आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहाडसिंगपुऱ्यातील विस्थापितांची दिवाळी कष्टाने बांधलेल्या घरातच

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - पैपै जमा करून बांधलेली घरे दोन जमीन मालकांच्या भांडणात हिरावली गेल्याने पहाडसिंगपुरा विस्थापितांची दिवाळी स्वत:च्या घरात साजरी होणार आहे. पोलिस आयुक्तांचे प्रयत्न आणि माजी आमदार प्रदीप जैस्वाल यांच्या शिष्टाईने १२४ घरमालकांना त्यांची घरे परत मिळणार अाहेत. मात्र, यासाठी थोडासा आर्थिक भार त्यांना सोसावा लागणार आहे. मूळ जमीन मालक माधवराव सोनवणे यांच्यासोबत झालेल्या तडजोडीनुसार पत्र्यांचे घर बांधणाऱ्यांना तीन लाख तर पक्की घरे बांधलेल्यांना साडेतीन लाख रुपये द्यावे लागतील. ही रक्कम पोहोचताच घरे रीतसर नावावर करून देण्याची ग्वाही सोनवणे यांनी दिली.
बीबी का मकबऱ्यामागील सहा एकर जमिनीवर रेणुकानगर आणि ताजमहाल कॉलनी वसवण्यात आली होती. या जमिनीसंदर्भात सोनवणे आणि कोरडे यांच्यात न्यायालयीन वाद सुरू असतानाच जमिनीची खरेदी-विक्री झाल्याची तक्रार सोनवणे यांनी केली होती. जमिनीचा निकाल सोनवणे यांच्या बाजूने लागल्यानंतर महसूल विभागाने पोलिस बंदोबस्तात ही जमीन आणि त्यावरील घरांचा सोनवणेंकडे ताबा दिल्याने तेथील १२४ कुटुंबे विस्थापित झाली. कोरडे यांच्याकडून नगरसेवक राजू तनवाणी आणि दिवगंत मंत्री अब्दुल अजीम यांचा मुलगा अब्दुल सलीम यांच्या मुलाने जमीन खरेदी करून प्लॉट विकले होते. आमचा दोष नसताना आम्ही फसलो, अशी कैफियत नागरिकांनी पोलिस आयुक्त अमितेशकुमारयांच्याकडे मांडल्यानंतर त्यांनी माजी आमदार प्रदीप जैस्वाल यांना मध्यस्थी करण्याची विनंती केली. सात दिवसांत हा प्रश्न सोडवा, असे आयुक्तांनी सांगितले होते. त्यानुसार जैस्वाल यांनी माधव सोनवणे आणि ख्वाजा अमीन यांची बैठक घेतली. गरिबांना बेघर करू नका, अशी विनंती करत विस्थापित घरमालक आणि सोनवणे यांच्यात तडजोड घडवून आणली. या बैठकीत पत्र्यांच्या घरांसाठी तीन लाख आणि पक्क्या घरांसाठी साडेतीन लाख रुपये देण्याचे ठरले.

आता महसूल प्रशासनाचा संबंध नाही
^न्यायालयाच्या निर्णयानुसार महसूल विभागाने सोनवणे यांना या जमिनीचा ताबा दिला होता. त्याच वेळी जप्त घरांच्या चाव्याही सोनवणे यांना देण्यात आल्या होत्या. आता या व्यवहाराचा महसूल विभागाशी संबंध नाही. - रमेश मुनलोड, तहसीलदार, औरंगाबाद

गरिबांचे दु:ख जाणले
^जमिनीचे मूळ मालक माधवराव सोनवणे ख्वाजा अमीन यांनी गोरगरिबांचे दु:ख जाणून घेत त्यांना माणुसकीच्या धर्तीवर घरे परत केली. यासाठी पोलिस आयुक्तांनी पुढाकार घेतला. यासाठी तिघांचेही आभार मानतो. ठरलेली रक्कम घरमालकांनी दिल्यानंतर त्यांना रीतसर घरे नावे करून दिली जाणार आहेत.
प्रदीप जैस्वाल, माजी आमदार

जुना मित्रच धावून आला
याप्रकरणात राजू तनवाणी यांच्यावर गुन्हा दाखल होऊन त्यांना अटकही झाली होती. बुधवारीच तीन घरमालकांना घरे परत मिळाली. उर्वरित घरेही लवकरच िदली जाणार आहेत. प्रदीप जैस्वाल आणि किशनचंद तनवाणी (राजू तनवाणींचे बंधू) यांची मैत्री सर्वश्रुत आहे. पक्षीय राजकारणामुळे दोघांत वितुष्ट आले होते. मात्र जैस्वालांच्या पुढाकारानेच तनवाणींसाठी अडचणीचे प्रकरण निवळले. जुना मित्रच मदतीसाठी धावून आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली.
बातम्या आणखी आहेत...