आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ox Festival And Water Problem Issue At Aurangabad

नदी कोरडी, घरच्या अंघोळीनेच पोळा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाळूज - यंदा जेमतेम पावसामुळे शेतकऱ्यांनी साधेपणानेच पोळा सण साजरा केल्याचे चित्र वाळूज परिसरात दिसून आले. वर्षभर शेतामध्ये राबणाऱ्या बैलांच्या सणात कुठलीही उणीव राहू नये या भावनेतून शेतकऱ्यांनी पारंपरिक पद्धतीने सोमवारी (२५ ऑगस्ट) बैलांचे औक्षण केले. खाम नदीला पाणी नसल्याने घरात बादलीभर पाण्याच्या आंघोळीवरच समाधान मानावे लागले.

शेतकरी वर्गात पोळा सणाला मोठे महत्त्व आहे. वर्षभर शेतामध्ये शेतकऱ्यांच्या बरोबरीने राबणाऱ्या ‘सर्जा-राजा’च्या कौतुकाचा व पूजेचा हा दिवस असतो. या दिवशी बैलांना कामाला जुंपले जात नाही. त्यांच्याकडून कुठलेही काम करून घेतले जात नाही. त्यांना धुऊन त्यांची रंगरंगोटी, शिंगांना बेगड लावून त्यांच्यावर झूल टाकून सुवासिनी त्यांची पूजा करतात. तसेच वाजतगाजत त्यांची मिरवणूक काढली जाते.

बैलांची मिरवणूक
शेतकरी बैल धुण्याकरिता जलसाठ्यांवर नेतात. मात्र, पाण्याअभावी यंदा त्यांना घरीच धुवावे लागले. दरवर्षी मुबलक पावसामुळे िनर्माण झालेल्या नैसर्गिक चारीमध्ये बैलांना चरण्यासाठी सोडण्यात येते. मात्र, यंदा चारी न राहिल्यामुळे त्यांना घरीच पेंड चारण्यात आली. बैलांच्या िशंगांना हिंगुळ, बेगड लावण्यात आले. काही बैलांची शिंगे तासून त्यांना आकार देण्यात आला. जुनी वेसण काढून नवीन वेसण, कपाळावर गोंडा व बाशिंग, नाकावर मोर्की, अंगावर चमकी झूल, पायात घुंगराचे पट्टे, घुंगरमाळा, कवड्यांचे गंडे, रंगीत फुले व फुग्यांसह बैलांना सजवण्यात आले. बैलांना गावातील मुख्य कमानीपासून मंदिरातून दर्शन घेऊन घराकडे नेण्यात आले. घरी येताच सुवासिनींनी त्यांना ओवाळून पुरणपोळीचा नैवेद्य भरवला.
बळीराजा चिंतातुर
गोलवाडी, तिसगाव, पंढरपूर, पाटोदा, नायगाव, आसेगाव, जोगेश्वरी, लांझी, पिंपरखेडा, नारायणपूर, घाणेगाव, वाळूज, रामराई आदी भागांतील जलसाठे मोठा पाऊस न झाल्याने कोरडे आहेत. पावसाळ्याच्या सुरुवातीला झालेल्या रिमझिम पावसामुळे खरीप पिके उगवली. मात्र, पुरेसा पाऊस न झाल्यामुळे त्यांची वाढ खुंटली असल्याने या भागातील शेतकरी चिंताग्रस्त आहेत.