आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहुरी चित्रकला होतेय ग्लोबल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - जळगाव जिल्ह्याच्या ग्रामीण समाजजीवनाचे रेखाटन करणारी पहुरी चित्रकला आता कॅन्व्हासपुरती न राहता कॉर्पोरेट, लाइफस्टाइल प्रॉडक्ट, एम्ब्रॉयडरी, ज्वेलरी अशा नव्या माध्यमांतून ती जगासमोर येत आहे. ख्यातनाम चित्रकार लखीचंद जैन यांनी विकसित केलेली ही शैली लोककलेची असून त्यात नव्या काळाचे संदर्भ देण्यात येत असल्याचे सांगितले.

दोन समांतर रेषांमधून आकाराला आलेल्या मानवी प्रतिमांनी आता जळगाव जिल्ह्यातील पहूरला नव्या युगातील लोककलेचे स्थान मिळवून दिले आहे. मूळ पहूरच्या आणि औरंगाबादेत शिक्षण घेऊन आता मुंबईत राहून कलेच्या क्षेत्रात काम करणार्‍या लखीचंद जैन यांनी 10 वर्षांपूर्वी निर्मिलेली पहुरी लोकचित्रकला आता वेगवेगळ्या माध्यमातून नावारूपाला आली आहे. लखीचंद जैन यांनी राजस्थानच्या मांडणा या चित्रप्रकारात मोठे काम केले आहे. अस्तंगत होत असलेल्या या कलेला नव्या युगात नव्या प्रकाराने संरक्षित करण्याचे काम करताना आपल्या मुळाचा शोध घेण्याचे काम लखीचंद जैन यांनी केले.

‘दिव्य मराठी’शी बोलताना त्यांनी पहुरीच्या मागील प्रेरणा सांगितली. साधारणपणे दहा वर्षांपूर्वी याच विषयावर चिंतन करताना त्यांनी लहानपणी जवळून पाहिलेले खान्देशातील विशेषत: पहूर आणि परिसरातील लोकजीवन चित्रांच्या माध्यमातून कसे साकार करता येईल याचा विचार केला. त्यातून अचानक या चित्रांमधली पात्रे आकाराला आली. दोन समांतर रेषा एक लय घेऊन झेपावतात. त्यांना आडवे छेद देत त्यांचे शरीर आणि साध्या सोप्या रेषांच्या माध्यमातून त्यांच्या हालचाली असे रूप त्यांनी घेतले.
ग्लोबल करायचे आहे..

पहुरी चित्रकला फक्त कॅन्व्हासपुरती र्मयादित ठेवणार नसल्याचे सांगताना लखीचंद जैन म्हणाले की, ही साध्या सरळ रेषांची, बिलकुल गुंतागुंत नसलेली माझी चित्रभाषा आहे. वारलीसारखीच ती सुटसुटीत आणि थेट बोलणारी आहे. ती पाहून कुणालाही आपण शिकून चित्र काढू शकू, असा विश्वास देणारी आहे. म्हणूनच ती ग्लोबल करायची आहे. त्यासाठी कॅन्व्हासशिवाय इतर माध्यमांचाही वापर करत आहे. कॉर्पोरेट प्रॉडक्ट्स म्हणजे कॅलेंडर्स, गिफ्ट्स, लाइफस्टाइल प्रॉडक्ट्स म्हणजे कपड्यांवर हा प्रकार वापरायचा प्रयोग केला आहे. लहान मुलांच्या टॉवेल्सवर पहुरीतील मुलांचे चित्रविश्व, बाथरूम टाइल्स ही माध्यमे वापरत आहे. शिवाय ज्वेलरी, एम्ब्रॉयडरीसारख्या वेगळ्या कलाप्रकारात पहुरीला कसे समाविष्ट करता येईल यावर काम सुरू आहे.

कशासाठी पहुरी ?
जैन म्हणाले की, भारतीय दृश्य लोककलांचा विचार केला तर आताचे ग्रामीण समाजजीवन त्यात अभावानेच दिसते. ही पोकळी भरून काढण्याचे काम पहुरीला करायचे आहे. मी पाहिलेले ग्रामीण जीवन, त्यात झालेले- होणारे बदल साकारण्याचा प्रयत्न करणारी ही आजच्या काळची लोकचित्रकला आहे. पहुरीतून प्रत्येकाला आपल्या बालपणीच्या सोनेरी दिवसांची आठवण होईल, असा माझा प्रयत्न आहे. माझ्या चित्रांमधील प्रतिमा या मी लहानपणी आजूबाजूला पाहिलेल्या, अनुभवलेली माणसे, वस्तू, प्रसंगांच्या आहेत. अगदी त्यात उखळ, मुसळ, सूप, जाते, खलबत्ता, पाटा-वरवंटा, भवरा सगळे काही आहे. त्या काळची घरे, त्यांचे तेव्हाचे इंटेरिअर, एक्स्टेरिअर हेही चितारले आहे.