आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 'Page To Stage' Festival, Latest News In Divya Marathi

‘पेज टू स्टेज’ महोत्सवात सामाजिक विषयांवर भाष्य

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- नात्यांतील गुंतागुंत, फेसबुकचा फसवेपणा, रंगभेदामुळे होणारा त्रास, खेडेगावातील नाटक, नाट्य तालमीदरम्यानची मजा अशा विविध विषयांनी परिपूर्ण असा ‘पेज टू स्टेज’ महोत्सव शुक्रवारी सरस्वती भुवन नाट्यशास्त्र विभागाच्या गोविंदभाई र्शॉफ महोत्सवात रंगला. ‘चंपाअक्का गणेश मंडळ’ या बाळू गाडेकर लिखित एकांकिकेने यामध्ये प्रथम पारितोषिक पटकावले.
सरस्वती भुवन नाट्यशास्त्र विभागाने आयोजन केले होते. र्शीकांत सराफ आणि गिरिधर पांडे यांनी स्पध्रेचे परीक्षण केले. प्रख्यात रंगकर्मी, नाटककार प्रा. अजित दळवी, प्रा. जयंत शेवतेकर, सीमा मोघे यांची विशेष उपस्थिती होती. विभागप्रमुख किशोर शिरसाट, प्रा. नितीन गरुड, प्रा. गणेश शिंदे, प्रा. किशोर जांगडे, योगिता तळेकर-महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी महोत्सव यशस्वी केला.
या नाट्यमहोत्सवात तरुण रंगकर्मींनी आशयघन, मनोरंजनात्मक सादरीकरणाची मेजवानी दिली. ‘गर्दी’ या अक्षय कुलकर्णी लिखित आणि विजय राऊत दिग्दर्शित एकांकिकेतून फेसबुकवरील फसव्या गर्दीवर भाष्य करण्यात आले. प्रियंका गजभियेने यांनी लेखन-दिग्दर्शन केलेल्या ‘नाते’ या एकांकिकेतही नात्यातील गुंतागुंत मांडली होती. ‘काळगर्भ’तून काळ्या-गोर्‍या रंगाचा संघर्ष भेदकतेने सादर झाला. संतोष गायकवाड लिखित आणि ऋता इंगोले दिग्दर्शित केलेली ही एकांकिका सर्वांना अंतर्मुख करून गेली. संतोष, ऋता अभिनयही लक्षवेधी होता.
चंपा अक्काची धमाल
लोकनाट्यावर आधारित ‘चंपाअक्का गणेश मंडळ’ या एकांकिकेने धमाल उडवून दिली. बाळू गाडेकरने एकांकिकेचे लेखन, दिग्दर्शन केले. सर्वच कलावंतांचे टायमिंग अफलातून होते. ‘नि:शब्द’ एकांकिकेतून तालमीदरम्यान येणारी मजा प्रस्तुत करण्यात आली. यशोदा आहेरने याचे लेखन तर सचिन काजळेने दिग्दर्शन केले होते.
पारितोषिक वितरणप्रसंगी र्शीकांत सराफ म्हणाले, की मराठवाड्यातील सध्याची पिढी अतिशय प्रतिभावान आहे. नाटक ही अभिजात कला अधिकाधिक संपन्न करण्यासाठी अनेक साधने आज उपलब्ध आहेत. त्याचा वापर ज्ञानात भर घालण्यासाठी करा. विपुल वाचन करा. तेच आपल्या व्यक्तिमत्त्वातून झळकते. गिरिधर पांडे यांनीही तरुण रंगकर्मींना मोलाच्या टिप्स दिल्या.