आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाऊस आला अन् पोळा फुटला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- पावसाच्या आगमनाने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. सोमवारी चिकलठाणा, हर्सूल, पडेगाव, भावसिंगपुरा आदी ठिकाणी शेतकऱ्यांनी ढोल-ताशांच्या गजरात बैलांची मिरवणूक काढून जल्लोषात पोळा साजरा केला. ढवळ्या-पवळ्याला सजवताना शेतकऱ्यांनी कोठेही कसर ठेवली नाही. झुला, घागरमाळा, नजर लागू नये म्हणून कवड्याची माळ, रंगीबेरंगी फुगे, रंगरंगोटी केल्याने सर्जा-राजा नागरिकांचे लक्ष वेधून घेत होते.

यंदा जिल्ह्यात ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाल्याने दुष्काळाचे सावट निर्माण झाले होते. मात्र, गत चार दिवसांपासून जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी जोरदार सरी कोसळत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. पोळ्याला पाऊस आल्याने शेतकऱ्यांनी आपल्या िजवलग मित्राला सजवण्यासाठी त्याच्या मानपानात कुठे कमी पडू दिले नाही. पोटभर चारा खाऊ घालत पाण्याने स्वच्छ धुऊन त्यांच्या अंगावर रंगबेरंगी िठपके देण्यात आले. महागड्या झुला, घागरमाळा, कवड्यांची माळ, घंटी, वेसण, कासरा, मोरखी, शिंगाला हिंगूळ लावल्याने सर्वच बैल शोभून दिसत होते. हर्सूल येथील उत्तरमुखी रुद्र हनुमान मंदिरासमोर सायंकाळी ५.३० वाजता पोळा भरला. ६.१५ वाजेच्या दरम्यान पोळा फुटला. त्यानंतर शेतकऱ्यांनी औक्षण करण्यासाठी बैलांना घरी नेले. सुहािसनींनी त्यांच्या पायावर पाणी टाकून मनोभावे पूजा करून पुरणपोळीचा घास भरवला. दरम्यान, हर्सूल येथे गतवर्षीप्रमाणे यंदाही गटातटाचे राजकारण झाल्याने औताडे व बमने परिवारांनी वेगळा पोळा भरवला.

वाहनांच्या दोन किमी रांगा
हर्सूल येथे पोळा भरत असल्याने शहर ते जळगाव रोडवर वाहनांच्या दोन किमींपर्यंत रांगा लागल्या. एक तास ट्रॅफिक जाम झाली होती. त्यामध्ये दुग्धविकास व मत्स्यव्यवसायमंत्री अब्दुल सत्तार, रुग्णवाहिकेतील रुग्णांना अर्धा तास बाहेर पडता आले नाही.

खरिपाच्या पिकांना दिलासा
^पाऊस पडला नसता तर पोळा निरुत्साहात साजरा झाला असता. पण पावसाने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवले. खरिपाच्या पिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. रान हिरवे झाल्याने जनावरांसाठी चारा उपलब्ध झाला आहे. आम्हाला अजूनही मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे.
-रमेश म्हस्के, शेतकरी, हर्सूल