औरंगाबाद - नैर्सगिक आणि जीवनसत्त्वाने परिपूर्ण आहार मिळणे सध्या दुरापास्त झाले आहे. पॅक्ड फूड आणि जंकफूडच्या जमान्यात फळफळावळ आणि भाजीपालादेखील रासायनिक खतांचा मारा असलेला मिळतो. प्रत्येकाकडे वेळ असतो; मात्र विरंगुळ्यात तो घालविणे प्रत्येकाला आवडते. याऐवजी घरातच बाग फुलवत निराळा आदर्श आभा गोस्वामी यांनी घालून दिला.
एन-१ मध्ये राहणाऱ्या गोस्वामी गेल्या १० वर्षांपासून बंगल्याच्या प्रांगणात भाजीपाल्याची शेती करतात. त्यांच्या भाज्या स्वत:च्या घरापुरत्या मर्यादित नसून संपूर्ण परिसराने त्याची चव चाखली आहे. डॉ. परमानंद गोस्वामी इंिडयन काउंसिल ऑफ अॅग्रिकल्चर रिसर्च दिल्ली येथे कार्यरत होते. अमेरिकेच्या पायोनिअर हायब्रीड कंपनीत काही वर्षे काम केल्यावर ते निवृत्त झाले. सेवानिवृत्तीनंतरच्या वेळेचा सदुपयोग करत त्यांनी
आपल्या बंगल्यात भाजीपाल्याची लागवड केली. शेतीच्या क्षेत्रातील इतक्या वर्षांचा अनुभव याकामी आला. आभा यांनाही यामध्ये रुची असल्याने उत्तम शेती शक्य झाली. दोन मोसमात ते वेगवेगळ्या भाज्यांची लागवड करतात. पावसाळ्यात कोथिंबीर, भेंडी, वांगी, दुधीभोपळा, दोडके, गिलके, तोंडली आणि चवळीची वेल लावतात. तर हिवाळ्यात अद्रक, सूरण, आरू, फुलकोबी, पत्ता कोबी, मुळा, टोमॅटो, शेवगा, पालक आणि मेथीची त्यांनी लागवड केली. प्रत्येकाने जागेचा वापर करत भाजीपाला निर्मिती करण्यासाठी हे दांपत्य प्रेरणा देत असते.
रसायनिक खतांपासून मुक्तता : हल्ली रासायनिक खतांचा वापर करत भाजीपाला उत्पादन आणि पिकविण्याचे प्रकार सर्रास दिसून येतात. यामुळे आरोग्यावर दूरगामी आणि घातक परिणाम होत आहेत. त्यासाठी हा उत्तम पर्याय असल्याचे गोस्वामी सांगतात.
कीटकनाशकही घरीच : कडुलिंबाच्या झाडांची पाने आणि निंबोळ्या पाण्यामध्ये उकळून घेऊन हे पाणी ८ दिवस ठेवले जाते नंतर स्प्रे बॉटलमध्ये पाणी भरून झाडांवर फवारणी केली जाते. यामुळे झाडांवर पडलेली कीडही नष्ट होते.
खतनिर्मिती घरातच
गोस्वामींनी घराच्याच एका कोपऱ्यात दोन छोटे हौद तयार केले आहेत. यामध्ये भाजी कापून किंवा निवडून झाल्यावरचे वेस्टेज आणि उरलेले अन्न टाकले जाते. त्यानंतर १० दिवसांनी माती टाकतात. मग थोडा युरिया, असे तीन थर तयार करतात. १ महिन्याने हे सर्व मिश्रण काढल्यावर उपयुक्त सेंद्रिय खत तयार झालेले असते.
प्रेरणा देणारा उपक्रम
*गोस्वामी दांपत्याने फुलवलेली ही भाज्यांची शेती संपूर्ण परिसरातील नागरिकांसाठी प्रेरणादायी आहे. आपल्याकडे असलेल्या जागेचा सदुपयोग करा. मनाला शांती देणारी बाग फुलवा. यातून आरोग्यही मिळणार आहे, असा संदेश ते सर्वांना देतात. कुंड्यांमध्येही भाजीपाला घेता येतो यासाठी ते मार्गदर्शनही करतात.
डॉ. सीमा दहाड