आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Our Alliance With The BJP, Not With Tanavani Group shivsena

आमची युती भाजपशी, तनवाणी गटाशी नाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- भाजपने किशनचंद तनवाणी यांच्या प्रेरणेने तयार केलेल्या गटाची मदत घेत आपले संख्याबळ वाढवले असले तरी शिवसेनेने त्यांच्या या प्रयत्नांना चाप लावण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना सांगून स्थायी समिती सभापतिपद आपल्या गटाला घेण्याचे तनवाणी पुरस्कृत अपक्षांच्या गटाचे प्रयत्न सुरू आहेत. सेनेतून आलेले गजानन बारवाल हे या पदावर दावा करत असून शिवसेनेने त्यांना तनवाणींना विरोध करीत एकाच दगडात दोन पक्षी मारण्याची रणनीती आखली आहे.
आमची भाजपसोबत युती आहे, तनवाणींच्या गटाला पाठिंबा देणे बंधनकारक नाही, असे शिवसेनेने ठणकावल्याने बारवाल यांची अडचण झाली आहे. दुसरीकडे, तरीही बारवाल यांचे नाव पुढे करण्यात आले तर आमचा निर्णय घ्यायला आम्ही मोकळे आहोत, असे शिवसेनेने स्पष्ट केले आहे.
भाजपने माजी आमदार किशनचंद तनवाणी यांच्या कौशल्याचा वापर करीत १३ अपक्षांची शहर विकास आघाडी तयार केली या आघाडीच्या माध्यमातून स्थायी समितीवर एक सदस्य वाढवून घेतला. त्यामुळे तनवाणी यांनी स्थायी समिती सभापतिपद आपल्या गटाला मिळावे अशा हालचाली सुरू केल्या.
तनवाणींची रणनीती : सेनेच्यानेत्यांमुळे दुखावलेल्या बारवालांची प्रतिष्ठापना करून शिवसेनेवर कडी करण्याची संधी तनवाणी घेऊ पाहत आहेत. मनपा निवडणुकीतही सेनेच्या प्रत्येक चालीला प्रत्युत्तर दिल्याने तनवाणी यांनी गुलमंडीसह अनेक जागी उमेदवार निवडून आणले. त्यांना भाजपमध्ये प्रस्थापितांना बाजूला सारून आपले बस्तान बसवायचे असून मनपात शहर विकास आघाडी स्थापन करण्यात सगळी मदत करून त्यांनी भाजप नेत्यांकडे आपली इमेज वाढवली आहे. आता ते स्थायी समिती सभापतिपदावर बारवालांना बसवू पाहत आहेत.
...तर आम्ही निर्णय घेऊ
शिवसेनेचे महानगर प्रमुख प्रदीप जैस्वाल यांनी शहर विकास आघाडीला म्हणजेच तनवाणी गटाला कडाडून विरोध केला आहे. 'दिव्य मराठी'शी बोलताना ते म्हणाले की, आम्ही भाजपशी युती केली आहे. शहर विकास आघाडीशी नाही. आघाडीला मदत करणे आम्हाला मुळीच बंधनकारक नाही. त्यामुळे भाजपने त्यांच्या पक्षचिन्हावर निवडून आलेला उमेदवार द्यावा, शिवसेना निश्चितच युतीचा धर्म पाळेल. त्यांनी अपक्षांच्या संख्याबळाची शेखी मिरवू नये. आमच्याकडेही १२ अपक्ष आहेतच, असेही त्यांनी ठणकावले.