आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओवेसींना औरंगाबादमध्ये प्रवेश नाहीच

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - ऑल इंडिया मजलिसे इत्तेहादुल मुस्लिमिनचे (एआय-एमआयएम) अध्यक्ष व खासदार असदुद्दीन ओवेसी यांना औरंगाबाद पोलिसांनी आयुक्तालय हद्दीत प्रतिबंध केला आहे. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात गुरुवारी सुनावणी होणार आहे.

पक्षाची स्थापना व पदाधिकारी निवडीसाठी 31 जानेवारी व 1 फेब्रुवारी रोजी ओवेसी शहरात येणार आहेत. एमआयएम स्वागत समितीचे समन्वयक जावेद कुरैशी यांनी 1 फेब्रुवारीला शहरात जाहीर सभेचे आयोजन केले होते. सभेसाठी त्यांनी वक्फ बोर्डाकडे अर्ज करून रोझा बाग येथील ईदगाह मैदानासाठीचे ना-हरकत प्रमाणपत्रही मिळवले. त्यानंतर सिटी चौक पोलिस ठाणे आणि आयुक्तांकडे परवानगीसाठी अर्ज केला, पण सिटीचौक पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अर्जुन भांड यांनी कायदा व सुव्यवस्थेचे कारण देऊन नोटिशीद्वारे जाहीर सभेला परवानगी नाकारण्यात आली होती. त्यानंतर कुरैशी यांनी 28 जानेवारीला अन्वर कादरी यांच्यासह अ‍ॅड. एस. एस. काझी, अ‍ॅड. खिजर पटेल आणि अ‍ॅड. अशोक गायकवाड यांच्यामार्फत खंडपीठात जाहीर सभेस परवानगी द्यावी म्हणून याचिका दाखल केली. 29 जानेवारीला न्यायालयात याचिकाकर्ते तसेच सरकार पक्षादरम्यान युक्तिवाद केला. त्यावर नोटीस निरीक्षकांनी स्वत: किंवा आयुक्तांच्या परवानगीने पाठविली याबाबत न्यायालयाने खुलासा मागवला. दरम्यान, मंगळवारीच पोलिस आयुक्तांनी फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 144 अन्वये ओवेसी यांना शहर आयुक्तालय हद्दीत येण्यास प्रतिबंध केला. बुधवारी न्या. अंबादास जोशी आणि न्या. सुनील देशमुख यांच्या पीठासमोर प्रकरणाची सुनावणी झाली. त्यावेळी याचिका प्रलंबित असताना आयुक्तांनी काढलेला आदेश बेकायदेशीर असल्याचा युक्तिवाद याचिकाकर्त्यांतर्फे करण्यात आला. तसेच आयुक्तांचा आदेश रद्द करून ओवेसी यांना जाहीर सभा घेण्यास परवानगी द्यावी, अशी विनंती करण्यात आली. त्यावर गुरुवारी सुनावणी होणार आहे.

चाचपणीनंतर निर्णय : पोलिस आयुक्त
धुळे दंगल व ओवेसींच्या प्रक्षोभक विधानांमुळे वातावरण दूषित होऊ शकते. आम्ही चाचपणी केली आहे. त्यात ओवेसींनी शहरात येऊ नये, अशी परिस्थिती जाणवली आहे. जावेद कुरैशी यांनी शहरात काही कॉर्नर बैठका घेतल्या आणि सभेचीही तयारी केली होती, असे पोलिस आयुक्त संजयकुमार यांनी सांगितले आहे. पुढे ते म्हणाले की, तत्पूर्वी सामाजिक संघटनांनी आमच्याकडे निवेदन दिले होते. त्यांचाही विचार करण्यात आला आहे. यामुळे ओवेसींना पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत येण्यास बंदी घालण्यात आली आहे. 144 (अ) (मिरवणुकीत किंवा सामूहिक कवायतीत शस्त्र बाळगणे किंवा शस्त्रासह सामूहिक प्रशिक्षण यावर बंदी घालण्याचे अधिकार) कलमान्वये ओवेसींना नोटीस बजावण्यात आली असून, नोटीस बजावण्यासाठी एक पोलिस अधिकारी हैदराबाद येथे रवाना झाला आहे.