आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चार वेळा चोरी; तरीही दुर्लक्ष, पाचव्यांदा तीन घरे फोडली! पडेगाव परिसरातील आर्च अंगणमधून २५ तोळे सोने लुटले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दौलताबाद - पडेगाव परिसरातील आर्च अंगणमधील दूर्वा इमारतीतील दोन प्राध्यापक आणि एका अभियंत्याच्या फ्लॅटमध्ये मंगळवारी भरदुपारी चोरट्यांनी डल्ला मारला. तिन्ही घरांतून चोरट्यांनी २५ तोळे सोने आणि पाच हजारांची रोकड लुटली. विशेष म्हणजे याच अपार्टमेंटमध्ये चोरट्यांनी यापूर्वी चार वेळेस चोरी केली. मात्र सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही उपाययोजना केली गेली नाही. त्यामुळे पाचव्यांदा चोरट्यांचे फावले. याप्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आर्च अपार्टमेंटच्या तिसऱ्या मजल्यावर दुर्गेश मोतीराम राठोड राहतात. ते पुण्यातील एलएमटी टूल्स या कंपनीत मेकॅनिकल इंजिनिअर म्हणून काम करतात. त्यांच्या फ्लॅटसमोर विजय प्रकाश डुकरे हे वाळूज परिसरातील एका तंत्रनिकेतनमध्ये प्राध्यापक आहेत. त्यांचे शेजारी अनिरुद्ध अरविंद देशमुख हे राष्ट्रमाता इंदिरा गांधी मिलिट्री शाळेत शिक्षक आहेत. त्यांची पत्नीही याच शाळेत शिक्षिका आहे. ही तिन्ही कुटुंबे घराला कुलूप लावून सकाळीच गेली. दुपारी दीड ते तीनच्या दरम्यान चोरट्यांनी या तिन्ही घरांच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला. सोन्या-चांदीच्या ऐवजासह नगदी ऐवज घेऊन चोरटे पसार झाले.

घटनेची माहिती कळताच सहायक पोलिस आयुक्त नागनाथ कोडे, निरीक्षक इंदलसिंग बहुरे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. या वेळी ठसेतज्ज्ञ आणि श्वानपथकालाही पाचारण करण्यात आले. विशेष म्हणजे चोरट्यांनी चोरी करण्यासाठी हातमोजे वापरले. ते घटनास्थळी सापडले. या मोज्यांचा वास श्वानांना दिला असता त्यांनी केवळ अपार्टमेंटच्या मुख्य गेटपर्यंतच माग काढला.

तिघांच्या घरात होते सोने
तीनवाजेच्या सुमारास याच इमारतीत राहणाऱ्या एका व्यक्तीला ही तिन्ही घरे उघडी दिसल्याने त्याने मोबाइलवरून या कुटुंबांना माहिती दिली. त्यानंतर काही वेळातच तिन्ही कुटुंबीय घरी परतले तेव्हा घरात चोरी झाल्याचे स्पष्ट झाले. राठोड यांच्या घरातून १३ तोळे सोन्याचे दागिने, डुकरेंच्या घरातून सात तोळे सोन्याचे दागिने काही रोख रक्कम आणि देशमुख यांच्या घरातून पाच तोळे सोने चार हजार रुपये रोख रक्कम चोरीला गेल्याचे समोर आले आहे.

ना सीसीटीव्ही ना सुरक्षा रक्षक
पडेगाव परिसरात पंधरा दिवसांपूर्वी एकाच गल्लीतील तीन घरांत एकाच दिवशी चोरी झाली होती. तरीही या भागातील अपार्टमेंटमध्ये सीसीटीव्ही बसवण्यात आले नाहीत ना सुरक्षा रक्षक नेमले. घरांच्या दरवाजाला साधी लोखंडी ग्रील बसवण्याची तसदी रहिवाशांनी घेतली नाही.
बातम्या आणखी आहेत...