आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Organs Donation In Aurangabad Government Hospital

राज्यात पहिल्यांदाच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अवयवदान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- वेळखाऊ किचकट प्रक्रिया, अनेक अर्ज, परवानग्यांच्या जंत्रीमुळे लालफितीत अडकलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (घाटी) शुक्रवारी इतिहास घडला. घाटीतील शस्त्रक्रिया विभागप्रमुख डॉ. सरोजिनी जाधव आणि त्यांच्या टीमने अपघातात जखमी झालेल्या ब्रेनडेड तरुणाच्या अवयवदानाचे शिवधनुष्य पेलले. शासकीय यंत्रणेत राहूनही वेगवान प्रक्रियेशी जुळवून घेत या तज्ज्ञांनी केलेली ही धडपड सहा रुग्णांना जीवदान देणारी ठरली. या पुढाकारामुळे राज्यात पहिल्यांदाच अवयवदान करण्याचा मानही घाटीला मिळाला.

१५ जानेवारीला झालेल्या राम मगरच्या अवयवदानानंतर शहरात अवयवदान चळवळीने वेग घेतला. यानंतर ४१ दिवसांतच गणेश घोडके (२७, वैजापूर) या युवकाचे घाटीत यशस्वी अवयवदान झाले. गणेशचे हृदय चेन्नईला, यकृत पुण्यात, तर दोन्ही किडन्या शहरातील रुग्णालयातील रुग्णास देण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे गणेशचे डोळेही दान करण्यात आले आहेत. शुक्रवारी सकाळी १० वाजता सुरू झालेली शस्त्रक्रिया दुपारी २.१० वाजता संपली. १२.१५ वाजता हृदय चेन्नईसाठी निघाले, दीडच्या सुमारास दोन्ही किडन्या संबंधित रुग्णालयांकडे पाठवण्यात आल्या. सर्वात शेवटी वाजून ५० मिनिटांनी यकृत पुणे येथे पाठवण्यात आले. तर वाजता घाटीतील नेत्रपेढीकडे डोळे नेण्यात आले. श्रीरामपूर येथे पाहुण्यांकडे गेलेला गणेश २४ फेब्रुवारी रोजी नाहूर नदीच्या पुलावरून पडला. त्याला श्रीरामपूर शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याचे वैजापुरातील भाऊ नंदू घोडके अन् औरंगाबादेत राहणाऱ्या नारायण वाघचौरे या भाऊजींनी श्रीरामपूर येथे धाव घेतले. दत्ताजी भाले रक्तपेढीचे संचालक डॉ. महेंद्रसिंह चौहान यांच्या परिचयामुळे नातलगांनी गणेशला घाटीत दाखल केले. शस्त्रक्रिया विभागप्रमुख डॉ. सरोजिनी जाधव आणि डॉ. सुरेश हरबडे यांनी प्राथमिक उपचार केले. मात्र, गणेशचा मेंदू मृत झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. याबाबत नातलगांना माहिती देताच अवयवदानाचे वृत्त वाचले असल्याने भाऊ नंदू यांनीही अवयवदानाची इच्छा व्यक्त केली.

मोहिमेचे शिल्पकार :
घाटीच्या ब्रेनडेड कमिटीचे अध्यक्ष डॉ. सुहास जेवळीकर यांच्यासह डॉ. गायत्री तडवळकर, डॉ. एस. पी. जिरवणकर, डॉ. सुरेश हरबडे, डॉ. मकरंद कांजळकर, डॉ. जीवन राजपूत यांचा टीममध्ये समावेश आहे. डॉ. उल्हास मिसाळ, डॉ. प्रमोद अपसिंगेकर, डॉ. ज्योती कुलकर्णी, डॉ. सुचेता जोशी यांच्या टीमने गणेशची काळजी घेतली. यात डॉ. कैलाश चिंतने यांची प्रमुख भूमिका होती. डॉ. अनिल पुंगळे आणि डॉ. संजय वाकुडकर यांनी समन्वयाचे काम केले. सामाजिक कार्यकर्ते अखिल अहेमद आणि किशोर वाघमारे यांनी औषधी आणि इतर मदत केली.

अधिकृत घोषणा होताच चक्रे फिरली :
गुरुवारी दुपारी वाजता घाटीच्या ब्रेनडेड कमिटीने तपासणी केली. खात्री होतच झेडटीसीसी कमिटीचे अध्यक्ष डॉ. सुधीर कुलकर्णी यांना माहिती देण्यात आली. अवयवांची गरज असणाऱ्या रुग्णांची यादी पाहणे, इतर तपासण्या सुरू झाल्या. रात्री आठ वाजता कमिटीने अधिकृत घोषणा करताच पुढील तयारी सुरू झाली.

एकत्रित प्रयत्नांचे यश
अवयवदानाच्या प्रक्रियेतील मी एक दुवा आहे. श्रेय मात्र पूर्ण टीमचे आहे. प्रत्येकाचे अथक प्रयत्न आणि दुर्दम्य इच्छाशक्तीमुळेच हे शक्य झाले. यातून सर्वांचा आत्मविश्वासही वाढला. डॉ. सरोजिनी जाधव, शस्त्रक्रियाविभागप्रमुख, घाटी

अन् त्यांच्या प्रयत्नांना आले यश
नातलगांचीअनुमती मिळताच डॉ. जाधव यांनी पुढील प्रक्रिया सुरू करत अधीक्षक डॉ. सुहास जेवळीकरांना माहिती दिली. शासकीय यंत्रणेत ही वेगवान प्रक्रिया शक्य होईल का, अशी शंका डॉ. जेवळीकरांनी बोलून दाखवली. मात्र, आपण हे करू शकू, असा डॉ. जाधव यांना विश्वास होता. त्यांचे धाडस अखंड प्रयत्नांमुळे हे शक्य झाले.