आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Padmapur Problems In The Area, Tumbalelya Drainage

मंदिरांना कचर्‍याचा वेढा, धोकादायक विद्युतरोहित्रे, रस्ते खड्डेमय, दिवसा दिवे सुरू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

डीबी स्टार- वॉर्ड क्रमांक 95, पदमपुर्‍यातील लक्ष्मीवाडी, काका चौक, मामा चौक, कमान वस्ती, नयी वस्ती, सोनार गल्ली, शिवाजी चौक, लालमन कॉलनी, केवाला वस्ती, मोची मोहल्ला, रोहीदास चौक, सुयोग कॉलनी, रामलाल कॉलनी, गोळेगावकर कॉलनी या परिसरातील नागरिक समस्यांनी त्रस्त झाले आहेत.

तुंबलेल्या गटारी, जागोजागी कचर्‍याचे ढीग, वाकलेले खांब, रस्त्यावर खड्डय़ांची भर, उघड्यावर वाहणारे सांडपाणी आणि ड्रेनेजचे रखडलेले काम इत्यादी समस्यांनी डोके वर काढले आहे. काका चौकासमोरील पथदिव्याचा खांब वाकला आहे. लक्ष्मीवाडी पटेल चौकातील तुलसी भवन, राममंदिर, जयबजरंग क्रीडा मंडळाचे र्शी. हनुमान मंदिर, लक्ष्मीदेवी मातामंदिर आदी मंदिरांना कचर्‍याने वेढा घातला आहे. सुयोग कॉलनीतील सामाजिक सभागृहालगत च्या परिसरात गाजर गवत वाढले आहे. सुरक्षाभिंतीला भगदाड पाडून लोखंडी बाकडे चोरून नेले आहेत. मामा चौकातील विघ्नहर्ता गणपती मंदिरातील 415 व्होल्टेजचे विद्युत रोहित्र धोकायदायक बनले आहे. मंदिरालगतच्या खांबावरील दिवा गेल्या दोन महिन्यांपासून दिवसरात्र सुरू असतो. रोहिदास चौकात गटारी तुंबल्याने डासांची संख्या वाढली आहे. परिसरातील रस्त्यांवर पंधरा वर्षांपासून डांबरीकरण झालेले नाही. या समस्या सोडवण्याबाबत पालिकेत वारंवार तक्रारी करूनही त्याकडे कानाडोळा केला जात असल्याचा आरोप बब्बू देवतवाल, विनोद देवतवाल, मुनूसिंग शेट्टी, भारत मंडोरे, राजेश बारवाल, ओमकार देवतवाल, सचिन घोडेले, कन्हैया देवतवाल यांच्यासह अनेक नागरिकांनी केला आहे.

नंदीग्राम सोसायटीतील पूल बनला धोकादायक


वॉर्ड क्रमांक 70, नंदीग्राम सोसायटीतील पुलाचे कठडे आणि लोखंडी ग्रील तुटल्याने पुलावरचा प्रवास धोकादायक बनला आहे.नंदीग्राम हाउसिंग सोसायटीकडे जाणार्‍या पुलाचे कठडे नाल्यात ढासळले आहे. या धोकादायक पुलावरून शाळकरी मुलांची वाहने, रिक्षा आणि मोटारसायकलीची सतत ये-जा असते. याबाबत उपअभियंता पी. जी. पवार यांनी निधीची उपलब्धता झाल्यानंतर पुलाची दुरुस्ती करण्यात येईल, असे ते म्हणाले.

औरंगपुर्‍यातील नाला कचर्‍याने व्यापला


वॉर्ड क्रमांक 37, औरंगपुरा परिसरातील मुख्य रस्त्यावर असलेल्या नाला कचर्‍यांनी व्यापला आहे. संपूर्ण नाला प्लास्टिक बॅग, कचर्‍याने तुंबला आहे. तरी नाल्याची साफसफाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. याबाबत नगरसेवक अनिल मकरिये यांनी नाल्याच्या दुर्गंधीसंदर्भात नागेश्वरवाडीतील नगरसेवकांशी चर्चा केली असून येत्या काही दिवसांत नाला स्वच्छ करण्यासाठी अधिकार्‍यांना सूचना करणार असल्याचे सांगितले.

काय म्हणतात जबाबदार

रोहिदास चौक, मामा चौक ते स्टेशन रस्त्याचे काम सहा महिन्यांपूर्वी केलेले असून सध्या ड्रेनेजचे काम सुरू आहे. त्यांनतर सर्व गल्ल्यांमध्ये पेव्हर ब्लॉकचे काम करणार आहे. धार्मिक स्थळांभोवतीचा कचरा तत्काळ हटवला जाईल. रोहिदास चौक ते मामा चौक परिसरातील गटारींचे बांधकाम चालू आहे. दिवसा सुरू असलेले दिवेदेखील बंद करण्याच्या सूचना दिल्या जातील.
सुनीता बरथुने,नगरसेविका