आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मैं महाभारत करती नहीं, पर दिखाती जरूर हूं!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - छत्तीसगडमध्ये आदिवासी जमातीत सादर होणारा ‘पंडवाणी’ हा लोककलाप्रकार महाभारताची कथा सांगतो. ही कला सादर करणाऱ्या तिजनबाईंना या कलेतील योगदानाबद्दल पद्मश्री, पद्मविभूषण आणि संगीत नाटक अकादमीच्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. शाळेचे तोंडही न पाहता चार डिलीट पदव्यांनी सन्मानित तिजनबाई म्हणजे कलाक्षेत्रातील ध्रुवतारा आहेत.
देशातील सर्वाधिक मानाचे पुरस्कार मिळूनही तिजनबाईंना त्याचा लवलेश नाही. त्यांच्या बोलण्यातूनही तसे जाणवत नाही. छत्तीसगडमधील स्टील कंपनीमध्ये त्या आजही झाडू मारण्याचे काम करतात. ६० वर्षांच्या तिजनबाई तरुणींना लाजवेल अशा उत्साहात नृत्य सादर करतात. त्यांचे महाभारताचे सादरीकरण पाहताना आपण कुरुक्षेत्रात उभे आहोत असा भास दर्शकांना होतो. "दिव्य मराठी'ने त्यांच्या नृत्याच्या व्यासंगाविषयी जाणून घेतले असता त्यांनी नृत्य आणि जीवनाचे अनेक पदर उलगडून दाखवले. तिजनबाई यांची कहाणी त्यांच्याच शब्दांत....

मी वयाच्या १२ व्या वर्षापासून पंडवाणीचे सादरीकरण करते. जसजसे मला कार्यक्रम मिळत गेले तसतसे या कलेची दखल लोक घेत गेले. आदिवासी तांड्यांपर्यंतची मर्यादा तोडून कला छत्तीसगडमधील शहरांपर्यंत पोहोचली. मी ज्या भिलाई स्टील प्लँटमध्ये काम करते तेथील साहेबांनी मला पाठिंबा दिला. दिल्लीतील सादरीकरण इंदिरा गांधींनी पाहिले. कार्यक्रम संपल्यावर त्या म्हणाल्या, ‘पंडवाणी को हमेशा जिंदा रखना. बहोत अच्छा महाभारत करती हो छत्तीसगड में.’ त्यावर मी उत्तर दिले, ‘महाभारत करती नहीं, दिखाती हूं.’ त्यावर गांधी म्हणाल्या, ‘अनपढ नहीं हो तुम, पर बात का मतलब ठीक समझकर जबाब दे दिया तुमने.’

मला जेव्हा बिलासपूर विद्यापीठाने डिलीट पदवीसाठी फोन केला तेव्हा मी डिलीट म्हणजे काय असते, असे विचारले. त्यांनी सांगितले की, डॉक्टर पदवी आहे. मी विचारले, माझ्याकडे कुणी आले तर मी उपचार कसे करू? मला तर काहीच माहिती नाही. मग मला ही पदवी म्हणजे काय ते त्यांनी समजावून सांगितले. काही वर्षांनी रायपूर विद्यापीठाने डिलीट देण्यासाठी फोन केला. मी सांगितले नको, ती माझ्याकडे आहे. बिलासपूरवाल्यांनीच दिली आहे. तेव्हा सगळे पोट धरून हसले. आता मला चार डिलीट पदव्या मिळाल्या आहेत. जबलपूर आणि खैरागड विद्यापीठानेही पद‘व्या प्रदान केल्या आहेत.

श्याम बेनेगलना सांगितले, सब एकही टेक में होगा ‘भारत एक खोज’ कार्यक्रमाच्या निर्मितीवेळी श्याम बेनेगलनी सांगितले की, आप पहले प्रॅक्टिस करो, फिर शूट करेंगे. मी सरळ म्हणाले, प्रॅक्टिस की कोई जरुरत नहीं. मैं एकही बार सब करती हूं. आप चाहे जैसा शूट कर लो. एका टेकमध्ये सगळे शॉट रेडी झाले होते.

लिम्कावाल्यांनाल झाडून लावले
लिम्काबुकवालों को कहा, मैं यहा का काम छोडकर आप के पास झाडू नहीं मारुंगी. मी त्यांना सरळ सांगितले. माझी कंपनी मला आवडते. मी येणार नाही. मला वाटले होते ते मला झाडू मारण्यासाठी बोलावत होते. मग मुलांनी मला समजावून सांगितले .

पद्मश्री म्हटले तर मी भांडण करायचे
जेव्हा मला पद्मश्री मिळाला तेव्हा लोक पद्मश्री तिजनबाई म्हणू लागले. तेव्हा मी लोकांशी खूप भांडायचे. माझे नाव तिजनबाई आहे, तुम्ही पद्मश्री का म्हणता? मग मला काही लोकांनी वृत्तपत्रातील बातम्या वाचून दाखवल्या तेव्हा मला कळाले लोक मला पद्मश्री का म्हणतात ते.