आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Paithan Gyaneshwar Garden Ingratiation Ceremony Today

प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सुटेना; आज शंकररावांच्या यांच्या पुतळ्याचे अनावरण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पैठण- पैठणचे सुपुत्र शंकरराव चव्हाण यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण शुक्रवारी संत ज्ञानेश्वर उद्यानामध्ये होत आहे. शंकरराव चव्हाण यांच्यामुळे मराठवाड्यात जायकवाडीसारखा प्रकल्प उभा राहिला. या प्रकल्पासाठी पैठणच्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतजमिनी दिल्या. त्यामुळे येथील सिंचनाचा प्रश्न कायमचा सुटला गेला, पण जमिनी देणाऱ्या प्रकल्पग्रस्तांच्या समस्या ४० वर्षांतही सुटल्या नाहीत. त्यामुळे धरणग्रस्तांना आजही मूलभूत सोयी-सुविधा आणि मावेजासाठी शासन दरबारी खेटे मारावेलागत आहेत.

पैठण तालुक्यात पिंपळवाडीसह अन्य गावांतील प्रकल्पग्रस्त आजही पडक्या घरात राहतात. जवळपास चारशेहून अधिक शेतकऱ्यांनी आपली जमीन धरणासाठी दिली. यातील काहींना लाभही मिळाला. मात्र, अद्यापही शेकडो जण केवळ धरणग्रस्त म्हणून जीवन जगत आहेत. शंकरराव चव्हाण यांचे जन्मगाव असलेल्या कातपूरला पाणी मिळाले. जमिनी सुपीक झाल्या. मात्र, इतर सुविधा अजून मिळाल्या नाहीत. धरणग्रस्तांना आपल्या हक्कासाठी शासनाकडे ४० वर्षांनंतरही चकरा माराव्या लागत आहे.

मराठवाड्यात ७६,२८० जण विस्थापित : शंकरराव चव्हाण यांच्या दूरदृष्टीने मराठवाड्याचे भूमी सुजलाम झाली. मात्र, या जलाशयामुळे ११८ गावे विस्थापित झाली. यात पिंपळवाडीसह अन्यही आज विस्थापित असल्याचे पाहायला मिळते. प्रकल्पामुळे ७६,२८० बाधितांचा अाकडा झाला. आजही अनेकांना धरणग्रस्ताच्या सवलतीसाठी शासनाच्या पायऱ्या चढाव्या लागतात.
जायकवाडीवरील धरणामुळे मराठवाडा कोरडा : शंकरराव चव्हाण यांनी जायकवाडीच्या वरील भागात धरणे बांधण्यासाठी नियम केले. मात्र, तरीही त्यांच्यानंतर जायकवाडीवरील भागात अनेक धरणे बांधली गेली. यामुळे आजघडीला जायकवाडी प्रकल्प कोरडा पडला आहे. तरीही वरील धरणांतून खाली पाणी सोडण्याची भूमिका घेतली जात नाही. शिवाय वरील धरणाच्या पाण्यावर मराठवाड्याला अवलंबून राहावे लागत आहे. शंकरराव चव्हाण यांच्यानंतर पाण्यासाठी जागृत नेता लाभला नाही.

विकासासाठी निधी दिला नाही
प्रकल्पग्रस्तांना शासकीय नोकरी तर सोडाच, पण एमआयडीसीमध्ये कामगार म्हणूनही घेत नाही. वाढीव मोबदला देण्याच्या आश्वासनाला अजून ४० वर्षांत मुहूर्त मिळत नाही. आज या प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या शंकरराव चव्हाण यांच्या पुतळ्याचे अनावरण होताना प्रकल्पग्रस्तांच्या बलिदानाचे स्मरण तरी होणार काय, असा सवाल येथील प्रकल्पग्रस्त विचारत आहेत.

पिंपळवाडी गाव पूर्ण विस्थापित
पिंपळवाडी येथील २०० च्या वर शेतकऱ्यांच्या जमिनी या प्रकल्पात गेल्या. हे गाव पूर्ण विस्थापित असताना शासनाच्या कोणत्या योजना येथे राबवल्या यावर प्रश्न निर्माण होत असून आज शंकरराव चव्हाण यांच्या पुतळ्याच्या निर्मिताने तरी प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांकडे शासन लक्ष देईल काय?
- साईनाथ सोलाट, सरपंच, पिंपळवाडी