आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पावसात, डोंगराच्या कपारीत घालवली रात्र

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - ‘माझ्या आयुष्यात पहिल्यांदा मी अख्खा डोंगर कोसळताना पाहिला. झाडे, इमारती सारे अलकनंदाच्या पात्रातून वाहत होते आणि आम्ही सुन्न, भयभीत होऊन ते पाहत बसलो. जीव वाचवण्यासाठी डोंगर चढून जाताना पुन्हा ते तांडव समोर उभे राहिले आणि एका कपारीत, कडाक्याच्या जीवघेण्या थंडीत रात्र काढावी लागली. जीव वाचला पण आता डोळे बंद केले तरी ते भयंकर तांडव समोरून हटायला तयार नाही,’ अशा शब्दांत परभणीच्या अंबादास महाजनांनी उत्तराखंडमधील निसर्गाच्या भयानक प्रकोपात काढलेल्या दिवसांचे वर्णन केले.


शुक्रवारी लष्कराच्या जवानांनी गौरीकुंड भागात अडकलेल्या महाजन कुटुंबियांना हेलिकॉप्टरने हलवले. ऋषीकेशला आणले. तिथे सुटकेचे काही तास अनुभवल्यानंतर त्यांनी ‘दिव्य मराठी’शी संवाद साधत गेल्या चार दिवसांचे वर्णन केले. परभणीत पौरोहित्य करणारे अंबादास महाजन (50), त्यांच्या पत्नी मीरा (46) आणि आई सत्यभामाबाई (80) अंबिका ट्रॅव्हल्सच्या सहलीसोबत दोन धाम यात्रेवर गेले आहेत. 4 जूनला सुरु झालेली ही यात्रा केदारनाथच्या दर्शनानंतर अंतिम टप्प्यात येणार होती. केदारनाथाच्या दिशेने निघालेल्या या यात्रेकरूंना त्यांच्या आयुष्यातील सर्वात थरारक आणि भयानक अनुभव पाहावा लागला. अंगावर काटा आणणा-या त्या चार दिवसांची कहाणी त्यांच्याच शब्दांत..
चार जूनला आम्ही द्वारका, केदारनाथ हे दोन धाम आणि इतर धार्मिक स्थळांच्या यात्रेसाठी औरंगाबादहून निघालो. केदारनाथ करून अंतिम टप्प्यात नेपाळला जाण्याचा दिवस जवळ आला होता. केदारनाथकडे जाताना आम्ही गौरीकुंडला पोहोचलो तेव्हा सकाळचे साडेनऊ वाजले होते. पाऊस सुरु होता. शेजारून वाहणारी अलकनंदा पुराने दुथडी भरून वाहात होती. पण त्याचे प्रारंभी आम्हाला काहीच वाटले नाही. या गावाची, परिस्थितीची काहीच माहिती नसल्याने आम्ही तसे बिनधास्त होतो. पण अचानक पुराने रौद्ररुप धारण केले. ज्या लॉजमध्ये उतरलो होते तिथे हादरे जाणवायला लागले. सुरक्षित वाटेना म्हणून जरा वरच्या भागात असणा-या एका लॉजमध्ये आश्रयाला गेलो. रात्री साडेदहाच्या सुमाराला परिसरात पडझड सुरु झाली. मोठालेदगड नदीच्या पात्रात कोसळू लागले, मोठमोठी झाडे वाहून येऊ लागली. रात्रभर हाच प्रकार सुरु होता.

त्या दिवशी जी झोप उडाली ती आजपर्यंत.
खायला काही नव्हते. पहाटे उठून पाहिले तेव्हा आसपासचा सारा परिसर उद्ध्वस्त झाला होता. मी, माझी पत्नी आणि वृद्ध आई असे तिघे उपाशीपोटी एका कपारीच्या आश्रयाला गेलो. एक नेपाळी तरूण मदतीला धावला. त्याने आम्हाला त्या बेभान कोसळणा-या पावसात, कडाक्याच्या थंडीत जागा शोधून शेकोटी पेटवून दिली. काही किलोमीटरची पायपीट करून गावात जाऊन मॅगी घेऊन आला. तिथेच साचलेल्या पाण्याचा वापर करून आम्ही ती मॅगी शिजवली. दोन दिवसांनंतर पोटात अन्नाचा कण गेला. सकाळी पाऊस थांबला तसे आम्ही गौरीकुंड गाठले. तोपर्यंत लष्कराची पथके मदतीला आली होती. त्यांनी हेलिकॉप्टरने लोकांना बाहेर काढणे सुरु केले होते. गुरुवारी तिघे व इतर 40 जणांना हरिद्वारला हलवले. तिथे लष्कराच्या रुग्णालयात आईवर उपचार केले.


यात्रेकरूंना लुटण्याचे प्रकार
मदत कार्यासाठी गेलेले शिवसेनेचे नगरसेवक गोपाल कुलकर्णी यांनी सांगितले की, महाप्रलयानंतर सरकार नावाची गोष्ट मदतकार्यात दिसून येत नाही. लष्करच पुढाकार घेताना दिसत आहे. एकीकडे लष्कराची हेलिकॉप्टर लोकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवत असताना खासगी हेलिकॉप्टर मात्र पैसे देणा-यांनाच सेवा देत आहेत. शिवाय अन्नाची पाकिटे, मदत साहित्य यांची खोकी चार दिवसांपासून पडून आहेत. शिवाय अडचणीत सापडलेल्या यात्रेकरूंना लुटण्याचे प्रकार वाढले आहेत. काही हॉटेलांनी एका रात्रीचे 30 हजार रुपये आकारल्याचे अनेक यात्रेकरूंनी सांगितले. 20 रुपयांना मिळणारी पाण्याची बाटली 100 रुपयांना विकली जात आहे. सरकार कुठेच दिसत नाही.