आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

5 हजार भंगार ‘यमदूत’ रस्त्यांवर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - शहरात सुमारे 25 हजार ऑटोरिक्षा प्रवासी वाहतूक करीत आहेत. मात्र, यापैकी जवळपास 5 हजार ऑटोरिक्षांचे आयुष्य संपले असतानाही त्या रस्त्यांवर धावत आहेत. प्रवाशांच्या जिवाबाबत बेफिकीर असलेले रिक्षाचालक या कालबाह्य रिक्षांमधून प्रवाशांची राजरोस वाहतूक करीत असल्याने त्यांचा जीव धोक्यात आहे. आयुष्य संपलेली वाहने मुळात भंगारात जमा करणे अपेक्षित आहे. मात्र, प्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकार्‍यांच्या डोळेझाकीमुळे हे जुनाट रिक्षे ‘यमदूत’ बनून शहराच्या रस्त्यांवर धावत आहेत.

औरंगाबादचा शेजारी जालना शहरात काही दिवसांपूर्वी आयुष्य संपलेली वाहने संबंधित अधिकार्‍यांनी कटरने कापून भंगारात जमा केली. अशीच कारवाई औरंगाबादेत अपेक्षित असताना संबंधित अधिकारी या गंभीर बाबीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र आहे.

औरंगाबाद शहरात 25 हजारांवर ऑटोरिक्षांद्वारे प्रवासी वाहतूक केली जाते. प्रवासी वाहतुकीसाठी ‘आरटीओ’कडून ‘परमिट’ वितरित करण्यात आलेले आहेत. ‘दिव्य मराठी’ने वस्तुस्थिती जाणून घेतली असता आरटीओकडील नोंदीनुसार सध्या केवळ 7600 ‘परमिट’चे नूतनीकरण करण्यात आलेले आहे. उर्वरित रिक्षाचालकांनी ‘परमिट’ नूतनीकरणाकडे पाठ फिरवली आहे. परमिटचे नूतनीकरण नसेल तर ऑटोरिक्षाने वाहतूक करणे अवैध ठरते. अनेक जुनाट रिक्षा ‘परमिट’ नसतानाही रस्त्यावर धावत आहेत. रेल्वे स्टेशन ते सिडको बसस्थानक, रेल्वे स्टेशन ते शहागंज, पीरबाजार ते बसस्थानक- शहागंज या प्रमुख मार्गांसह शहरातील अंतर्गत वस्त्या, नारेगाव, हसरूल, पडेगाव, चितेगाव, भावसिंगपुरा, चिकलठाणा या मार्गावर मोडकळीस आलेल्या रिक्षांद्वारे प्रवाशांची सर्रास वाहतूक सुरू आहे. एवढेच नव्हे तर अशा रिक्षांमधून विद्यार्थ्यांची वाहतूकही केली जात असल्याचे प्रस्तूत प्रतिनिधींला आढळून आले. मात्र, आरटीओ कार्यालय किंवा पोलिसांकडून कोणतीही ठोस कारवाई केली जात नसल्याने या फिरत्या यमदूतांमुळे प्रवाशांचा जीव टांगणीला आहे.

प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या रेकॉर्डप्रमाणे सध्या औरंगाबाद जिल्ह्यात 24 हजार 665 ऑटोरिक्षा धावतात. वास्तविक शहरातच 25 हजारांवर ऑटोरिक्षा धावतात. यापैकी जिल्ह्यात 11 हजार 600 जणांकडेच प्रवासी वाहतुकीचे परमिट असून यात शहरातील 7 हजार 600 परमिटचा समावेश आहे. पुणे, मुंबई आदी शहरांमधून आयुष्य संपलेले रिक्षा वाहतुकीस अपात्र ठरवले जातात. याच भंगार रिक्षा शहर आणि जिल्ह्यात आणून त्याद्वारे प्रवासी वाहतूक केली जाते.
एकाच परमिटवर दोन रिक्षा - आरटीओ कार्यालयाकडून कालबाह्य ठरवण्यात आलेल्या रिक्षावरील परमिट काढून दुसर्‍या सुस्थितीतील किंवा नवीन रिक्षावर चढवले जाते. मात्र, कालबाह्य ठरवलेला रिक्षा भंगारात न काढता तो ‘गदक’ लाइनवर चालवला जातो. दुसरी बाब म्हणजे जिल्हा बदलीच्या नावाखाली आरटीओकडून ना हरकत प्रमाणपत्र घेऊन एका रिक्षावरील परमिट दुसर्‍या रिक्षावर हस्तांतरित केले जाते. मात्र, प्रत्यक्षात हा रिक्षा बाहेर जिल्ह्यात न नेता तो शहरातच अवैध प्रवासी वाहतुकीसाठी वापरला जातो.
कधी कापणार भंगार रिक्षा?
राज्यातील इतर विभागात परमिट असलेल्या मात्र जुनाट झालेल्या रिक्षांवर कारवाई केली जाते. अनेक प्रादेशिक परिवहन कार्यालयांकडून गॅस कटरच्या साहाय्याने मुदत संपलेल्या रिक्षा कापल्या जातात किंवा किंवा त्या रोलरखाली दाबल्या जातात. त्यामुळे अशा रिक्षांचा वापर करणे अशक्य होते. मात्र, औरंगाबाद शहरात मार्च 2012 पर्यंत फक्त 900 रिक्षाच भंगारमध्ये काढण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. वास्तविक अशा भंगार रिक्षांची आजमितीला संख्या 5 हजारांवर आहे. अधूनमधून आरटीओ अधिकार्‍यांमार्फत या रिक्षांवर जुजबी कारवाई करण्यात येते. आरटीओ कार्यालयात मनुष्यबळ कमी असल्याने आम्ही कारवाई करू शकत नसल्याचे रडगाणे एका अधिकार्‍याने गायले.

1997 मध्ये शासनाने नवीन रिक्षा परमिट देण्याचे थांबवल्यामुळे जुन्या रिक्षांचे परमिटच नवीन रिक्षांना हस्तांतरित केले जाते. प्रादेशिक परिवहन कार्यालयाने जुनाट आणि परमिट काढून घेतलेले रिक्षा भंगारात काढणे किंवा ते वाहतूक करताना आढळले तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणे अपेक्षित आहे. परमिट काढून घेतलेल्या काही रिक्षांन6ा 2007 पर्यंत प्रवासी वाहतूक करण्यास मनाई करून ते खासगी वापर करण्यास मुभा दिली जात होती. यानंतर ही पद्धतही बंद करण्यात आली. त्यामुळे खासगी वापरासाठी बाहेरून आणलेल्या भंगार रिक्षा शहरातील रस्त्यावर चालतातच कशा, हे एक कोडे आहे.
फक्त चेसिस प्लेट कापली जाते - औरंगाबाद आरटीओ कार्यालयात परमिट हस्तांतराची पद्धतच चुकीची आहे. जुन्या रिक्षांचे परमिट नवीन रिक्षांकरिता हस्तांतरित करताना जुन्या रिक्षांची फक्त चेसिस प्लेट काढली जाते. त्यामुळे या जुन्या रिक्षा चेसिस क्रमांकाशिवाय वापरल्या जातात. याउलट पुणे, मुंबई आणि इतर शहरांत मुदत संपलेल्या रिक्षांचे गॅस कटरने तीन तुकडे केल्यानंतरच त्या रिक्षावरील परमिट दुसर्‍या रिक्षासाठी हस्तांतरित केले जाते. आम्हीसुद्धा प्रादेशिक परिवहन प्राधिकरणात पुण्याप्रमाणे औरंगाबादेतील रिक्षांचे तुकडे केल्यावरच परमिट देण्याची मागणी केली आहे. निसार अहेमद, सरचिटणीस, रिक्षाचालक संयुक्त संघर्ष समिती
रिक्षांच्या मोडतोडीचे अधिकार नाहीत - कालबाह्य रिक्षांवर आम्ही कारवाई करतोच. मात्र या रिक्षांचे तुकडे करण्याचे आम्हाला अधिकार नाहीत. आम्ही फक्त दंडात्मक कारवाई करू शकतो. संभाजी सलामे, प्रादेशिक परिवहन अधिकारी
ही जबाबदारी आरटीओ अधिकार्‍यांचीच - कालबाह्य रिक्षांवर कारवाई करण्याची मुख्य जबाबदारी आरटीओ अधिकार्‍यांवर आहे. आम्ही त्यांना मदत म्हणून विनापरमिट किंवा कालबाह्य झालेले रिक्षा जप्त करून देऊ शकतो. हे रिक्षा भंगारमध्ये टाकण्याचे किंवा ते रस्त्यावर चालू न देण्याचे काम आरटीओलाच करावे लागेल. सोमनाथ घार्गे, पोलिस उपायुक्त