आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकोपा आणि आत्मीयता जपणारे, पगारिया कुटुंबातील लक्ष्मीपूजन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिवाळी म्हणजे उत्सव, गृहसजावट, फराळाचा खमंग वास, विविध रंगाने रंगवलेली आकर्षक रांगोळी, फटाके मन प्रसन्न करणारे वातावरण.दिवाळीत खरे महत्त्व लक्ष्मीपूजनाला. औरंगाबाद शहरातील पगारिया कुटुंबातील लक्ष्मीपूजन त्यांच्या कर्मचारी आणि कुटुंबीयांसाठी एक पर्वणीच असते. कर्मचा-यांना मिळणारा मान, आदर आत्मियता, सर्वांच्या उपस्थितीत होणारे लक्ष्मीपूजन ही 50 वर्षांपासूनची स्नेहमयी परंपरा झाली आहे.


विहा मांडव्यातून औरंगाबादला स्थायिक झालेल्या पगारिया कुटुंबात दिवंगत कन्हैयालाल पगारिया यांना शांतीलाल,झुंबरलालजी, रमेशचंद्र, निर्मलचंद्र, मदनलाल आणि सजनराज ही सहा मुले. 50 वर्षांपूर्वी औरंगाबादमध्ये स्थायिक झाल्यापासून हे कुटुंब एकत्र लक्ष्मीपूजन करते. वेदांतनगरात झुंबरलालजी पगारिया यांच्या घरी होणारा हा धार्मिक कार्यक्रम म्हणजे कुटुंबासाठी अनोखी पर्वणीच असतो. सहाही भावंडाची कुटुंबे, व्यवसाय, कार्यालये ,घरे वेगवेगळी आहेत. पण लक्ष्मीपूजना दिवशी हे सर्व कुटुंब एकत्र येते लक्ष्मीपूजन करते.

मोठ्या स्वरूपात पूजा
पगारिया यांच्या कुटुंबातील जवळपास 60 व्यक्ती आणि कर्मचारी असे 100 ते 150 लोक एकत्र येत पूजा करतात. गादी आणि पूजेची तयारी करण्यापासून ते जेवणापर्यंत एक धम्माल असते. 10 फर्मसाठी लागणा-या खातेवही, व्यवहाराच्या वह्या, केरसुणी, इतर साहित्य असे मोठ्या प्रमाणात आणून त्यांची विधिवत पूजा केली जाते. पूजेवेळी सर्व कर्मचारी, नातलग, कुटुंबातील सदस्य हजर असतात. आरतीवेळी ज्येष्ठांच्या सूचनेनुसार सर्व काम सुरू असते.लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे जोडी-जोडीने आरती करतात. पूजन संपल्यानंतर घरातील ज्येष्ठ व्यक्ती मांगलिक ( जैन प्रार्थना पद्धत) देते.

कर्मचा-यांना मानाचे स्थान
पगारिया यांच्या घरी होणा-या लक्ष्मीपूजनची सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे कर्मचा-यांना मिळणारा मान, आदर आणि आपलेपणाची भावना. पगारिया कुटुंबासोबत असणा-या आत्मीयतेमुळे दुसरीकडे गेलेले कर्मचारीसुद्धा लक्ष्मीपूजनासाठी आवर्जून उपस्थिती लावतात. त्यांना घरच्या व्यक्तीप्रमाणे मिळणा-या मानातून हा स्नेहबंध जोपासला गेला आहे. पूजेनंतर सर्वात आधी जेवणाचा मान कर्मचारी मंडळींना दिला जातो. त्यांना नवीन कपडे, टोप्या दिल्या जातात. पगारिया कुटुंबासोबतच्या आत्मीयतेमुळेच काही कर्मचारी आता दुसरीकडे काम करत असले तरी या दिवशी हमखास उपस्थिती लावतात असे कीर्ती पगारिया सांगतात.

कौटुंबिक मेळा
पगारिया यांच्याकडील लक्ष्मीपूजन म्हणजे एक प्रकारे कौटुंबिक मेळाच असतो. वर्षभर वेगवेगळ्या ठिकाणी राहणे सर्व कुटुंब एकत्र जमतात. एकमेकांशी विविध विषयांवर चर्चा करतात. मुलांमध्ये पारंपरिक चालीरीती आणि कुटुंबाविषयी आस्था राहण्यासाठी हा कार्यक्रम अत्यंत महत्त्वाचा ठरतो. घरातील महिला वर्षभर लक्ष्मीपूजनाची वाट पाहत असतात.


हा सण फक्त कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता या आनंदात सर्व स्टाफला सहभागी करून घेतो. पत्नी चंचला यांच्या पुढाकारामुळे कुटुंब एकत्र आहे. तीन पिढ्या एकत्र येत हा दीपोत्सव साजरा करतात. पुढील पिढीने ही परंपरा जपावी एवढी इच्छा आहे.
झुंबरलालजी पगारिया, कुटुंब प्रमुख

माझ्या माहेरी असे पारंपरिक लक्ष्मीपूजन कधी झाले नाही आणि आजही होत नाही. पण गेल्या 14 वर्षांपासून अनुभवत असलेले हे लक्ष्मीपूजन वेगळाच अनुभव आहे. दरवर्षी अशीच दिवाळी साजरी होत राहो हीच ईश्वराकडे प्रार्थना आहे.
कीर्ती पगारिया

लक्ष्मीपूजनामध्ये सर्व भावंडासोबत बसून आम्ही मुले पूजा करतो. वडीलधा-या व्यक्तींसोबत गप्पा करतो. सर्वांसोबत फटाके फोडण्यात आणि मज्जा करण्यात वेगळाच आनंद असतो. सगळे कुटुंब एकत्र गोळा होत असल्याने खूप मजा वाटते.
स्नेहल पगारिया