आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रखडलेली ब्रह्मगव्हाण योजना उरली राजकारणापुरतीच

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पैठण- जिल्हापरिषद, पंचायत समितीच्या निवडणुका काही महिन्यांवर आल्या असून याची तयारी सर्वच राजकीय पक्षांनी सुरू केली आहे. यंदाच्या निवडणुकीत विरोधकांचा मुख्य मुद्दा हा सात वर्षांपासून रखडलेली ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजना याभोवती फिरणार असल्याचे सध्यातरी चित्र दिसत आहे. याला अनुसरून पालकमंत्र्यांनी नुकतीच योजनेची पाहणी करत निधी जाहीर केला; परंतु निधी बजेटमध्ये तरतूद नसल्याने कदम कसे देणार, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे.

या रखडलेल्या योजनेसाठी आम्हीच निधी आणणार असल्याचा दावा भाजपचे तालुकाध्यक्ष तथा संत एकनाथचे चेअरमन तुषार शिसोदे यांनी केला आहे. एकूणच योजना मार्गी लावण्यापेक्षा त्याचे राजकारण करण्यावरच आता निवडणुकीत सत्ताधारी - विरोधकांत जुंपली आहे.

आतापर्यंत पैठण तालुक्याचे राजकारण केवळ शिवसेना राष्ट्रवादीमध्ये होते. त्यात आता भाजपने शिसोदेंच्या रूपाने उडी घेतली आहे. पैठणमध्ये आता शिवसेनेला भाजपशीही दोन हात करावे लागणार आहे. शिवसेनेचे आमदार संदिपान भुमरे यांचे प्रमुख राजकीय विरोधक म्हणून माजी आमदार संजय वाघचौरे हे समजले जातात. या दोन्ही नेत्यांनी आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तालुक्यात बडे नेत आणण्याचा सपाटा लावला आहे. नुकतीच आमदार भुमरे यांनी ब्रह्मगव्हाण योजनेची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री रामदास कदम यांना आणले होते, तर माजी आमदार संजय वाघचौरे यांनी काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना पैठण शहरात आणले होते. या दोघांपूर्वी भाजपचे तुषार शिसोदे यांनी तर थेट मुख्यमंत्र्यांनाच एका कार्यक्रमासाठी पैठणमध्ये आणले होते. त्यात आता पुन्हा भाजपचा पुढील कार्यक्रम हा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीतच होणार असल्याचे शिसोदे यांनी जाहीर करून टाकले आहे. या राजकारण्यांच्या हेव्या-दाव्यात ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजना मार्गी लागणार की केवळ निवडणुकांपुरती लक्षात ठेवून रखडणार हे आगामी काळात कळणार आहे.

त्यात आता घायाळ शुगर्सचे सचिन घायाळ यांनीदेखील तालुक्याच्या राजकारणात सक्रिय होण्यास सुरुवात केली आहे. राजकारणात तालुक्याचा विकास खुंटला असून आगामी जिल्हा परिषद निवडणुकांसाठी तरुणांचे पॅनल प्रस्थापित पुढाऱ्यांच्या विरोधात उभे करणार असल्याचे सचिन घायाळ यांनी जाहीर केले आहे. तर आगामी जिल्हा परिषद नगरपालिका निवडणुका काँग्रेस पक्ष स्वबळावर लढणार असल्याचे तालुकाध्यक्ष रवींद्र काळे यांनी सांगितले. त्यामुळे आता काँग्रेसला शहरासह ग्रामीण भागात संपर्कावर भर द्यावा लागणार आहे.

जि.प.चे सदस्य औरंगाबादवासीयच
पैठण तालुक्यातील आठ सर्कलमध्ये शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीचे वर्चस्व राहिले आहे. त्यांच्या तिकिटावर निवडून आलेले सदस्य आता औरंगाबादवासीय झाले असून गावाकडे ते केवळ राजकारण करण्यासाठी निवडणुका लढवण्यासाठी येतात, अशी चर्चा नागरिकांमध्ये होत असून असे असेल तर विकासाची अपेक्षा या सदस्यांकडून कशी करावी, असा सवाल उमटत आहे.
बातम्या आणखी आहेत...