आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पैठणचे दूषित पाणी गोदावरीच्या पात्रात, सत्ताधाऱ्यांच्या नियोजनशून्य कारभाराचे पितळ उघड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पैठण - केंद्र सरकारने देशातील नद्यांच्या स्वच्छतेसाठी खास मोहीम हाती घेतली असली तरी याचा पैठणच्या नगरपालिकेला विसर पडल्याचे दिसते. पैठण शहरातील सर्व दूषित पाणी थेट गोदावरी नदीपात्रात मिसळत असून हेच पाणी भाविक व नागरिक वापरत आहेत.
नगर परिषदेकडे शहरातील दूषित मैलामिश्रित पाण्याची विल्हेवाट लावण्यासाठीची कोणतीच यंत्रणा नाही. स्वच्छतेच्या केवळ गप्पा मारणारे सत्ताधारी नगरसेवक व प्रशासन शहरातील दूषित पाण्याचा निचरा न करता ते थेट मोठ्या नाल्याद्वारे गोदावरी नदीपात्रात सोडण्यात येते. तब्बल आठ नाल्यांचे पाणी गोदावरीच्या शुद्ध पाण्याला दूषित करत आहे. याकडे कुणाचेही लक्ष नाही. याच पाण्यात काही भाविक स्नान करतात तर काही धार्मिक विधी होतात. अनेक वर्षांपासून मिसळते गोदावरीत दूषित पाणी - गटारीच्या पाण्यावर कोणतीच प्रक्रिया न करता थेट नदीपात्रामध्ये पाणी सोडले जाते. हा प्रकार अनेक दिवसांपासून सुरू असून याकडे लक्ष देण्यासाठी कुणालाही वेळ नाही. नगरपालिकेने यात लक्ष घातल्यास आहे ते स्वच्छ पाणी खराब होणार नाही. दुसरीकडे प्रदूषण नियंत्रण मंडळ किंवा लोकप्रतिनिधी याबाबत उदासीन आहेत.
कर्तव्यदक्ष अधिकारी मिळाल्यास होईल ठोस कारवाई
दूषित गटारीचे पाणी नदीत न सोडता इतर पर्याय यासाठी निवडणे आवश्यक आहे. मात्र, यासाठी कोणी पुढाकार घेताना दिसत नाही. नगर परिषदेकडून गटारीचे पाणी नदीपात्रात सोडण्यापासून रोखणे सहज शक्य आहे. मात्र, पालिकेला तसे नेतृत्व व मुख्याधिकारी आजघडीला लाभलेला नाही.
पालिकेचा कचरा जातो नदीत
नदीत दूषित पाणी सोडले हे कमी की काय म्हणून पालिकेचे काही महाभाग पालिकेचा कचरादेखील नदीपात्राच्या परिसरात टाकतात.
परिसरात दूषित पाण्याचा वापर होतो पिण्यासाठी
गोदावरीत पैठणचे दूषित पाणी सोडले जाते. सध्या नदीपात्रामध्ये पाणी असून हे पाणी पैठणबाहेरील लोक पिण्यासाठी वापरताना दिसून येत आहेत. परिसरातील लोकांचा विचार करून तरी नदीपात्रात मिसळणारे गटारीचे पाणी रोखणे आवश्यक आहे.
^
गोदावरीत गटारीचे पाणी जाणार नाही यासाठी पालिकेच्या वतीने लवकरच उपाययोजना हाती घेण्यात येणार असून नदी प्रदूषित होणार नाही याची काळजी घेतली जाईल.
रेखाताई कुलकर्णी, उपनगराध्यक्ष
^
नगर परिषदेने गटारीचे पाणी थेट नदीपात्रात जाणार नाही यासाठीच्या कोणत्याच उपाययोजना केल्या नसल्याने नदीपात्र दूषित होत आहे. तेच पाणी काही लोक पिण्यासाठी वापरतात त्यांचा तरी विचार करावा व प्रदूषण रोखावे. |
अनिल पटेल, माजी मंत्री
^
केंद्र सरकारने नद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी प्रयत्न सुरू केले असताना पालिकेच्या उदासीनपणामुळे शहराचे दूषित पाणी नदीत येत आहे. गटारीचे पाणी नदीत जाणार नाही यासाठी आम्ही प्रयत्न केले हाेते. पालिका पदाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे.
जितसिंग करकोटक