आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opposition Of Haribhau Baggage Now Support Issue

उमेदवारीला विरोध करणारेच बागडेंच्या स्वागताला सर्वात पुढे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - महाराष्ट्राच्या विधानसभेचे नवनियुक्त अध्यक्ष तथा फुलंब्री विधानसभा मतदारसंघाचे आमदार हरिभाऊ बागडे यांचे चिकलठाणा विमानतळावर शुक्रवारी (१४ नोव्हेंबर) दुपारी साडेचार वाजता जंगी स्वागत करण्यात आले. विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीत बागडेंच्या उमेदवारीस प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष विरोध करणारेच स्वागतासाठी
सर्वात पुढे होते.

राज्यातील सर्वोच्च पदावर विराजमान झालेल्या बागडेंच्या स्वागताचा पहिला मान आपल्यालाच मिळावा, यासाठी ग्रामीण भागातूनही सर्वपक्षीय कार्यकर्ते, पदाधिकारी हार, पुष्पगुच्छ घेऊन मोठ्या संख्येने आले होते. त्यामुळे विमानतळ परिसर फुलून गेला होता. जिल्हाधिकारी विक्रमकुमार, पोलिस आयुक्त राजेंद्रसिंग, पोलिस अधीक्षक कुंभारे, अपर जिल्हाधिकारी किशनराव लवांडे आदींनी बागडेंचे प्रशासकीय स्वागत केले. महत्त्वाचे म्हणजे बागडेंना फुलंब्रीतून उमेदवारी देऊ नका, असा आग्रह धरणारे स्वागतात अग्रभागी होते. त्याबद्दल बागडे निष्ठावंतांनीही आश्चर्य व्यक्त केले.


दहा वर्षांपासून जिल्हा, राजकारणात बागडेंना डावलले जात होते. आता ते सर्वोच्च स्थानी पोहोचल्याने राजकीय समीकरणे बदलणार आहेत. आगामी मनपा निवडणुकीत त्याची प्रचिती येईल. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवेंकडे गेलेली मंडळी पुन्हा बागडेकडे येतील, अशीही चर्चा रंगली होती.

राजू शिंदेंनी आसन पटकावले
मनपा राजकारणात शिवसेनेकडून टीकेच्या तोंडावर असलेले माजी सभापती राजू शिंदे यांनी बागडेंच्या कारमध्ये पुढचे आसन पटकावले होते. याबद्दलही उलटसुलट चर्चा सुरू होती. बागडेंचे म्हाडा कॉलनी, विठ्ठलनगर चौक, मुकुंदवाडी, सिडको बसस्थानक आदी ठिकाणी ढोल-ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले.