आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विहिरी खोदकामात रंगीबेरंगी स्फटिके, हर्षी येथील घटना, प्रशासनाने ते खोदकाम थांबवले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाचोड - शेतकरी मजुरांद्वारे विहिरीचे खोदकाम करीत असताना पन्नास फुटांवर रंगीबेरंगी मौल्यवान स्फटिकांचा थर लागल्याची घटना हर्षी (ता. पैठण) येथे घडली. तूर्तास महसूल प्रशासनाने विहिरीचे खोदकाम बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत.
हर्षी खुर्द येथील शेतकरी दिलीप साहेबराव झिने यांच्याकडे मोसंबीची तीनशे झाडे असून पाण्याअभावी त्यांची होरपळ होत असल्याने झिने यांनी उधार-उसनवारी करून गट क्रमांक ६१ मध्ये मजुरांमार्फत विहिरीचे खोदकाम सुरू केले. ४५ फुटांवर त्यांना पोकळी लागली. स्फोटके उडवण्यासाठी सुरुंग घेतले असता ते पोकळ होऊ लागले. अथक परिश्रमानंतर स्फोटकांचा आवाज उडवण्यात आला असता दगडासोबत मौल्यवान पांढऱ्या रंगाच्या गारगोटीसह पिवळी, तांबूस, निळ्या रंगाची स्फटिके सर्वत्र बाहेर पडून चकाकू लागली. अनेकांनी ती वेचून घरी नेली. या घटनेची माहिती मिळताच तलाठी जी. एस. गोरे, भागचंद वाघ यांनी तहसीलदारांना घटनेची कल्पना दिली विहिरीवर जाऊन पाहणी केली. तूर्तास शेतकऱ्याला खोदकाम बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या असून काम थांबवण्यात आले आहे.

स्फटिक पाहण्यासाठी अनेक नागरिकांनी विहिरीवर गर्दी केली. दोन दिवसांपर्यंत तर कामगारांनी कुणाला भणकही लागू दिली नाही. एकीकडे दुष्काळाने होरपळणाऱ्या शेतकऱ्यांची केविलवाणी स्थिती, तर दुसरीकडे प्रशासनाचा गौण खनिज अधिकार या घोळात थांबलेले विहिरीचे खोदकाम काय वळण घेते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

पाणीच मौल्यवान
^ऐनविहीरपाण्याच्या घरात गेली अन् रंगीबेरंगी चकाकणारे दगड लागल्याने काम थांबवण्यात आले. महसूल विभागाने त्यांचा प्रतिनिधी विहिरीवर बसवून सर्व मौल्यवान दगड घेऊन जावेत, परंतु बाग सुकत असल्याने विहिरीचे खोदकाम थांबवता ते सुरू करू द्यावे. पाणी हेच आमच्यासाठी मौल्यवान आहे. - दिलीप झिने, शेतकरी