या वॉर्डांतही पाण्याची बोंब आहे. तुम्ही शहरात दुष्काळ आणला आहे. पाणी वेळेवर देणार की नाही ते आधी सांगा. घाण पाणी येते. ते बंद करणार नसाल तर पुढच्या वेळी तुम्हालाच ते पाणी पाजेन. वसुलीच्या नावाखाली हैदोस घातलाय तुम्ही. काम काडीचेही सुरू नाही आणि वसुली कसली करता, असा सवालही त्यांनी केला. यावर अर्णव घोष यांनी या महिनाअखेर मुख्य जलवाहिनीचे काम सुरू होईल, असे सांगत शहरात ३५ टाक्या बांधणार असल्याची माहिती दिली.
कारवाईस सुरुवात
स्थायीच्या सभापतिपदाचा कार्यभार स्वीकारताच दिलीप थोरात यांनी लोकांना पाणी मिळाले नाही तर कंपनीचा बँड वाजवू, असा इशारा देत भाजपची समांतरविरोधी भूमिका स्पष्ट केली होती. त्यानंतर त्यांनी आज मनपात येत कामाला प्रारंभ केला. सही केलेला पहिला कागद हा समांतरचा करार रद्द करावा, अशी मागणी करणारे पत्र होते. आयुक्तांना दिलेल्या या पत्रात त्यांनी ही मागणी केली. शिवाय कंपनीला १५ कोटी रुपये देऊ नयेत अशी मागणीही केली.