आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीएसएनएल\'ने केली पोलिसांची बोलती बंद!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- महाराष्ट्रात संवेदनशील शहर म्हणून ओळख असलेल्या औरंगाबाद शहरातील सर्व १४ पोलिस ठाण्यांतील दूरध्वनींचे आऊटगोइंग कॉल्स १५ डिसेंबरपासून बंद झाले आहेत. दुसरीकडे इंटरनेट सुविधाही बंद झाल्याने पोलिस रडारवरच नसल्याचे चित्र आहे. तूर्तास दूरध्वनीचे इनकमिंग सुरू असल्याने पीडित पोलिसांशी संपर्क साधू शकतात. मात्र येत्या काही दिवसांत तेही शक्य होणार नाही. बीएसएनएलचे बिल न भरल्याने पोलिसांवर ही नामुष्कीची वेळ आली आहे.
15 डिसेंबरला सेवा खंडित झाल्यानंतर काही तांत्रित अडचण असेल म्हणून याकडे कोणी लक्ष दिले नव्हते. मात्र गंभीर गुन्ह्यातील आरोपींची छायाचित्रे पाठवणे यासह गुन्हेगारीआढावा किंवा वरिष्ठांनी सांगितलेली माहिती तातडीने पाठवणे आदी कामे ठप्प झाली आहेत.

प्रत्येक ठाण्याचे थकले 1 लाख
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काही ठाण्यांचे दूरध्वनी तसेच इंटरनेटचे मिळून ९० हजार ते १ लाख १० हजारांपर्यंतची बिले थकली आहेत.
१४ पोलिस ठाण्यांचे किमान १४ लाख व आयुक्तालयातील किमान २ लाख असे मिळून १६ लाख रुपये थकले असावेत, असा अंदाज आहे.
मोबाइलचाच वापर
दूरध्वनी बंद असल्यामुळे पोलिस कर्मचारी वैयक्तिक मोबाइलचा वापर करीत असून काम थांबले नसले तरी इंटरनेट बंद असल्यामुळे कामे ठप्प झाल्याचे वरिष्ठ अधिका-यांनी सांगितले, परंतु हे खाते एवढे महत्त्वाचे असतानाही बिल का भरले गेले नाही याचे उत्तर कोणी देऊ शकले नाही.
काय होऊ शकते
एका पोलिस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात संपर्क साधणे शक्य नाही. मोबाइल क्रांतीमुळे वायरलेस सेटचाही वापर कमी झाला. त्यामुळे वायरलेसची बॅटरी चार्ज आहे की नाही, याची तपासणी कोणी करत नाही. आता दूरध्वनी बंद पडल्यानंतर कर्मचारी वायरलेस सेटकडे वळले तेव्हा अनेक वायरलेस सेटच्या बॅटरी बाद झाल्याचे लक्षात येत आहे. अनेक ठाण्यातून वायरलेस सेटद्वारे संपर्क होत नाही.
माहिती घेऊन कारवाई करणार
बिले थकल्याची किंवा दूरध्वनीचे आऊटगोइंग बंद झाले तसेच इंटरनेटही बंद आहेत, अशी तक्रार अजून माझ्याकडे आलेली नाही. उद्या चौकशी करून माहिती घेतो. तसे असेल तर लगेच कारवाई करतो. ठाण्यांचे दूरध्वनी बंद होऊ दिले जाणार नाहीत. बिल भरले नाही, असे कारण यासाठी असू शकत नाही. काही तांत्रिक कारण असू शकते. ए. एस. गांगुर्डे, सहायक पोलिस आयुक्त, प्रशासन.